Home मराठवाडा नोकरी करताना माणूस प्रिय नसतो तर त्याचे काम प्रिय असते – प्राचार्य...

नोकरी करताना माणूस प्रिय नसतो तर त्याचे काम प्रिय असते – प्राचार्य जेआर पुनवटकर

195

लक्ष्मण बिलोरे – घनसावंगी

अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील श्री गुरुदेव विद्या मंदिर या शाळेतील शिक्षक बी.बी.निकम व शिक्षकेतर कर्मचारी कारभारी शिंदे हे वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.यांच्या सेवानिवृत्ती निमित्त शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने ४ मार्च रोजी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला माजी मुख्याध्यापक सुभाष मांगदरे,प्राचार्य जे.आर.पुनवटकर,खुलताबाद येथील पंचायत समिती सदस्य प्रभाकर शिंदे,औरंगाबाद येथील भाजप जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर नलावडे,पर्यवेक्षिका जे.डब्लू.दांडगे,शिक्षक सुनिल भडके,भानुदास तायडे,वैभव शिंदे,एकनाथ तायडे,वैजिनाथ मोरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य जे.आर.पुनवटकर म्हणाले की,नौकरी करताना माणूस प्रिय नसतो तर त्याचे काम प्रिय असते.शिक्षक हा विद्यार्थी घडवण्याचे काम करत असतो.त्यामुळे त्याच्या कामाचे कौतुक विद्यार्थी करत असतात.सेवानिवृत्तीचा क्षण हा प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो.सेवानिवृत्त झाल्यावर उर्वरित आयुष्य सुखा-समाधानात जगले पाहिजे,असे ते म्हणाले.

यावेळी पर्यवेक्षिका जे.डब्लू.दांडगे म्हणाल्या की,आयुष्यात काम करताना मीपणा सोडला तर उरतो तो माणूस.त्यामुळे मी पणा सोडून दिला पाहिजे.आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वागले पाहिजे.निवृत्तीनंतर आपले जे काही छंद असतील ते जोपासले पाहिजे,असे ते म्हणाले.

यावेळी प्रमुख पाहुणे सुनील भडके म्हणाले की,नौकरी करताना माणसाला कुटुंबाला वेळ देता येत नाही.कामाच्या व्यापात जगण्याचे राहून जाते.निवृत्तीनंतर मार्गदर्शकाची भूमिका बजवावी.प्रत्येक माणसात गुण-दोष असतात,असे ते म्हणाले.

यावेळी निवृत्त शिक्षक बी.बी.निकम म्हणाले की,नौकरी करताना खूप काही अनुभव अनुभवायला मिळतात.शिक्षकाकडे जे काही आहे ते विद्यार्थ्यांना देण्याचा कायम प्रयत्न शिक्षक करत असतात.विद्यार्थ्यांना नेहमीच तळमळीने शिक्षक शिकवत असतात.यातून विद्यार्थ्यांची जडणघडण होत असते.नौकरी करताना सर्वांचे सहकार्य लाभले,असे ते म्हणाले.

यावेळी निवृत्त शिक्षकेत्तर कर्मचारी कारभारी शिंदे म्हणाले की,आयुष्याची ३० वर्ष ही शाळेच्या सेवेत गेली.काम करताना सकारात्मक दृष्टिकोन महत्वाचा असतो.त्यामुळे काम करायला सोपे जाते.आयुष्यात पत्नीची साथ फार महत्त्वाची असते.तिच्यामुळे आयुष्यात काम करताना एक वेगळीच ऊर्जा मिळते.आजपर्यंत सेवाभाव ठेऊन काम केले,असे ते म्हणाले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक ए.जी.खांडेभराड,सुत्रसंचालन हेमंतकुमार साळी,डी.एन.खिल्लारे तर आभार प्रदर्शन आर.व्ही.छल्लारे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.यावेळी कुटुंबातील सदस्य मोठया प्रमाणावर उपस्थित होते.