Home उत्तर महाराष्ट्र सामाजिक पत्रकारितेचा कृतिशील वारसा जोपासताहेत हे त्रिकुट..

सामाजिक पत्रकारितेचा कृतिशील वारसा जोपासताहेत हे त्रिकुट..

429

नाशिक – लोकशाहीचा चौथा स्तंभ,समाजाचा आरसा म्हणून पत्रकारितेस ओळखलं जातं,कालानुरूप बदलत असला तरी पत्रकारितेत प्रत्यक्ष सामाजिक ज्वलंत,आस्थेच्या मुद्द्यांना थेट वाचा फोडून त्याला तडीस नेईपर्यंत प्रतिकुलतेला भिडून लेखणी,कॅमेरा व जागृती,पाठपुरावा,लोकलढयापर्यंत स्वतःला झोकून देणारे सामाजिक पत्रकार म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारे राम खुर्दळ,आनंद(दादाजी)पगारे, मायाताई खोडवे या तिघांची कृतिशील पत्रकारितेची धडपड प्रेरणादायक आहे.

पत्रकारितेचा उदय पारतंत्र्यात झाला.त्यामागे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर,केसरीकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक,आगरकर,यांनी ज्या परिस्थितीत आपापली माध्यमे सुरू केली त्यासाठी प्रसंगी कित्येक त्रास व विवंचना,जाच भोगला.त्यांचा मार्ग खडतर होता,मात्र स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करतांना आज ही सामान्य माणसाची जीवघेणी धडपड,विवंचना कायम आहे,अश्याच मुद्द्यांना आपल्या।माध्यमातून वाचा फोडून थेट या लोकआस्थेच्या मुद्द्यांना तडीस नेईपर्यंत त्या त्या वंचित घटकांना जोडून तो सामाजिक मुद्दा तडीस नेण्याचे अनेक यशस्वी प्रयत्न करणाऱ्या या सामाजिक माध्यम कर्मींचा थोडक्यात प्रवास आज ६ जानेवारी २०२२ पत्रकार दिनी त्यांचे कडूनच जाणून घेऊ या.
*राम खुर्दळ ::-*
“मी मुळात ग्रामीण भागातील,बालपण खडतर, त्यानंतर प्राथमिक,माध्यमिक,
महाविद्यालयीन शिक्षणासाठी गुरे वळली,रानशिन्या गौऱ्या,कडू करंज्या विकून घेतलेली पाठय पुस्तके,घरातील वारकरी संस्कार,आई वडिलांची प्रपंचासाठी जीवघेणी धडपड,हे अनेक प्रसंग पाठीशी बांधून नोकरीसाठी हाती आलेली विवंचना,अनुभवलेली सामाजिक विषमतेची चीड,या मूळ थेट आर्थिक अडचणींमूळ हुकलेलं बीएड सोडून थेट अंगात भिनलेली ग्रामीण पत्रकारितेची वाट चालू लागलो,सोबत पथनाट्य,प्रासंगिक नाट्य,फोटोग्राफी,कथा,पटकथा लेखन,पेपेट,वक्तृत्वशैली,माहितीपट,चित्रपट निर्मिती असे कित्येक विषयाचे अभिव्यक्ती या सामाजिक संस्थेकडून शिक्षण घेतले.पत्रकारिता व विविध माध्यम शिक्षण याची सांगड घालून अंगात घरची स्वतःची प्रतिकुलता विसरून थेट सामाजिक मुद्दयांना वाचा फोडण्यात व्यस्त झालो,बदल्यात अनन्विक त्रास पदरी पडले,व्यावसायिक जीवनातून ही परावृत्त करण्याचे प्रकार घडले,प्रसंगी दमदाटया,मारहानी,दम दाटया,अडवणुकी नित्याच्या मात्र “रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग,घेतला वसा सोडणार नाही”हे संस्कार असल्याने कसोटीने १९९० ते आज पर्यंत ३२ वर्षे अविरतपणे सामाजिक विषयांना पत्रकारितेतून वाचा फोडली.त्याबदल्यात समाजकंटक मंडळींचे आड फाटे आडवे आले मात्र मार्ग सोडला नाही,सोडणार नाही,पत्रकारिता करताना तसेच शिवकार्य गडकोट संस्था स्थापन करून गडकिल्ल्यांच्या संवर्धनात १५ वर्षे अविरतपणे राबतोय,८ प्राचीन होळकर बारवामधील गाळ,कचरा काढला,नागलवाडी गावात ३५ वर्षे विविध ग्रामविकासाचे प्रयोग केले,वारकरी महामंडळात प्रचार प्रमुख म्हणून २० वर्षे कार्यरत आहे,शेतकरी वाचवा अभियान राबवून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या तसेच त्यांचे आत्मबळ वाढीसाठी जागृती केली,शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन सुरू केली त्यातून कित्येक मुद्द्यांना मार्ग दिला,श्रमदान घराघरात रुजवले,डोंगर टेकड्या,जल,जंगल,वाचवण्यासाठी पर्यावरण टास्क फोर्स माध्यमातून व प्रत्यक्ष कार्यरत आहे,सध्या मायाताई खोडवे,आनंद उर्फ दादाजी पगारे,व मी आम्ही पेठ तालुक्यातील कडवईपाडा धरण व्हावे येथील ४० गावाना पिण्याचे पाणी,शेतीला पाणी,व रोजगारासाठी आम्ही वाचा फोडत आहोत यावर लोकचळवळ,पाठपुरावा सुरु आहे.ही धडपड अविरतपणे सुरूच राहील,
*मायाताई खोडवे::-*
“मी मुळात कष्टकरी परिवारातील,वस्तीत राहणारी,घरातील चणचण कायमच शिक्षण अल्प झाले,त्यानंतर थेट कचरावेचक म्हणून आयुष्याची कित्येक वर्षे डम्पिंग ग्राउंडवर काढले,हे कष्टप्रद जीवन जगतांना सामाजिक मुद्द्यांची ओढ,व वस्तीतील दारिद्र,वाढलेली अस्वछता,लोकांची धडपड विवंचना स्वस्थ बसू देत नव्हती, घरच्या जबाबदाऱ्या त्यात सामाजिक मुद्द्यांची अस्वस्थता बघता मला अभिव्यक्ती संस्थेने व्हिडीओ माध्यम शिकवले,त्यामुळं मला व्हिडीओ कॅमेराचे आकर्षण झाले,अन सुरू झाला माझा समुदाय पत्रकारितेचा प्रवास,मी व्हिडीओ व्हॅलेंटीअर या गोवा स्थित आंतरराष्ट्रीय वृत्त संस्थेच्या “इंडिया अनहर्ड”या माध्यमात नाशिक जिल्हा ब्युरो म्हणून कार्यरत झाले,एरवी प्रचलित माध्यमात दखल नसलेल्या समुदाय पत्रकरितेसाठी मी झोकून कामाला लागले,त्यात प्रथमतः मी माझ्या आम्रपाली झोपडपट्टीत ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येऊन ते नागरिकांच्या घरांत जात होते.नागरिकांच्या आरोग्याचा मुद्दा होता त्यावर मी सविस्तरपणे व्हिडीओ वृत्त केले व त्याला इंडीया अनहर्ड ला प्रसिद्धी मिळाली.तोच व्हिडीओ सह्याद्री दूरदर्शन ला लागला,त्या वृतांत संबंधित महापालिका आरोग्य विभागात नागरिकांनी फोन करावा ते सविस्तर असल्याने या विषयाची तीव्रता समाजात पोहोचली,मात्र थेट महापालिकेला फोन तक्रारी गेल्याने आरोग्य विभागांने तातडीने हे उघड्यावरील ड्रेनेजचे घाण पाणी थांबवले,अन त्या विषयाचा बातमीचा परिणामाचा impact व्हिडीओ तयार केला तो ही प्रसिद्ध झाला.ही माझी पत्रकारितेची सुरुवात झाली,आम्ही केवळ वंचित मुद्दे व्हिडीओ वृत्त घेत नाही तर तो मुद्दा सुटेपर्यंत आम्ही लोकांमध्ये जागृती करतो,व मुद्दा सुटला की त्याच विषयाचा कृतिशील दुसरा व्हिडीओ बनतो या पत्रकारितेतून मी माझ्या समुदायातील कचरा वेचक महिलांचा व्हिडीओ न्युज केली अन त्या न्यूज चा परिणाम नाशिकरोड,नाशिक महापालिका स्वच्छता निरीक्षक यांनी दखल घेऊन कचरावेचक महिलांना हक्काचे ओळखपत्र मिळाले,याला जर्नलिष्ठ ऍक्टिव्हिजम फोरमची साथ मिळाली,त्यानंतर शिक्षणापासून वंचित मुलींचा ओझरखेड,गंगाम्हाळुंगीचा व्हिडीओ,ओझरखेड पुलाचा मुद्दा, वर्तमानपत्र वाटणाऱ्या महिलेची व्हिडीओ वृत्त,जलसंवर्धन,आरोग्य, शेती,नैसर्गिक आपत्ती,कष्टकरी संघटनांची धडपड,आशा सेविकांचा मुद्दा ज्याची शासनाने दखल घेतली,पेठ तालुक्यातील कडवईपाडा धरणाचा व्हिडीओ वृत्त असे हजारो विषय केवळ बातमीपुरते नाही तर त्यांना वाचा फोडण्यापर्यंत त्याचा पाठलाग केला,पाठपुरावा केला,लोक जागृतीतुन हे मुद्दे मार्गी लावले हा माध्यम परिवर्तनाचा प्रवास निरंतर सुरूच आहे,असेल,पुकार फिल्म प्रोडक्शनच्या सपान सरल चित्रपटात मी नायिकेची भूमिका केली आहे,एकूणच माझ्या कष्टप्रद प्रवासाला माझ्या कृतिशील पत्रकारितेने नवा आयाम मिळऊन दिला.”
