
घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
जालना जिल्ह्यात मोटारसायकल चोरट्यांचे रॅकेट उघडकीस आले असून पोलिसांनी सुमारे ११ लाख रुपयांच्या चोरीच्या २१ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.या प्रकरणी
दोन सराईत दुचाकी चोराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
चोरीच्या मोटारसायकली फायनान्स कंपनी ने जप्ती केल्याचे भासवून विक्री करण्याचा गोरखधंदा राजरोसपणे सुरू होता.स्थानिक गुन्हे शाखेने घनसावंगी तालुक्यात मोठी कारवाई केली आहे.
घनसावंगी तालुक्यात चोरीच्या मोटरसायकली विकणारी टोळी मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांना खबऱ्याकडून मिळाली होती.
हे चोरटे फायनान्स कंपनीने जप्त केलेल्या मोटारसायकली असल्याचे भासवून ग्रामीण भागातील ग्राहकांना हेरून विक्री करत असल्याचे पुढे आले आहे.
घनसावंगी येथील कृष्णा जालिंदर सोमवारे आणि राणीऊंचेगाव येथील ईश्वर नामदेव जाधव या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून वेगवेगळ्या ठिकाणावरून तब्बल २१ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, पोलीस कर्मचारी संजय मगरे, रंजीत वैराळ, देविदास भोजने, भागवत खरात, जगदीश बावणे, परमेश्वर धुमाळ, किशोर पुंगळे आदींनी केली आहे. यामध्ये आतापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आली असली तरी देखील अनेक चोरट्याचा यामध्ये समावेश असण्याची शक्यता आहे.











































