Home विदर्भ घाटंजी नगर परिषदेच्या अध्यक्षा व उपाध्यक्ष यांच्या विरुद्ध सुरु असलेली नगर विकास...

घाटंजी नगर परिषदेच्या अध्यक्षा व उपाध्यक्ष यांच्या विरुद्ध सुरु असलेली नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या न्यायालयातील तक्रार खारीज..!

369

➡️ नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाविरुद्ध मा. उच्च न्यायालयात अपील दाखल करणार – नगरसेवक गजानन भालेकर.

अयनुद्दीन सोलंकी,

घाटंजी (यवतमाळ) – घाटंजी नगर परिषदेच्या अध्यक्षा अँड. सौ. नयना शैलेश ठाकुर, उपाध्यक्ष शैलेश गुलाबसिंग ठाकूर व अन्य तिन नगरसेविका विरुद्ध महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 च्या कलम 55 अ व ब तरतुदीनुसार घाटंजीचे नगरसेवक गजानन आप्पारावजी भालेकर यांनी दाखल केलेली तक्रार नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या न्यायालयाने खारीज केली असून कलम 42 ची कार्यवाही मागे घेण्यात आली आहे. दरम्यान, या पुर्वी मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवमानना केल्याची तक्रार नगरसेवक गजानन भालेकर यांनी उच्च न्यायालयात केली होती. त्यावरुन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती यांनी त्यांना अवमानना नोटीस बजावली होती, हे येथे उल्लेखनीय. 🔵 घाटंजी नगर परिषदेच्या अध्यक्षा अँड. सौ. नयना शैलेश ठाकुर, उपाध्यक्ष शैलेश गुलाबसिंग ठाकूर ह्यांनी नगर परिषद अंतर्गत कामकाजात अनियमितता व गैरवर्तन केले असल्याची बाब, महाराष्ट्र नगरपरिषदा,नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 मधील कलम 55 (अ व ब) नुसार शासनाच्या निदर्शनास आणून सदर बाब ही गैरवर्तनुकीत मोडत असल्यामुळे नगराध्यक्षा सौ. नयना ठाकुर, उपाध्यक्ष शैलेश ठाकूर विरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी केली होती. त्यानुसार यवतमाळचे जिल्हाधिकारी यांचे कडुन शासनाकडे चौकशी अहवाल सादर करण्यात आला होता. विशेषतः अमरावतीचे विभागीय आयुक्त यांनी जिल्हाधिकारी यांचा अहवाल सहमतीने शासनाकडे पाठवुन, घाटंजी येथील महाबलाय व्यायाम शाळेने अटीचा भंग करूनही त्यांना वाढीव बांधकाम करण्यास परवानगी देणे, सदर जागा राखीव असतांना राखीव जागेवर 10 वर्षाचा कालावधी होऊनही बगीच्याचा विकास केलेला नाही. सदरच्या ईमारतीत नगराध्यक्षा नयना ठाकुर, उपाध्यक्ष शैलेश ठाकूर हे वास्तव्य करत असून त्यामध्ये केबल नेटवर्कचा व्यवसाय सुरू असल्याचे म्हटले आहे. घाटंजी नगर परिषदेच्या गाळ्यामध्ये विना परवानगी बांधकाम करणे, सदर गाळ्यातील भागीदारीत प्रतिबंधित असलेल्या जागेवर बिअर शाँपी सारखा व्यवसाय सुरु केलेला आहे. तसेच याच गाळाच्या बाजुला असलेल्या विहीरिला बाजुने भिंत फोडून विना परवानगीने दरवाजा केलेला आहे. या सह अनेक गंभीर आरोप नगरसेवक गजानन भालेकर यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केले होते. 🔵 यवतमाळचे जिल्हाधिकारी यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिलेली उपरोक्त बाब ही गंभीर स्वरूपाची असल्यामुळे घाटंजीच्या नगराध्यक्षा सौ. नयना ठाकुर, उपाध्यक्ष शैलेश ठाकूर आणि नगरसेविका सुवर्णा गोमासे, सीताबाई गिनगुले व सुमित्रा मोटघरे यांच्या विरुद्ध कारवाई करणे आवश्यक असल्याने अधिनियमातील कलम 55 अ व ब, कलम 42 अंतर्गत सर्व गैरअर्जदारांना शासनाच्या वतीने 29 जानेवारी रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार 15 फेब्रुवारी रोजी त्यांनी शासनाकडे खुलासा सादर करुन तक्रारीमधील आरोप अमान्य केले होते. 🔵 विशेष म्हणजे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या न्यायालयाने घाटंजीचे नगरसेवक गजानन आप्पारावजी भालेकर यांनी केलेली तक्रार गैरअर्जदार विरुद्ध सिद्ध होत नसल्याने खारीज करण्यात आली असून कलम 42 अन्वये सुरु असलेली कार्यवाही शासनाने मागे घेतली आहे.
🔵 घाटंजी नगर परिषदेचे नगरसेवक गजानन भालेकर यांची प्रतिक्रिया घेतली असता, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाविरुद्ध आपण मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी व दिवाणी दोन्ही अपील दाखल करणार असुन सदर प्रकरणात उप विभागीय अधिकारी पांढरकवडा व जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या चौकशी अहवाला नुसार आपण आपल्या वकीलाचा सल्ला घेऊन घाटंजी पोलीस ठाण्यात लवकरच फौजदारी तक्रार दाखल करत असल्याचे त्यांनी सांगीतले. ⚫ गजानन आप्पारावजी भालेकर, नगरसेवक, नगर परीषद, घाटंजी