Home विदर्भ घाटंजी कोव्हीड सेंटर मधील रुग्ण पलायनाचे गुपित काय?

घाटंजी कोव्हीड सेंटर मधील रुग्ण पलायनाचे गुपित काय?

125
0

या संतापजनक प्रकाराला जबाबदार कोण?

प्रशासनाकडून कार्यवाहीची अपेक्षा

यवतमाळ – जिल्ह्यात दैनंदिन वाढत असलेल्या कोरोना बाधितांनी शासन, प्रशासन, कुटुंबियांसह सर्व जनतेची काळजी वाढविली आहे. त्यातच जिल्हा व तालुका स्तरावर कोरोना रुग्णासाठी होणाऱ्या उपायोजना तोकडया पडत आहे. तसेच नागरिकाचे सुद्धा अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने बाधितांच्या व मृत्यूचा आलेख वाढताना दिसतो. असे म्हटल्यास वावगे ठरू नये. ज्या पद्धतीने रुग्ण वाढत आहे त्या पटीने आरोग्य यंत्रणेच्या सोयी-सुविधा वाढल्या असत्या तर परिणामी आकडेवारी घसरलेली दिसली असती. पण प्रत्यक्षात तसे न झाल्यानेच आता आरोग्य विभागाचे आरोग्यच ढासळत चालल्याचे दृष्टीस पडते.

याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे नुकतेच घाटंजी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थे समोरील सामाजिक न्याय विभागाच्या भव्यदिव्य इमारतीमध्ये सुरु असलेल्या कोव्हीड सेंटर मधून तब्बल 20 कोरोना पॉझिटिव रुग्णांनी भूल देऊन तेथून पोबारा केला. येथील कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन त्यांनी कोव्हीड सेंटर मधून स्वतःची सुटका करून घेतली.
असे असले तरी कोव्हीड पासून स्वतःची सुटका त्यांना कदापिही करून घेता येणार नाही. मग स्व हाताने उपचाराअभावी कोरोना ने मरणं किंबहूना घरच्या बाहेरच्या संपर्ककातील लोकांचा खुनच करणे नव्हे का? मग असं पाप त्यांनी का म्हणून करावं हे सद्यस्थितीत न म्हणून सुटणार कोडंच आहे.

त्यामुळे घाटंजी कोव्हीड सेंटर मधील रुग्णांच्या पलायनाचे गुपित काय? याचा बारकाईने विचार करणं आता शासन-प्रशासन, रुग्ण, नातेवाईक व नागरिकांना क्रमप्राप्त झाला आहे. एकंदरीत आरोग्य विभाग व त्यांनी दिलेल्या त्रोटक माहितीनुसार माध्यमाने सरळ सरळ रुग्णावर आळ घेऊन मोकळे झाले. पण प्रत्यक्षात निघून गेलेल्या रुग्णाच्या मानसिकतेचा विचार केला तर तिथे त्यांना अपेक्षित असलेला औषधोपचार होत नसेल? किंवा देण्यात येणाऱ्या सुविधा योग्य प्रमाणात नसल्याकारणाने त्यांचे आरोग्य सुधारण्याऐवजी बिघडत चालले असेल? अशा अनेक बाबीवर आता शासन व प्रशासनाने लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. त्याच प्रमाणे सेंटरची जबाबदारी असलेले अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा कर्मचारी यांनी आपल्या कर्तव्याप्रती केलेली उदासीनता, बेजबाबदारपणा ह्या गोष्टी पडताळून पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तेव्हाच रुग्ण पलायनाचे गुपित व सत्य समोर येईल. त्यानंतरच त्याचा दोष रुग्ण अथवा आरोग्य यंत्रनेला देता येईल. किंबहुना आज तरी कोव्हीड सेंटर वरील सर्व कर्मचाऱ्यांच्या कारभाराच चव्हाट्यावर आला आहे.

मागील वर्षा पासून पोटतिडिकीने काम करीत असल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचीही मानसिकता समजून घेणं तितकेच महत्त्वाचे आहे. असे असले तरी घाटंजी सारख्या कोव्हीड सेंटरमधून तब्बल वीस रूग्ण एकाच वेळी निघून जाणे ही खूप मोठी बाब आहे. कारण निघून गेलेले ते वीस जण म्हणजे चालते फिरते
बॉम्बच म्हणावे लागेल. हे असो बॉम्ब जेव्हा स्वगृहि किंवा इतरांच्या सानिध्यात आले तर त्यांच्यापासून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या संसर्गाला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण होतो. विशेष म्हणजे हा प्रसंग घडल्यानंतर आरोग्य विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना एक वाक्यता ठेवायला हवी होती. आमचा एक प्रतिनिधी सदर घटना समजल्यानंतर अकराच्या सुमारास माहिती घेण्यासाठी
गेले असता ‘वीस चे जवळपास लोक गेले असतील. आम्ही तेच पाहत आहो. नंतर तक्रार दाखल करतो’ असे सांगितले. प्रतिनिधीने नंतर पोलीस स्टेशनमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत तक्रारीसंदर्भात
संपर्क केला असता तक्रार दाखल नसल्याचे समजले. दैनिक लोकमतला दिलेल्या माहितीत ‘रविवारी तक्रार दाखल करतो’ असे सांगितले जाते. तर पुण्यनगरी च्या शहर प्रतिनिधींना ‘तक्रार दाखल झाली पण आम्ही कोव्हीडची माहिती देऊ शकत नाही’ असे बोलण्यात येते. त्यानंतर चॅनल च्या प्रतिनिधीला ‘आता आम्ही तक्रार करायला जात आहोत’ असे सांगितले जाते. त्यामुळे प्रसारमाध्यमांना यांनी दिलेल्या माहितीनुसार पलायन करणार्‍या रुग्णांची आकडेवारीत तफावत दिसून येते.

एवढी गंभीर घटना झाल्यानंतर येथील कार्यरत तालुका अधिकारी व डॉक्टर यांच्या वागण्यात काल गांभीर्य दिसून येत नव्हते एवढेच नाही तर, गेलेल्या रुग्णाचा आरोग्य विभागातील कर्मचारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका व आशा च्या माध्यमातून शोध घेऊन त्यांना गृहविलगीकनात ठेवण्यात आल्याचे त्यांना सर्व माध्यमाला सांगता आले नाही. यामागची पार्श्वभूमी सुद्धा जाणून घेणे गरजेचे आहे. अशी एकवाक्यता नसलेल्या प्रतिक्रिया देण्यामागे, तसेच सकाळी घटना घडल्यानंतर ही विलंबाने तक्रार देण्यामागे काय कारण असू शकते याचा शोध घेणं महत्त्वाचा आहे.

घटना घडल्यानंतर चौकशी समिती गठित करणे, त्यानंतर चौकशी समिती मार्फत चौकशी होईल याला विलंब लागेल यात वेळ व काळ निघून जाते व कामचुकार कर्मचाऱ्यांना अभय मिळते. यातून काही साध्य होत नाही. एवढी गंभीर घटना झाल्यानंतर नेमके पाणी कुठे मुरते ते समजत नाही. त्यामुळे पारदर्शक चौकशी करून कारवाईची अपेक्षा करणं गैर होणार नाही. तुर्तास एवढंच की मानवी कोरोना बॉम्ब म्हणून सर्वसामान्यांच्या संपर्कात गेलेल्या त्या व्यक्तीमुळे कोरोना संसर्ग वाढला असेल असे गृहीत धरून मग चुकलेले अधिकारी कर्मचारी किंवा रुग्ण यांच्यावर योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे