Home महत्वाची बातमी वापरलेल्या मास्क पासून गादया बनवण्याचा कारखाना पोलिसांनी पकडला

वापरलेल्या मास्क पासून गादया बनवण्याचा कारखाना पोलिसांनी पकडला

584
0

 

जळगाव येथील प्रकार

अमीन शाह

करोनामुळे राज्यातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. गेल्या काही महिन्यात राज्यातील महत्त्वाच्या शहरांसह इतर भागातही करोनानं हातपाय पसरल्याने मोठं आव्हान उभं राहिलं आहे. आरोग्य व्यवस्था या संकटाशी मुकाबला करत असताना नागरिकांकडून त्यात भर घालणारे प्रकारही उघडकीस येत आहेत. जळगाव जिल्ह्यात असाच एक प्रकार समोर आला आहे. जळगावमध्ये वापरलेल्या मास्क पासून गाद्या तयार केल्या जात होत्या. पोलिसांनी वेळीच कारवाई करून कारखान्याचा मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

जळगाव जिल्ह्यातील कुसुंबा या गावात एका गादी बनवण्याच्या कारखान्यात गाद्यांमध्ये कापसाऐवजी रुग्णालयात वापरलेले मास्क भरले जात होते. रुग्णालयात वापरलेले मास्क आणि हॅण्ड ग्लोजपासून गादी तयार करण्याचा धक्कादायक प्रकार जळगावमध्ये समोर आला आहे. कुसुंबा गावातील महाराष्ट्र खादी भंडार या कारखान्यात गादी बनवण्यासाठी वारलेल्या मास्कचा वापर केला जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कारखान्यावर धाड टाकत सर्व साहित्य जप्त केले. तसेच कारखान्यावर कारवाई करत मास्क व इतर साहित्य पोलिसांनी नष्ट केले. दरम्यान, यासंदर्भात पोलिसांनी कारखान्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
राज्यात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. राज्य सरकारने यासंदर्भात नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने मास्कचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्याचबरोबर वापरलेल्या मास्कची योग्य विल्हेवाट लावण्यासंदर्भातही आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जात आहे. वापरलेल्या मास्कमुळे करोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता असल्यानं हा सावधगिरीची सूचना सरकारकडून दिली जात असतानाच या घटनेनं आरोग्य विभागाला चक्रावून सोडलं आहे