Home मराठवाडा अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगावची सुकन्या आदिती कटारेचे वायुसेनेचे स्वप्न साकार

अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगावची सुकन्या आदिती कटारेचे वायुसेनेचे स्वप्न साकार

1287

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला शाळेत कर्नलचे देशभक्तीपर भाषण ऐकून प्रेरित झालेली एक मुलगी वायुसेनेत जाण्याचे स्वप्न पाहते.ती केवळ स्वप्नच पाहत नाही.तर त्यासाठी बीटेकचे शिक्षण घेते आणि आपल्या ध्येयासाठी अमेरिकेतील चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये मिळालेला प्रवेशदेखील नाकारते.वायुसेनेत जाण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या त्या रणरागिनीचे नाव आहे आदिती कटारे.तीने दिलेल्या ‘एएफसीएटी’ची परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत संपूर्ण देशातून २४० जणांची निवड झाली.त्यात आदितीचा समावेश आहे.

जालना जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब म्हणजे आदिती ही मूळची अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथील रहिवासी आहे.भारतीय वायुसेनेने बुधवारी रात्री जाहीर केलेल्या यादीत,पुण्यातील पिंपरी चिंचवड (मूळ साष्ट पिंपळगाव) येथील आदिती कटारे हिची निवड झाली आहे.आदितीचे नाव सदर यादीत आल्यावर तिच्या पालकांवर व कुटुंबियांवर अभिनंदनाचा मोठा वर्षाव होत असून अनेकांनी तीचे अभिनंदन केले.आदिती ही उद्योजक कल्याणराव कटारे यांची कन्या तर शिवाजीराव कटारे यांची पुतणी आहे.तिने ऑक्टोबर २०२० ला ‘एएफसीएटी’ची परीक्षा दिली होती.केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भारतीय वायुसेनेच्या फ्लाईंग आणि टेक्निकल विभागासाठी ही परीक्षा घेण्यात आली.त्याचा रिझल्ट बुधवारी जाहीर झाला.या परीक्षेत संपूर्ण देशातून २४० जणांची निवड झाली त्यात आदितीचा समावेश आहे.

आदितीचे दहावीपर्यंतचे शिक्षण पुण्यातील कमलनयन बजाज शाळेत झाले.१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला झेंडावंदनासाठी रिटायर कर्नल प्रकाश सुर्वे शाळेत यायचे.त्यांच्या भाषणाने आदितीला हा मार्ग सापडला.तेव्हापासून तीने देशसेवेत जायचे स्वप्न पाहिले.इयत्ता बारावीमध्ये चांगले मार्क घेऊन बी.टेक.करण्यासाठी पुण्यातील व्ही.आय.टी.कॉलेज बिबेवाडीला ऍडमिशन घेतले.बीटेक नंतर आदितीने जीआरई परीक्षेत चांगले गुण मिळवून अमेरिकेतील चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश देखील मिळवला.पण तीला देश सेवेतच जास्त रस असल्याने तीने ही परीक्षा दिली.नोकरी करतानाच तीने भारतीय सेवेतील प्रवेशाच्या परीक्षेसाठी खडतर परिश्रम घेतले आणि ही परीक्षा उत्तीर्ण होऊन ५ दिवसांचा ज़टिल एसएसबी इंटर्व्यूसुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली.येत्या ५ सप्टेंबर पासून ती हैदराबाद मधील प्रशिक्षणास सुरुवात करणार आहे.

ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर एरोनॉटिकल इंजिनीयर ही डिग्री मिळवून फ्लाईंग ऑफिसर म्हणून ती इंडियन एअर फोर्समध्ये सहभागी होऊन देश सेवा करणार आहे.आदितीच्या या यशाबद्दल तीच्या मूळ गावी साष्ट पिंपळगाव व परिसरात मोठ्या प्रमाणात आनंद साजरा होत आहे.

पहिल्याच प्रयत्नात मिळाले मोठे यश ■

वायुसेनेत जाण्याचे स्वप्न ते निवडीपर्यंतच्या प्रवासाविषयी माहिती देताना अदिती म्हणाली की,वायुसेनेत जाण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची एएफसीएटी आणि ईकेटी अशा परीक्षा ऑक्टोबरमध्ये दिल्या होत्या.यामध्ये निवड झाल्यानंतर गांधीनगर या ठिकाणी ५ दिवसांची मुलाखत प्रक्रिया पार पडली.यासाठी जवळपास ३०० मुली आल्या होत्या.त्यापैकी केवळ ७ मुलींची निवड केली.यामध्ये माझा समावेश होता.विशेष म्हणजे मला हे यश पहिल्याच
प्रयत्नात मिळाले.

बालवयातच मिळाली वायुसेनेत जाण्याची प्रेरणा ■

कमलनयन बजाज शाळेत १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला कर्नल प्रकाश सुर्वे यायचे आणि विद्यार्थ्यांना सैन्यामध्ये भरती होण्यासाठी प्रेरणा द्यायचे.बिबवेवाडीच्या व्हीआयटी कॉलेजमधून बी.टेक.कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेत असताना माझे मित्र-मैत्रिणी वायुसेनेत भरती होण्याच्या परीक्षांचा अभ्यास करायचे.त्यांनी तसेच माझ्या भावाने प्रोत्साहन दिले.मग मी वायुसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.येत्या ५ सप्टेंबरपासून एअरफोर्स अकॅडमी हैदराबाद येथे प्रशिक्षणास सुरुवात करणार आहे.माझ्या या यशात आई,वडील तसेच माजी सैनिक कर्नल प्रकाश सुर्वे आणि कर्नल ब्राह्मणकर यांचा मोलाचा वाटा आहे.

मुलींना तीनही सैन्यदलात खूप प्रमाणात संधी उपलब्ध आहेत.याचा जास्तीत जास्त मुलींनी व मुलांनी याचा फायदा घ्यावा आणि देशसेवेचा मार्ग निवडावा.ग्रामीण भागातील मुलं व मुली या कष्टाळू व हुशार असतात.परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांना या क्षेत्राची माहिती मिळत नाही.त्यामुळे आपण लहान वयातच आपले ध्येय निश्चित करून ते गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आवश्यक आहे.