Home जळगाव निकोप लोकशाहीसाठी प्रत्येक मतदाराने राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून मतदान करावे – जिल्हा निवडणूक...

निकोप लोकशाहीसाठी प्रत्येक मतदाराने राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून मतदान करावे – जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

79
0

शरीफ शेख

रावेर , दि. २५ :- जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताकडे गर्वाने पाहिले जाते. अमेरिकेला आपल्या आधी स्वातंत्र्य मिळूनही तेथे सर्वांना समान मतदानाचा अधिकार उशिराने प्राप्त झाला. भारतात स्वातंत्र मिळाल्याबरोबर सर्वांना सारखाच मतदानाचा हक्क आपल्या घटनेने प्रदान केला. आणि घटनेने प्रदान केलेल्या हक्काबरोबरच आपले राष्ट्रीय कर्तव्याचा एक भाग म्हणून मतदाराने मतदान केलेच पाहिजे. तुमच्या एका मताला अनन्य साधारण महत्व असून तुमच्या एकेका मतानेच लोकशाही अधिक सुदृढ (निकोप) होण्यास मदत होते. तेव्हा प्रत्येक मतदारांने राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून आपला मतदानाचा हक्क निस्वार्थपणे बजवावा. असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी राष्ट्रीय मतदार दिनोत्सवानिमित्त फैजपूर येथील जे.टी.महाजन महाविद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय मतदार दिवसाच्या मुख्य कार्यक्रमात केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे विशेष अतिथी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील,जळगाव महानगर पालिकेचे आयुक्त डॉ.उदय टेकाळे,उपायुक्त मुठे, निवडणुक उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, फैजपुर उप विभागाचे उप विभागीय अधिकारी डॉ.अजित थोरबोले, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे, तडवी, उप विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, महिला बालविकास अधिकारी विजसिंग परदेशी, यावलचे तहसिलदार जितेंद्र कुवर, रावेरच्या तहसिलदार ऊषाराणी देवगुणे, प्राचार्य पी.आर.चौधरी,निवडणुक नायब तहसिलदार अनंत कळसकर, सुनिल समदाने, के.एम.पाटील यांचेसह जे.टी.महाजन महाविद्यालयातील तसेच धनाजी नानाजी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी , केंद्रस्तरीय अधिकारी (B L O) नवमतदार, प्रशासनातील विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी खिरोदा विद्यालयाच्या विद्यार्थीनिंनी स्वागतगीत सादर केले.स्वागतगीतानंतर मान्यावरांच्या हस्ते मतदार याद्या अद्ययावत करणे निवडणूक प्रक्रीयेला व्यापक प्रमाणात पारदर्शकता मिळवून देण्याकामी विशेष कार्य केल्याबद्दल केंद्रस्तरीय अधिकारी (B L O) यांचा ,विविध उपक्रमांत भाग घेणाऱ्या विद्यार्थी, सिमा सुरक्षा दलात सेवा करणाऱ्या स्थानिक जवानांचा प्रशस्ती पत्रक, जिल्ह्याचे पर्यटन आणि भौगोलिक माहिती बोलक्या चित्रमय स्वरूपात दर्शविणारे कॉपीटेबल बुक देवून यथोचित सत्कार करण्यात आला. नव मतदारांना मतदान कार्डाचे वाटप करण्यात आले.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी यावेळी सर्व उपस्थितांना देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करणे आणि मुक्त, नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू अशा आशयाची शपथ दिली.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे म्हणाले की, प्रत्येक मतदाराने मतदान करून अन्य मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे. मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रशासनाकडून भित्ती पत्रके, बॅनर्स,पथनाट्ये यांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात नवमतदारांच्या संख्येत लक्षणीयवाढ झाली आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक युवक- युवतींनी मतदार म्हणून नोंदणी करावी. निवडणूक आयोगाने दिव्यांगांना विशेष व्यक्तींचा दर्जा दिला आहे. दिव्यांग व वृध्द व्यक्तींना मतदानासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याने कोणताही दिव्यांग मतदार केवळ दिव्यांगाच्या कारणास्तव यापुढील सर्वच निवडणूकांत मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनातर्फे घेण्यात येत आहे.
प्रास्ताविकात फैजपुरचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून जास्तीत जास्त नवमतदार नोंदणी, मतदानाविषयी नागरिकांकडून अपेक्षित जागृकता आणि लोकशाहीत मतदानाचे महत्व विस्तृतपणे विषद केले.
विशेष अतिथी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील यांनी भारताची लोकशाही परंपरा अधिक वृंध्दिगत होण्यासाठी प्रत्येकाने मतदान तर केलेच पाहिजे शिवाय मतदान, मतदार याद्या अद्यायावत व त्यांची पारदर्शकता अबाधित राहण्यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रशासनास सहकार्य करावे. प्रत्येकाने निर्भिडपणे तसेच निस्वार्थीपणे मतदान करून आपण एक जबाबदार मतदार आहोत असे सिद्ध करावे.

जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी.ए.बोटे यांनी नवमतदारांना उद्देशुन आपल्या प्रोत्सहनपर भाषणात म्हणाले की, मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी नवमतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवून घेवून या देशाचे जबाबदार नागरिक बनून आपल्या बरोबरच आपल्या कुटुंबातील आपले आई-वडील, वृद्ध आजी-आजोबा व आपल्या परिसरातील इतर मतदाराना मतदानाच्या दिवशी मतदानास घेवून जाण्यासाठी त्यांनी निवडणूक प्रकियेतील एक दूत म्हणून स्वत:ला सिध्द करावे.
सूत्रसंचालन जे.टी.महाजन महाविद्यालयातील प्रा.राजपूत, जे.डी.बंगाळे यांनी तर आभार रावेरच्या तहसिलदार ऊषाराणी देवगुणे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, फैजपूर उप विभागीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना परिश्रम घेतले.