*आनंद उर्फ दादाजी पगारे::-*
मी मालेगाव तालुक्यातील सायने या गावातील माझ्या माध्यम प्रवासात मी ऐन आयुष्याच्या उमेदीच्या वेळी मी गावात आलेल्या साथीचा रोग “चिकन गुणिया”विषयावर व्हिडीओ बनवला,त्याची दखल माध्यम संस्था व समुदायाने घेतली.अन स्थानिक नेते अधिकारी यांनी चिकन गुणियात नागरिकांची तपासणी,उपचार,स्थानिक स्वच्छता असे मुद्दे मार्गी लावले,त्यानंतर आमच्या गावाच्या जवळ म्हाडाच्या जागेत काही गरीब निराधार परिवार कित्येक वर्षे राहत,अचानक त्यांना घरे खाली करण्याची नोटिसा काढून त्यांना विस्थापित करण्याचे प्रकार थांबवण्यासाठी मी त्या लोकांना सोबत घेऊन व्हिडीओ केला त्याला वाचा फोडण्यासाठी पत्रकारांची साथ घेतली मात्र यामुळं भु माफिया भडकले होते,या मुद्द्यावर सातत्याने लढा उभारून त्यांना हक्कांचे घरे मिळवून दिली,रेशनिंग बाबतीत होणारा गैरप्रकार थांबवून नागरिकांना अधिकारासाठी व्हिडीओ वृत्त केले,त्यांचे मुद्दे चव्हाट्यावर आणले.लोकाना रेशनिंग चे अधिकार मिळवून दिले,हे सर्व ज्या तडपेने मी करीत होतो त्याच पद्धत्तीने माझे वैरी ही वाढत होते,एक दिवस गावातून मालेगाव ला येताना गुलाबवाडी जवळ राजकीय वरदहस्त असलेल्या माफियांनी मला मागून उडवून दिले,यामुळे माझा व्हिडीओ कॅमेरा चालवायचा उजवा हात फैक्चर झाला,ऑपरेशन झाले,मोठा खर्च झाला,वर्षभर त्यात होतो,पोलीस केस केल्यावर ही न्याय मिळाला नाही,शेवटी बेबंदशाही भ्रष्टशाहीचा अनुभव हाती घेऊन थेट एका सामाजिक माध्यम संस्थेत व्हिडीओ माध्यम निर्मिती कक्षात कामास होतो, देशभर व्हिडीओ माध्यम शिकवणे,व समुदायाचे व्हिडीओ करणे,या कामात ही काही काळानंतर वाईट अनुभव आले,व तत्वनिष्ठ असल्याने तेही सोडून थेट व्हिडीओ होलेंटीअर वृत्त ऑर्गनाइजेशन चा राज्याचा समन्वयक झालो,मोठ्या तडपेने कार्य केले,राज्यात नव्या दमाचे अभ्यासू पत्रकार घडवले,त्यांना योग्य दिशा दिली पत्रकारांच्या सुरक्षेसाठी आम्ही प्रयत्नवादी होतो,त्यानंतर आता काही वर्षांपासून मी चित्रपट क्षेत्रात आलोय,स्वतःचे पुकार फिल्म प्रोडक्शन सुरू करून “सपाण सरल”हा जल,जमीन,जंगल व कष्टकरी माणसावर त्याच्या राजकीय,प्रशासकीय विवंचनेवर चित्रपट साकारला,तो पूर्णत्वास आला अडून लवकरच तोही आपणास बघायला मिळेल,तसेच पत्रकारितेचा पिंड असल्याने सामाजिक मुद्द्यांना वाचा फोडून त्याला तडीस नेण्यासाठी अविरत धडपड सुरू आहे,मी माझे मित्र राम खुर्दळ,मायाताई खोडवे आम्ही तिघेही सध्या १९७२ पासून रखडलेल्या कडवईपांडा धरणासाठी जागृती,पाठपुरावा, आंदोलनात्मक विषयासाठी आम्ही लोकचळवळ उभी केली आहे.आम्ही समर्पित निस्वार्थी भावनेने झटतो,मिळते काय तर ऊर्जा व सामान्यांचे आशिर्वाद …

राम खुर्दळ(पत्रकार)
राज्य उपाध्यक्ष:- पत्रकार संरक्षन समिती,महाराष्ट्र