Home मराठवाडा सासू-सुनेचा असाही प्रमाणिकपणा… रस्त्यावर सापडलेले ४९ हजार रुपये केले पोलीस ठाण्यात जमा

सासू-सुनेचा असाही प्रमाणिकपणा… रस्त्यावर सापडलेले ४९ हजार रुपये केले पोलीस ठाण्यात जमा

491

जालना- लक्ष्मण बिलोरे

जालना शहराजवळील इंदेवाडी येथील सुनिता ईश्वर पांडव आणि शशिकलाबाई शंकर पांडव या मोलमजुरी करणाऱ्या सून आणि सासू यांनी प्रामाणिकपणा दाखवून सापडलेले 49 हजार रुपये आणि महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास शेळके यांच्याकडे जमा केली आहे. घरची गरिबीची परिस्थिती असतांनादेखील दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल पोलीस प्रशासनाने सासू-सुनेचे कौतुक केले आहे._
31 जुलै रोजीच्या रात्री दहा वाजेच्या सुमारास सौ. सुनिता ईश्वर पांडव आणि त्यांची सासू शशिकलाबाई शंकर पांडव या दोघी इंदेवाडी परिसरातील त्यांचे नातेवाईक कृष्णा पांडव यांना भेटून घराकडे पायी परत जात होत्या. त्यादरम्यान, अंबड रोडवरील पाण्याच्या टाकीजवळील एका स्पीडब्रेकरजवळ एक मेनकापडाची बॅग त्यांना सापडली होती. या बॅगमध्ये रोख 50 हजार रुपये, चेकबुक, बँकेचे पासबुक आणि काही महत्त्वाचे कागदपत्रे होते. दुसऱ्या दिवशी सुनिता पांडव यांची आई आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी त्या सासु यांच्यासोबत मुंबई येथे गेल्या. त्यांनी मुंबईत पोहोचल्यानंतर तालुका जालना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. व्ही. अंभोरे आणि पोलीस कर्मचारी वसंत धस यांना दूरध्वनी करून आपल्याला पैशाची बॅग सापडली असून मुंबईहून आल्यानंतर पोलीस ठाण्यात जमा करते असे कळविले होते. काल रात्री मुंबईहुन परतल्यानंतर त्यांनी तातडीने आज सकाळी तालुका जालना पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक देविदास शेळके यांच्याकडे रोख रक्कम असलेली बॅग जशास तशी जमा केली आहे. या दोघी सासू-सुनेने दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल पोलीस निरीक्षक शेळके यांनी त्यांचे कौतुक करून पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे. या सासू-सुनेने दाखविलेल्या प्रामाणिकपणाचा आदर्श सर्वांनी घ्यावा, असेही आवाहन शेळके यांनी केले आहे._

_यासंदर्भात पोलीस निरीक्षक देविदास शेळके यांनी सांगितले की, पीरपिंपळगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक सिद्धार्थ मोरे यांची ही बॅग असल्याचे कागदपत्रावरून स्पष्ट झाले आहे. मोरे यांनी आपली पैसे असलेली बॅग हरवल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात 1 ऑगस्ट रोजी दिलेली आहे. ते सध्या बाहेरगावी आहेत. त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून ही बॅग परत करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.