Home मराठवाडा पोळा सणासाठी सजवलेला बैल नदीच्या पात्रात पडल्याने दगावला,बोडखा गावावर पसरली शोककळा

पोळा सणासाठी सजवलेला बैल नदीच्या पात्रात पडल्याने दगावला,बोडखा गावावर पसरली शोककळा

1270

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

पोळा म्हणजे बळीराजाच्या लाडक्या सर्जा-राजाचा सण, वर्षभर बैलांच्या संगतीने राहून शेतात कष्ट करायचे, अजूनही ग्रामीण भागातील शेतकरी गाई, बैलांना वैरण काडी केल्याशिवाय जेवत नाहीत.गुराढोरांची तहानभूक शेतकऱ्यांना लागते.

बैलांवर जीवापाड प्रेम असणाऱ्या बैलांचा सण पोळा शेतकरी राजा उत्साहात साजरा करतात. खांदे मळणीच्या दिवशी बैलांना,गाई, वासरांना मोकळ्या पाण्यात धुतात आणि पोळ्याच्या दिवशी शेतातच बैलांना रंगरंगोटी करून सजवून गावात आणतात.ऐन पोळा सणाच्या दिवशी सजवलेल्या बैलांना घराकडे आणत असताना नारोळा नदीच्या पुलावरून पाणी वाहत होते.पाण्यातून वाट काढत असताना बैल पुलावरून पडला. पुराच्या वाहत्या पाण्यात बैल पडल्याने पुलाच्या नळकांडीत अडकला आणि गतप्राण झाला. ऐन बैलांच्या सणाच्या दिवशीच बैलाचा दुर्दैवी अंत झाल्याने बैल पोळा सणावर शोककळा पसरली आहे.
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील बोडखा येथे हि दुर्घटना घडली.बोडखा येथील अभिमान विश्वनाथ ढेरे या शेतकऱ्याचा खिलार बैलाची जोडी रंगरंगोटी करून,सजवून गावाकडे निघाली होती.नदीच्या पुलावरून पाणी वाहत होते.एक बैल पुलावरून खाली पडला आणि पुलाच्या नळीत अडकून मरण पावला.शनिवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे नारोळा नदीला पूर आला होता. पाणी पुलावरून वाहत होते. पाण्याचा अंदाज न आल्याने बैल नदीच्या पात्रात पडल्याने दगावला. अभिमान ढेरे या शेतकऱ्यांच्या कुटुंबावर संकट ओढवले आहे.,ऐन सणासुदीच्या काळात दुखवटा निर्माण झाला.या शेतकऱ्याचे बैल दगावल्याने ५५ हजारांचे नुकसान झाले आहे.महसुल विभागाने या घटनेचा पंचनामा करून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.