
घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
परमात्म्याला ओळखण्यातच जीवनाची धन्यता आहे.सर्व दु:खाचे मूळ मानवी मनातील वासना,इच्छा आशा या आहेत. मानवी गरजा फार कमी असतात व त्या परमेश्वर त्या गरजा पूर्ण करीत ही असतो पण माणूस अवास्तव इच्छेने ग्रासला गेला आहे.आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही स्तराला जात आहे व हेच दु:खाला कारण आहे.मानवी गरजा मर्यादित ठेवून मनाला प्रगल्भ करण्याची प्रक्रिया म्हणजे परमार्थ होय असे प्रतिपादन श्रीक्षेत्र विठ्ठलगड संस्थान भाटेपुरी येथे सुरु असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहात बोलताना डॉ.प्रमोद महाराज कुमावत यांनी केले.
‘ओळखीला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याच्या घरी सिद्धीसहित’ या शान्तिब्रम्ह एकनाथ महाराजांच्या हरिपाठातील अभंगावर त्यांनी निरुपण केले.निवृत्ती महाराज,ज्ञानेश्वर महाराज,नामदेव महाराज,नाथ महाराज व तुकाराम महाराज यांचेही हरिपाठाचे अभंग असून त्यांना पंचरत्नी हरिपाठ म्हणतात मात्र संत ज्ञानेश्वर महाराज व एकनाथ महाराज यांचा हरिपाठ वारकरी संप्रदायात सुप्रसिद्ध असून नित्य गायला जातो असेही ते म्हणाले.
या अखंड हरीनाम सप्ताहात वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी शुभम शिराळे,रवी गिर्हे,केदार वखरे,अविनाश दिवटे या चार बालकीर्तनकरांची कीर्तने संपन्न झाली तर हभप भगवान महाराज व हभप सोपान महाराज सोनटक्के यांची रामकथा सुरु आहे.या संस्थांचे प्रमुख हभप कैलास महाराज बोंद्रे व हनुमंत महाराज बोंद्रे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या वेळी हभप संतोष महाराज बुजाडे,सागर महाराज चापाईतकर,सीताराम आहेर,सातपुते महाराज यांच्या सह पंचक्रोसितील असंख्य भाविक उपस्थित होते.











































