Home विदर्भ कोविड रुग्णांना बेड उपलब्धतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष तात्काळ सुरु करा –...

कोविड रुग्णांना बेड उपलब्धतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष तात्काळ सुरु करा – पालकमंत्री सुनिल केदार.

148

ईकबाल शेख

वर्धा: कोविड रुग्णाच्या उपचाराकरीता जिल्हयात पर्याप्त प्रमाणात बेड उपलब्ध आहे. मात्र त्याची माहिती रुग्णांना वेळेत उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तात्काळ नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात यावा. या नियंत्रण कक्षातून नागरिकांना जिल्हयातील कोणत्या रुग्णालयामध्ये किती बेड उपलब्ध आहेत याची माहिती दूरध्वनीव्दारे उपलब्ध करून देण्यात यावी असे आदेश राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुनिल केदार यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड संबंधित विषयाचा आढावा घेताना ते बोलत होते. बैठकिला आमदार रणजित कांबळे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, महात्मा गांधी आर्युविज्ञान महाविद्यालय सेवाग्रामचे अधिष्ठाता डॉ. नितीन गगने, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे प्रशासकिय अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, मुख्याधिकारी विपीन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांची उपस्थिती होती.

जिल्ह्यात आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी, कस्तुरबा हॉस्पीटल सेवाग्राम, जिल्हा सामान्य रुगणालाय, उपजिल्हा रुग्णालय आर्वी व हिंगणघाट येथे एकुण 1 हजार 140 बेड उपलब्ध असून सध्या 695 बेडवर कोविड रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर 495 बेड रिक्त आहे. 1 हजार 140 बेड पैकी 1 हजार 20 ऑक्सिजन बेड

असून 68 व्हेंटीलेटर आहे. यामध्ये 1 हजार 378.6 क्युबिक मीटर प्रमाणे ऑक्सीजन पुरवठा करण्यात येत आहे. सेवाग्राम येथे लिक्वीड ऑक्सीजनसाठी नविन टँक सुरु करावी, असे निर्देश श्री केदार यांनी दिले.

जिल्हयाला प्राप्त झालेली कोविशिल्ड लस संपलेली असून कोव्हॅक्सीन लस उपलब्ध आहे. कोव्हॅक्सीन लसचा सुद्धा केवळ दुसरा डोज सुरु राहणार आहे. केंद्र शासनाकडून लस प्राप्त होताच नागरिकांना लसीकरण करण्यात यावे असे श्री केदार यांनी सांगितले. कोविड चाचणी वाढविण्यासाठी उपलब्ध असलेला तंत्रज्ञ कर्मचारी वर्ग वाढविण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्यात.

गृहविलगीकरणात असलेले कोविड रुग्ण बाहेर फिरत असल्यास त्यांच्यावर निगराणी ठेवून दंडात्मक कारवाई करावी असे श्री केदार यांनी सांगितले.