Home मराठवाडा अवयव प्रत्यारोपणाच्या राज्य समितीवर डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांची निवड

अवयव प्रत्यारोपणाच्या राज्य समितीवर डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांची निवड

123
0

जालना  – लक्ष्मण बिलोरे

एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांची मानवी अवयव प्रत्यारोपनाशी संबंधीत राज्य समितीवर सल्लागार सदस्य म्हणून निवड झाली आहे.
मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा, 1994 व मानवी अवयव प्रत्यारोपण (सुधारणा) कायदा, 2011 तसेच मानवी अवयव प्रत्यारोपण नियमावली, 2014 नुसार प्रत्येक राज्यामध्ये सदर कायदा प्रभावीपणे राबवण्याच्या उद्देशाने समुचित प्राधिकाऱ्यास आवश्यक सहाय्य तसेच सल्ला देण्यासाठी राज्य सल्लागार समिती स्थापन करण्याची तरतूद आहे. याची यापूर्वीची समिती डिसेंबर 2019 मध्ये संपुष्टात आल्याने राज्य सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात आली असून त्यात डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांचा सल्लागार सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. पुढील दोन वर्षांसाठी त्यांची नियुक्ती असणार आहे. याबाबतचा शासन निर्णय 30 एप्रिल 2021 रोजी जारी करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे मुख्य सचिव या समितीचे अध्यक्ष असतील. डॉ. प्रवीण सूर्यवंशी हे वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत. मुंबई आणि पुणेवगळता उर्वरित महाराष्ट्रात प्रथमच त्यांनी यशस्वी यकृत प्रत्यारोपण केलेले आहे. अवयवदान जनजागृतीसाठी त्यांचे मोलाचे कार्य असून अवयव प्रत्यारोपनाच्या विभागीय समन्वय समितीचे ते सक्रिय सदस्य आहे. या सर्व कार्यांची दखल घेत शासनाने त्यांची राज्य समितीवर निवड केली आहे. अवयव प्रत्यारोपण समितीवर त्यांची निवड झाल्याबद्दल एमजीएम संस्थेचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, उपाध्यक्ष पी.एम.जाधव, सचिव अंकुशराव कदम, विश्वस्त प्रतापराव बोराडे, अधिष्ठाता राजेंद्र बोहरा आदींनी अभिनंदन केले आहे.