Home मराठवाडा पूरग्रस्त अनेक गावांत ग्रामसेवक, तलाठी फिरकलेच नाहीत…

पूरग्रस्त अनेक गावांत ग्रामसेवक, तलाठी फिरकलेच नाहीत…

238

कामचुकार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी

घनसावंगी- लक्ष्मण बिलोरे

– जालना जिल्ह्याच्या   अंबड-घनसावंगी तालुक्यात सलग चार दिवस ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी होऊन तालुक्यातील गोदावरी नदिसह सर्वच मुख्य व उप नद्यांना महापूर आला होता.या पूरपरिस्थिती मध्ये गावकऱ्यांना सर्व प्रथम दिलासा मिळतो तो ग्रामस्तरावरील ग्रामसेवक व तलाठी यांच्या कडून मोठी मदत होते.मात्र पूरग्रस्त असलेल्या अनेक गावांत ग्रामसेवक व तलाठी फिरकलेच नाहीत.तसेच तलाठी,ग्रामसेवक,मंडळ अधिकारी यांना संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी फोन केल्यास हे कर्मचारी शेतकऱ्यांचा फोन उचलत नाहीत.अशा कामचुकार कर्मचाऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती अधिनियम २००५ नुसार तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी.याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अंबडचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी अंबडचे नायब तहसीलदार शिनगारे यांना ८ सप्टेंबर बुधवार रोजी याबाबत निवेदन दिले.शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे घनसावंगी तालुका प्रमुख विश्वंभर भानुसे यांनीही तहसील नरेंद्र देशमुख यांना निवेदन देवून ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याची पाहणी करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी लाख रुपये मदत देण्याची मागणी केली, शेतकरी तथा शिवशाहीर अरविंद घोगरे यांनीही शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली.खरीप हंगामातील कपाशी, तूर,सोयाबीन, मूग,मक्का व बाजरी पिकांसह मोसंबी,डाळिंब या फळबागाचे ही आतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. अनेक ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यक हे बाधित क्षेत्राच्या पंचनाम्यासाठी अद्याप धजावले नाहीत.
              तसेच अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात अनेक लहान-मोठ्या नद्यासह गोदावरी नदीस ही महापूर आला होता.अश्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात ग्रामसेवकांनी मुख्यालयी थांबणे आवश्यक होते.मात्र आपत्तीच्या काळात कुठे ही ग्रामसेवक मुख्यालयी थांबलेले तर सोडाच तिकडे फिरकलेच नाहीत,असे दिसून आले आहे.त्यामुळे या कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.
             या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे,सचिव पांडुरंग गटकळ,जेष्ठ नेते राधाकिसन मैंद, पत्रकार अशोक गायकवाड, विद्यार्थी परिषद जिल्हाप्रमुख गणेश गावडे, उपसरपंच अशोक जाधव आदींच्या सह्या आहेत.