Home विदर्भ हृदयविकारामुळे होणारे मृत्यु रोखण्यासाठी राज्यात दहा जिल्ह्यांमध्ये ‘स्टेमी’ प्रकल्प – राजेश टोपे

हृदयविकारामुळे होणारे मृत्यु रोखण्यासाठी राज्यात दहा जिल्ह्यांमध्ये ‘स्टेमी’ प्रकल्प – राजेश टोपे

61
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

प्रकल्पात वर्धा जिल्हयाचा समावेश…

वर्धा , दि. २३ :- हृदयाला रक्त पुरवठा कमी झाल्याच्या कारणांमुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण राज्यात जास्त आहे. ते लक्षात घेता आता ‘स्टेमी’ (ST Elevation in Myocardial Infarction) या प्रकल्पाच्या माध्यमातून हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना गोल्डन अवरमध्ये उपचार देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प सुरु करण्यात येणार असून वर्धा जिल्याचा यामध्ये समावेश करण्यात येत असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले.
कोरोनरी आर्टरी आजारामुळे ग्रामीण भागातील तीन ते चार टक्के आणि शहरी भागात आठ ते दहा टक्के व्यक्तींना हृदयरोग होतो. त्यामुळे मृत्युचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. ही परिस्थिती रोखण्यासाठी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सुवर्ण तासात (गोल्डन अवर) औषधोपचार करुन मृत्युचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट ‘स्टेमी’ प्रकल्पाच्या माध्यमातून केले जाणार आहे.
‘स्टेमी’ प्रकल्प पुणे, नागपूर, औरंगाबाद, नांदेड, अकोला, नाशिक, ठाणे, रत्नागिरी, सोलापूर आणि वर्धा या 10 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात राबविण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.
या प्रकल्पामध्ये ‘स्पोक’ व ‘हब’ हे मॉडेल वापरण्यात येणार आहे. ‘स्पोक’मध्ये उपजिल्हा व जिल्हा रुग्णालय यांचा समावेश असून त्या ठिकाणी अतिदक्षता विभाग आणि हृदयविकारासंबंधी अतितत्काळ सेवा दिल्या जातात. अशा रुग्णालयांचा समावेश आहे. राज्यात 110 ठिकाणी ‘स्पोक’ स्थापन करण्यात येणार असून तेथ दोन खाटांचा अतितत्काळ विभाग सुरु करण्यात येईल. त्याठिकाणी ईसीजी यंत्र लावण्यात येईल. तेथे ईसीजी तंत्रज्ञ असेल. याठिकाणी रुग्ण आल्यावर त्याचा ईसीजी काढला जाईल आणि तो माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने क्लाऊड कनेक्टिव्हीच्या माध्यमातून तज्ज्ञांकडे पाठविला जाईल. तज्ज्ञांद्वारे औषधोपचाराबाबत दहा मिनिटांच्या आत मार्गदर्शन केले जाईल. स्पोकमध्ये रुग्णांचा ईसीजी करुन हृदयविकाराचा झटका आला की नाही याची तपासणी केली जाते. झटका आलेल्या रुग्णाला तत्काळ रक्ताची गुठळी पातळ करण्याचे औषध (थ्राँबोलिसिस) दिले जाईल. त्यानंतर त्या रुग्णाला हब येथे पुढच्या उपचारासाठी पाठविले जाईल.
‘हब’मध्ये हृदयरोग तज्ज्ञ आणि हृदय शस्त्रक्रिया करण्याची सोय असलेल्या मोठ्या शासकीय व खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. त्यामुळे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी व बायपास शस्त्रक्रिया केल्या जातात अशा वैद्यकीय महाविद्यालय, महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत सहभागी असलेली खासगी रुग्णालये यांचा यात समावेश आहे. राज्यात अशी 27 हब असणार आहेत. हब येथे हृदयविकाराच्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून केले जातील असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

स्टेम प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना तत्काळ उपचाराची सुविधा मिळणार असून त्यामुळे या आजारामुळे होणारे मृत्यु रोखण्यात यश येईल असा विश्वास आरोग्ययमंत्री श्री.टोपे यांनी व्यक्त केला.