Home महत्वाची बातमी घरकुलाच्या अंतिम धनादेशाच्या प्रतीक्षेत गणेशरावांनी सोडला प्राण

घरकुलाच्या अंतिम धनादेशाच्या प्रतीक्षेत गणेशरावांनी सोडला प्राण

194
0

नव्वद वर्षाच्या वयोवृद्ध लाभार्थ्याची नगरपंचायतने केली हेळसांड

घरकुलाचे बांधकाम पूर्ण करूनही रक्कम दिलीच नाही

आष्टी नगरपंचायतचा अजब कारभार

रविंद्र साखरे – आष्टी (शहीद)

वर्धा –  कोणी घर देता का घर! असे म्हणत बेघर असणाऱ्या 90 वर्षाच्या गणेशरावांना रमाई आवास योजने हक्काचे घर दिले. या घरकुलाचे बांधकाम पूर्ण केल्यानंतर नगरपंचायत ने त्यांना अंतिम हप्ता दिला नाही. जवळचे पैसे घराच्या कामाला लावल्यावर हताश झालेल्या गणेशरावांनी नगरपंचायत मध्ये सहा महिने येरझारा मारल्या. शेवटी हाड थकल्याने त्यांनी आपला प्राण सोडला. या घटनेला नगरपंचायत जबाबदार असल्याचा आरोप गणेशरावांच्या परिवाराने केला आहे.
हक्काचे पैसेही दिले नसल्याने परिवारा जवळ उदरनिर्वाहासाठी कुठलाही आधार नाही. माणुसकीला डावलनारा प्रकार नगरपंचायतीने केला आहे. या परिवाराला शासनाने न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी सर्व स्तरावरून होत आहे.

जुन्या बस स्थानक परिसरात गणेशराव नागोजी झटाले वय 90 वर्ष हे वास्तव्याला होते. मोठे काबाडकष्ट करून त्यांनी संघर्षमय जीवन काढले. आयुष्याच्या उतारवयात हक्काचा निवारा मिळावा म्हणून त्यांनी शासन दरबारी अर्ज केला. गेली अनेक वर्ष त्यांना हक्काचे घरकुल मिळावे म्हणून प्रतिक्षा करावी लागली.अखेर रमाई आवास योजनेमध्ये त्यांना अडीच लक्ष रुपयाचे घरकुल मंजूर झाले.

घरकुल मिळाल्याची त्यांना खूप उत्कंठा होती. त्यांनी लगबगीने घरकुलाचे बांधकाम केले.त्यानंतर नगरपंचायतकडे धनादेश मागणीसाठी अर्ज केला. नगरपंचायतीने एकूण दोन लक्ष पंचवीस हजार रुपये अदा केले. मात्र शेवटचे पंचवीस हजार देण्यासाठी नाना प्रकारच्या त्रुटी काढल्या.
म्हाताऱ्या गणेशरावांनी माझं वय झालं आहे. माझ्याकडे नगरपंचायत ला येन होत नाही. साहेब माझे जवळचे पैसे लागले आहे. आता माझ्याजवळ उदरनिर्वाहासाठी पैसे नाही. अशा अनेक विनवण्या केल्या. मात्र नगरपंचायतने त्यांचे काहीही ऐकले नाही. करू, पाहू ,ठेवू, बघू या चार शब्दांचा वापर करीत गणेशरावांना गेली सहा महिने तारीख पे तारीख देत बोळवण केली. हताश झालेले गणेशराव शरीराने थकले होते. कोरोना च्या भितीमुळे सुरक्षितता बाळगत ते घरीच होते. त्यांच्याकडून नगरपंचायत मध्ये जाणे सुद्धा होत नव्हते.
आजूबाजूच्या लोकांनी नगरपंचायत ला माहिती दिली. तरीसुद्धा निगरगट्ट अधिकाऱ्यांना घाम फुटला नाही. आयुष्याच्या शेवटच्या वळणावर वेदनांचा प्रहार सहन करीत गणेशरावांना मनस्तापाचे ढोबर रोज रोज फोडावे लागत होते.अशातच 13 एप्रिल रोजी त्यांनी प्राण सोडला.

त्यानंतर परिवाराने नगरपंचायतला वारंवार विनवण्या केल्या. तरीसुद्धा घराला भेट देण्यासाठी एकही अधिकारी आला नाही. आम्ही गरीब कुटुंबात जन्मलो हाच आमचा गुन्हा आहे का? असा सवाल गणेशरावांच्या परिवाराने केला आहे. 90 वर्षाच्या वयोवृद्ध म्हाताऱ्या व्यक्तीला नगरपंचायत अशा पद्धतीने बोळवण करीत असेल तर माणुसकी डावलणारा प्रकार निश्चितच आहे. अशा निगरगट्टांर कारवाई व्हायलाच हवी. अशी मागणी गणेशरावांच्या परिवारास सोबतच आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी केली आहे. नगरपंचायत ने त्यांच्या हक्काचे पैसे दिले नाही.

अतिशय संवेदनशील असलेल्या गणेशरावांनी ही बाब मनाला लावून घेतली त्यांना दररोज आपले पैसे कधी मिळणार एवढीच काळजी सतावत होती. यासाठी त्यांनी सर्व स्तरावरून प्रयत्न केले. मात्र निसर्गाने त्यांच्या स्वप्नांचा चुराडा करत पूर्ण झालेल्या घरकुलात वास्तव्य सुद्धा करू दिले नाही. असे दुर्दैव या कुणाच्या बाबतीत येऊ नये एवढे मात्र खरे.

 

*गणेशराव सारखीच आणखी तीन जणांची अवस्था*

गणेश राव झटाले यांच्यासोबतच दिनेश गवळी, गौतम झटाले, बंडू शेंदरे यांचे घरकुल मंजूर झाले होते. या सर्वांनी घरकुलाचे बांधकाम केले. त्यांनाही शेवटचा हप्ता दिला नाही. त्यामुळे नगरपंचायत नाहकपणे बोळवण करीत आहे.

 

*प्रतिक्रिया*

रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे शेवटचे हप्त्याचे धनादेश तातडीने द्या. अशा सूचना वारंवार दिल्या. मात्र बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांनी त्रुट्या असल्याचे कारण सांगत अद्यापही धनादेश दिले नाही. काय त्रुटी आहे याची तपासणी करतो.

सचिन सुबनवार, प्रशासन अधिकारी, नगरपंचायत, आष्टी(शहीद).