Home विदर्भ घाटंजी पंचायत समिती अंतर्गत 15 चे वर वाँटर एटीएम बंद; वाँटर एटीएम...

घाटंजी पंचायत समिती अंतर्गत 15 चे वर वाँटर एटीएम बंद; वाँटर एटीएम प्रकरणात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार..!

161
0

दोषी विरुद्ध चौकशी अंती फौजदारी कारवाई करणार – सहाय्यक बिडीओ पंजाबराव रणमले

अयनुद्दीन सोलंकी,

घाटंजी (यवतमाळ) – घाटंजी पंचायत समिती अंतर्गत 15 चे वर वाँटर एटीएम बंद असून या प्रकरणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत असून याबाबतची तक्रार ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे कडे करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा वार्षिक योजना (जलसुविधा) अंतर्गत घाटंजी पंचायत समिती स्तरावरून लावण्यात आलेले ग्रामपंचायत मधील वाँटर एटीएम भ्रष्टाचार प्रकरणी सखोल चौकशी करुन संबधित सरपंच, सचिव व कंत्राटदार विरुद्ध नियमानुसार फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अनेक ग्रामपंचायती मध्ये लावण्यात आलेले वाँटर एटीएम कागदोपत्री दाखविण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
घाटंजी पंचायत समिती अंतर्गत कुऱ्हाड, पंगडी, शिरोली, डांगरगाव, मुर्ली, झटाळा, घोटी, अंजी (नृसिंह), आंबेझरी, कोच्ची, रामपूर, मांडवा, डोर्ली, खापरी, चोरांबा यासह काही गावात पंचायत समिती मार्फत, पेसा व खनिज विकास निधी अंतर्गत जलशुद्धीकरण सयंत्र (वाँटर एटीएम) थंड पाण्याचे यंत्र बसविण्यात आले. मात्र, सदरचे वाँटर एटीएम मागील एक वर्षापासून बंद असल्याने यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे घाटंजी पंचायत अंतर्गत 21 फेब्रुवारी 2019 रोजी जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी तांत्रिक मान्यता आदेश दिला असून, अंदाजपत्रकानुसार प्रत्येक वाँटर एटीएमची किंमत रुपये 7 लाख 35 हजार 50 ठरविण्यात आली होती. वास्तविक पाहता सदरच्या अंदाज पत्रकानुसार बोअर मारणे, मेंटेनन्स, पाणी शोषण, पाणी तपासणी, बांधकाम, विद्युत मिटर, विद्युत बिल भरणे, दुरुस्ती करणे इत्यादी कामे करण्याचे अंदाज पत्रकानुसार ठरविण्यात आले. मात्र, सदरची कामे अंदाज पत्रकात नमुद असतांना काही ग्रामपंचायतचे सरपंच व सचिव यांनी 14 व्या वित्त आयोगातून वाँटर एटीएमच्या जल शुद्धीकरणाला बोअर मारल्याचे समजते. विशेषतः या व्यतिरिक्त काही ग्रामपंचायत सरपंच व सचिवाने खनिज विकास निधी व पेसा अंतर्गत येणाऱ्या चिखलवर्धा, घोटी व ईतर ग्रामपंचायतीने ई – निविदा न काढताच वाँटर एटीएम बसविले असल्याचे वृत्त आहे. तसेच 14 व्या वित्त आयोगातून वाँटर एटीएमला बोअर मारण्या बाबतचे प्रत्यक्ष आराखड्यात नमुद नसुन गैरप्रकार करण्यासाठी संबधित ग्रामपंचायतने बोअर मारल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
वाँटर एटीएमची दुरुस्ती संबधित कंपनीकडे असतांना देखील काही ग्रामपंचायतचे सरपंच, सचिव यांनी गट विकास अधिकारी यांना हाताशी धरून सदरचा खर्च 14 व्या वित्त आयोगातून केलेला आहे.
घाटंजी पंचायत समिती अंतर्गत अनेक गावात पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई असुन तेथील विहीर व हातपंपात फ्लोराईड युक्त पाणी असतांना सुध्दा संबधित सरपंच व सचिव यांच्या दुर्लक्षित धोरणांमुळे अनेक गावात पिण्याच्या पाण्यासाठी फ्लोराईड युक्त पाणी वापरल्या जात आहे. त्यामुळे दंत रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकंदरीत घाटंजी पंचायत समिती अंतर्गत वाँटर एटीएमची सखोल चौकशी करुन दोषी सरपंच, सचिव व संबधित कंत्राटदार यांचे कडुन रक्कम वसूल करुन, फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
🟣 दरम्यान, घाटंजी पंचायत समितीचे प्रभारी सहाय्यक गट विकास अधिकारी तथा पंचायत विस्तार अधिकारी पंजाब रणमले यांची प्रतिक्रिया घेतली असता,
14 व्या वित्त आयोगातून माझ्या कडे प्राप्त अहवालानुसार 14 वाँटर एटीएम सुरू असल्याचा अहवाल प्राप्त असून, मांडवा ग्रामपंचायत मधील वाँटर एटीएम विद्युत पुरवठ्याअभावी बंद आहे. मात्र, वाँटर एटीएम मध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर उर्वरित 14 वाँटर एटीएम प्रकरणात चौकशी करून, चौकशी अंती दोषी आढळल्यास सबंधित सरपंच, सचिव व कंत्राटदार विरुद्ध नियमानुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.