Home सातारा कोरोनाच्या संकटात घुंगरांवर बंदी, कलाकरांच्या उपासमारीचा प्रश्न सोडवा

कोरोनाच्या संकटात घुंगरांवर बंदी, कलाकरांच्या उपासमारीचा प्रश्न सोडवा

127

आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता लावणीसेवक शिवम इंगळे यांची मागणी

मायणी प्रतिनिधी / सतीश डोंगरे

महाराष्ट्र हा विविध लोककला गुणांनी परिपूर्ण आहे. विविध प्रकारच्या पारंपारिक लोककलांची जपवणूक आज देखील ह्या महाराष्ट्राच्या मातीत पहावयास मिळते. सध्याच्या कोरोना महामारी संकटकाळातील परिस्थितीचा आढावा घेता सर्वच व्यवसाय ठप्प झालेले आहेत. त्याप्रमाणेच लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य कलाकारांची देखील मोठया प्रमाणात उपासमार होत आहे. लॉकडाऊन तर एक विषय झाला पण सरकारकडून आजपर्यंत सर्वसामान्य कलाकारांसाठी एकही योजना राबविण्यात आलेली नाही. याची खंत एकंदरीत सर्वसामान्य कलाकारांना वाटते. कलाकार हा स्व:इच्छेने बनलेला असतो आणि ते प्रत्येकाला होता येत नाही.
संपूर्ण जगभरात कोरोना सारख्या महामारीने थैमान घातले असताना अशा वेळी सर्वसामान्य कुटुंबातील कलाकारांची मोठ्या प्रमाणात उपासमार होत आहे. सध्याच्या परिस्थितीत सरकारने सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी म्हणजे स्पॉट बॉय, स्वच्छता कर्मचारी, मेकअप आर्टिस्ट, लाइटमन, कॅमेरामॅन ते सादरीकरण करणारा कलाकार यांच्यावर बंदी. त्याबरोबरच विविध नृत्य परीक्षक यांचे देखील वर्ग बंद आहेत. लाॅकडाऊनमुळे कलाकारांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागत आहे. या टाळेबंदीची आमच्या घुंगरांवरसुद्धा बंदी झाली आहे व कलाकार वर्ग उध्वस्ततेच्या मार्गावर आहे.
सरकार या महामारीवर आपले काम पूर्ण एकनिष्ठेने करताना दिसत आहे व ते खूप प्रयत्नशील आहे व त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या सर्व भूमिका योग्य आहेत. तरी मी सर्व जगभरातील कलाकारांची व्यथा एक कलाकार असण्याच्या नात्याने सरकारपुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय तरी मा.मुख्यमंत्री साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी सर्वसामान्य कलाकारांच्या होणाऱ्या उपसमारीचा प्रश्न मिटवून येणाऱ्या नवीन कलाकार पिढीला प्रोत्साहन द्यावे.