Home मराठवाडा आई-वडिलांना विश्वासात घेऊनच चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवा रोटरीच्या शारदोत्सव व्याख्यानमालेत अभिनेत्री प्रणाली घोगरेचा...

आई-वडिलांना विश्वासात घेऊनच चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवा रोटरीच्या शारदोत्सव व्याख्यानमालेत अभिनेत्री प्रणाली घोगरेचा सल्ला

145

जालना/लक्ष्मण बिलोरे

– चित्रपट सृष्टीत ग्लॅमर, पैसा दिसत असलातरी, धावपळीत आरोग्य सांभाळणे यासह अनेक नियम पाळावे लागतात, संवाद पाठ करावे लागतात, कधीकधी एका मिनिटाचा शूट करण्यासाठी दिवस जातो कारण प्रत्येक शूट दहा अँगलने करावा लागतो. आज केले, त्यापेक्षा उद्या अधिक चांगले काम दुसऱ्या दिवशी करावे लागते आणि ते समर्पित भावनेने. तरच या क्षेत्रात करिअर शक्य आहे. या क्षेत्रात पाऊल ठेवताना अनेकवेळा फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे या क्षेत्रात पाऊल ठेवताना सर्वप्रथम आई-वडिलांना विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावा, असा सल्ला अकलूज कन्या तथा रणांगण या मराठी चित्रपटाची अभिनेत्री तसेच हिंदी, तेलगू चित्रपटासह अनेक मालिकांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री प्रणाली घोगरे हिने दिला.
रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊन, रोटरी क्लब ऑफ वाई, रोटरी क्लब ऑफ अकलुज यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र उत्सवानिमित्त नारी शक्तीचा गौरव करणारी शारदोत्सव ही ऑनलाईन व्याख्यानमाला सुरू आहे. आज रविवारी (ता. 10) या व्याख्यानमालेचे चौथे पुष्प चतुरस्त्र अभिनेत्री प्रणाली घोगरे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध कंपन्या, एनजीओ शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून काळाच्या थोडे पुढे जाऊन नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या अत्यंत कर्तबगार महिला गीताली पवार यांनी संयुक्तपणे गुंफले. या व्याख्यानमालेत रोटरी क्लबचे प्रांतपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपावले, उपप्रांतपाल डॉक्टर सुमित्रा गादिया, प्रांतपाल नॉमिनी स्वाती हेरकर, महिला सबलीकरण संचालक महानंदा सोनटक्के, रोटरी क्लब ऑफ अकलुजचे अध्यक्ष सी.ए. नितीन कुदाळे, सचिव गजानन जवंजाळ, रोटरी क्लब ऑफ वाईचे डॉ. प्रेरणा ढोबळे, सचिव तथा अध्यक्ष दिपक बगाडे, रोटरी क्लब ऑफ जालनाचे अध्यक्ष महेंद्र बागडी, रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊनचे अध्यक्ष अॅड. महेश धन्नावत, सचिव प्रशांत बागडी व सदस्य मोठ्या संख्येने ऑनलाइन सहभागी झाले होते.
चित्रपट सृष्टीतील स्वतःच्या वाटचालीची माहिती देतानाच, या या क्षेत्रात पाऊल ठेवू इच्छिणार्‍या युवतींना मार्गदर्शन करताना प्रणाली म्हणाली की, आपल्यातील कलेला सादर करण्यासाठी प्लॅटफॉर्म हवा असतो, तोपर्यंत आपल्यातील टॅलेंट जनतेपर्यंत पोहोचत नाही. या क्षेत्रात भरपूर पैसा आणि ग्लॅमर असतो, असा प्रत्येकाचा समज असतो. वास्तविकता अशी आहे की, कलावंतांना ठराविक पगार नसतो. जेवढे दिवस काम केले, तेवढ्याच दिवसाचे पैसे मिळतात. कोरोणा परिस्थितीमुळे चित्रपट सृष्टीवरही दूरगामी परिणाम झाले. अशावेळी या क्षेत्रातील कलावंतांनाही मदतीची गरज आहे. मदत करू इच्छिणार्‍यासाठी या क्षेत्रात समाजसेवेला मोठा वाव असून, आपणासही समाजसेवेची इच्छा आहे. रोटरीसारख्या समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून आपण समाज सेवेला प्राधान्य देणार असल्याचे प्रणाली घोगरेने सांगितले.
यावेळी “बिग इन जर्नी” या विषयावर बोलताना गीताली पवार म्हणाल्या की, ज्यांचे प्रेरणास्त्रोत आई-वडील असतात, त्याच महिला आपापल्या क्षेत्रात उंच भरारी घेऊ शकतात. आपणास आई-वडिलांसह वडिलांकडून समाजसेवेची प्रेरणा मिळाली. आईला कॅन्सरचे निदान झाल्यानंतर मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे कॅन्सर रुग्णांची अवस्था आणि परिस्थिती जवळून बघायला मिळाली आणि त्यांच्यासाठी काहीतरी करावे म्हणून विचार मनात आला. त्यानंतर लिटल मोअर या संस्थेच्या माध्यमातून कामाचा श्रीगणेशा केला. शासकीय योजनेत उपचार घेणाऱ्या रुग्णांना प्रारंभी फाईल दाखल करेपर्यंत पैशाची आवश्यकता असते. मात्र या योजनेत फक्त उपचार होतात त्यामुळे अनेक जण पैसे आणत नाहीत परिणामी आणि वेळी त्यांच्यावर धावपळ करण्याची वेळ येते. ही बाब विचारात घेऊन अशा रुग्णांना प्राथमिक स्वरूपात पाच हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याला सुरुवात केली. सोबतच सन 2018 पासून वडिलांच्या स्मृत्यर्थ शांताराम पवार पुरस्कार योजना सुरू करून 8 विद्यार्थ्यांना एकूण एक लाखावर निधी तर शाळेला तीस हजार रुपये देणे सुरू केले. संशोधनासाठी गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदत म्हणून शिष्यवृत्ती योजना सुरू केल्याची माहिती गीताली पवार यांनी दिली. कोरोना काळात प्रारंभी मास्क आणि पीपी किटस मिळत नव्हत्या, त्यामुळे दानदाते यांच्या माध्यमातून पीपी किट आणि मास्कचे कंटेनर आम्हाला प्राप्त झाले. त्यातून 2 लाख मास्क आणि डॉक्टर्सना पीपी किट, सर्जिकल हॅन्डग्लोज उपलब्ध करून दिले. आजघडीला टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आमच्या संस्थेचे 200 स्वयंसेवक कॅन्सर रुग्णांच्या सेवेत कार्यरत असल्याची माहिती देऊन समाज सेवेतून आत्मिक समाधान लाभते, असे गीताली पवार यांनी सांगितले.
या व्याख्यानमालेत दररोज सायंकाळी 5 वाजता सहभागी होऊन मान्यवर वक्ते आणि कर्तबगार महिलांच्या व्याख्यानाचा रोटरी सदस्यांसह जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाउनचे अध्यक्ष ॲड महेश धन्नावत यांनी केले आहे.