Home नागपूर ऐकीशी प्रेम दुसरीशी गुपचूप साक्षगंध पडले महागात 

ऐकीशी प्रेम दुसरीशी गुपचूप साक्षगंध पडले महागात 

305
0

 

अमीन शाह

नागपूर : ‘माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही. लग्न करेल तर तुझ्याशीच, अन्यथा आयुष्यभर अविवाहित राहणार,’ अशा आणाभाका घेणाऱ्या प्रियकराने दुसऱ्याच तरुणीशी गुपचूप साक्षगंध उरकले. ही माहिती मिळताच प्रेयसीने प्रियकराचे घर गाठत चांगलाच राडा केला. मात्र, त्याने लग्न करण्यास चक्क नकार दिला. त्यामुळे तिने पोलिसात बलात्काराची आणि ‘धोका’ दिल्याची तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून धोकेबाज प्रियकरासह अटक केली. नीलेश रामूजी गजबे (२८, रा. शंभूनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय तरुणी रिया (बदललेले नाव) हिचे २०१८ मध्ये शेजारी राहणारा नीलेश गजबे याच्यासोबत सूत जुळले. नीलेश हा नळ फिटिंगचे काम करीत होता. दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले.वस्तीत बोंबाबोंब झाल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कुटुंबीयांचा विरोध असल्यामुळे लग्न करणे शक्य झाले नाही. त्यामुळे कुटुंबीयांच्या दबावाखाली रियाने आई-वडिलांनी शोधलेल्या युवकाशी लग्न केले. मात्र, नीलेशशिवाय ती संसाराची कल्पना करू शकत नव्हती.त्यामुळे ती पतीला सोडून माहेरी आली. त्यामुळे तिच्या पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. पुन्हा नीलेशसोबत तिचे प्रेमसंबंध जुळले. नीलेशने कोरोनामुळे लग्न करण्यास टाळाटाळ केली. यादरम्यान तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आता रिया लग्नासाठी तगादा लावायला लागली तर नीलेश तिला टाळू लागला.नीलेशला नातेवाईक असलेली मुलगी आवडली. तिच्या वडिलांशी चर्चा करून लग्न जुळविले आणि त्याने लगेच साक्षगंध सुद्धा उरकून टाकले. लग्नाची तारीख देखील निघाली. लग्नाला आठवडा भराचा वेळ असतानाच नीलेशने ही माहिती रियाला दिली. ती चांगलीच संतापली. लगेच तिने कोराडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन नीलेशच्या विरोधात तक्रार केली. पोलिसांनी नीलेशवर बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.