
( अयनुद्दीन सोलंकी ),
घाटंजी / यवतमाळ – घाटंजी तालुक्यातील गोविंदपुर येथील स्वरा मेटल्स गिट्टीखदानचे दिवांजी व चिखलवर्धा ग्रामपंचायतचे उपसरपंच आकाश भगवान नडपेलवार यांच्या विरुद्ध दाखल अँट्रोसिटी अँक्ट प्रकरणातील ब समरी प्रकरणाची सुनावणी 28 जानेवारी रोजी न्यायाधिश 1 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. जी. भंसाळी यांच्या न्यायालयात होणार आहे. फिर्यादी सरपंच वर्षा कणाके हीने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात ब वर्ग समरी फायनल मध्ये अँड. नरेंद्र बी. मेश्राम मार्फत आक्षेप अर्ज सोमवारी दाखल केला असून सदर प्रकरणाचा पुढील सुनावणी 28 जानेवारी रोजी होणार आहे.
शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील अँड. ए. के. वर्मा, तर फिर्यादी तथा चिखलवर्धा येथील सरपंच वर्षा कणाके हिची बाजु अँड. नरेंद्र बी. मेश्राम हे न्यायालयात मांडणार आहे.
फिर्यादी सरपंच वर्षा कणाके हिच्या तक्रारीवरून संशयीत आरोपी चिखलवर्धा ग्रामपंचायतचे उपसरपंच आकाश नडपेलवार विरुद्ध अँट्रोसिटी अँक्ट 3 (1) (r), 3 (1) (s) (अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा) व भादंवि कलम – 504 अंतर्गत पारवा पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता. सदर प्रकरणात पांढरकवडा येथील उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी तपास केला होता. मात्र, सदर गुन्ह्याच्या तपासाअंती फिर्यादी वर्षा कणाके हीने दाखल केलेली तक्रार खोटी असल्याचे निष्पन्न झाल्याने सदरच्या प्रकरणात यवतमाळचे न्यायाधिश 1 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. जी. भंसाळी यांच्या न्यायालयात 24 डिसेंबर 2021 रोजी ब वर्ग समरी फायनल दाखल केला होता. मात्र, सदर प्रकरणात फिर्यादी सरपंच वर्षा कणाके हिने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. जी. भंसाळी यांच्या न्यायालयात आक्षेप अर्ज दाखल करुन ब वर्ग समरी फायनल प्रकरणाला आवाहन दिले आहे. विशेष म्हणजे चिखलवर्धा येथील उपसरपंच आकाश नडपेलवार व तत्कालीन सचिव पी. सी. दौड आदीं विरुद्ध अतिरिक्त गुन्हे नोंदविण्याची मागणी न्यायालयात करणार असल्याचे त्यांनी बोलतांना स्पष्ट केले आहे. सदर प्रकरणाची पुढील सुनावणी 28 जानेवारी रोजी होणार आहे.
घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथील ग्रामपंचायतची मासीक सभा 10 मार्च 2021 रोजी सरपंच वर्षा कणाके हिच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. मात्र, उपसरपंच आकाश नडपेलवार यांनी उपसरपंच यांचा रबर स्टॅम्प मारुन त्यातील उप हा शब्द खाडाखोड करुन सरपंचाचा खोटा रबर स्टॅम्प तयार करुन सरपंचाची खोटी सही करून पांढरकवडा येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सिंमेट काँक्रिट रस्ता, नाली व ईतर बांधकाम मंजुर करण्यासाठी खोटा व बनावट ठराव ग्रामसेवक पी. सी. दौड यांच्या हस्ताक्षरात तयार करून सादर केल्याचे सरपंच वर्षा कणाके हिला समजले. त्यावरुन सरपंचाचा खोटा रबर स्टॅम्प व सरपंचाची खोटी सही करून खोटा व बनावट ग्रामपंचायतचा ठराव दाखल केल्या प्रकरणी सरपंच वर्षा कणाके हीने उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जिल्हा परिषद यवतमाळ येथे लेखी तक्रार दाखल करुन गैरअर्जदारांविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी केली होती. मात्र, सदर प्रकरणात कोणतीही चौकशी वा कारवाई न झाल्याने अखेर सरपंच वर्षा कणाके हीने उपसरपंच आकाश नडपेलवार व ग्रामसेवक पी. सी. दौड विरुद्ध पारवा पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ करून खोटा व बनावट ठराव तयार करुन शासनाची दिशाभूल व फसवणुक केल्याची लेखी तक्रार पारवा पोलीस ठाण्यात दाखल केली. मात्र, सदर प्रकरणात उपसरपंच आकाश नडपेलवार विरुद्ध अँट्रोसिटी अँक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, ग्रामसेवक पी. सी. दौड यांच्या विरुद्ध कोणताही गुन्हा वा कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे 2 आँक्टोंबर 2021 रोजी सरपंच वर्षा कणाके हिने पुन्हा दुसरी लेखी तक्रार पारवा पोलीस ठाण्यात दाखल करुन उपसरपंच आकाश नडपेलवार व सचिव पी. सी. दौड यांचे विरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, सदर तक्रारीवरुन कोणतीही चौकशी वा कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र, संशयित आरोपी आकाश नडपेलवार विरुद्ध दाखल अँट्रोसिटी अँक्ट प्रकरणात उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी केलेल्या तपासात सदर तक्रार खोटी असल्याचे निष्पन्न झाल्याने न्यायाधिश 1 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात ब वर्ग समरी फायनल दाखल केला होता.
दरम्यान, कुर्ली येथील कंट्रोल डीलर शेख शम्मा शेख ईकबाल हिला कंट्रोल दुकान चालवायचे असल्यास महीण्याकाठी 6000 रुपयाची खंडणी मागितल्या प्रकरणी संशयित आरोपी आकाश भगवान नडपेलवार (चिखलवर्धा) सह कुर्लीच्या तिघां विरूध्द भादंवि कलम 384, 389, 506 सह कलम 34 कलमान्वये पारवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून सदर प्रकरणात पारवा पोलीसांनी घाटंजी न्यायालयात ब वर्ग समरी फायनल दाखल केला आहे. सदर प्रकरण घाटंजी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एफ. टी. शेख यांच्या न्यायालयात प्रलंबित आहे, हे विशेष.










































