Home महाराष्ट्र विनय सामंत यांचं ग्रीन फार्म

विनय सामंत यांचं ग्रीन फार्म

177
0

अनेक व्यक्तींचे आयुष्य नोकरी किंवा व्यवसाय करण्यात भर्रकन निघुन जाते, पण निवृत्ती नंतरचे काय ? हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे आ वासून उभा राहतो. आर्थिक सुबत्ता आलेली असली तरीही वेळ खायला उठतो.त्यांच्या कौटुंबिक, सामाजिक स्थानाला धक्का बसतो. त्यातून काहीच छंद नसेल तर विचारायलाच नको.

माझे सहकारी श्री. विनय सामंत यांचेही निवृत्ती नंतर असेच काहीसे झाले. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात छायाचित्रकार म्हणुन ३७ वर्षे नोकरी केल्यावर ते सेवानिवृत्त झाले. या खात्याचे काम व त्यातही छायाचित्रकार म्हटले की अक्षरशः ३६५ दिवस काम असते. कोणत्याही वेळी, कशासाठी छायाचित्रणाला धावावे लागेल याचा भरोसा नसतो. त्यात मंत्रालयातील नोकरी म्हणजे माननीय राज्यपाल, माननीय मुख्यमंत्री, मंत्री, सचिव , विविध प्रकारच्या अती महत्त्वाच्या व्यक्तींच्या कार्यक्रमांचे छायाचित्रण म्हणजे प्रत्येक क्षण आव्हानात्मक असतो. त्यामुळे जीवन अधिकच गतिमान होते. त्यामुळे निवृत्त झाल्यावर सामंत यांना वेळ खायला उठला.
पालघर जिल्ह्यातील सफाळे या मुळ गावी सामंत यांची वडिलोपार्जित शेतजमीन होती. पण शेती करणे आता किफायतशीर राहिले नाही.त्यामुळे शेतीला जोड धंदा म्हणुन कृषी पर्यटन केंद्राची कल्पना त्यांना सुचली. शासनाने या व्यवसायाला प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबिले आहे, त्याचीही त्यांना कल्पना होतीच. यातुनच प्रयत्न पूर्वक त्यांनी कृषी पर्यटन केंद्र उभारण्यास फेब्रुवारी २०२० पासुन सुरवात केली. पण कोरोनामुळे २४ मार्च पासुन देशभर लॉक डाऊन झाले आणि सर्व कामांना खीळ बसली. तरी सर्व अडचणींवर मात करत २७ सप्टेंबर या जागतिक पर्यटन दिवशी त्यांचे *ग्रीन फार्म ॲग्रो टुरिझम रिसॉर्ट* सुरू झाले.
जवळपास दीड एकर जागेवर हे रिसॉर्ट आहे. यात 4 मोठे सूट आहेत. जवळपास 40 लोकांची व्यवस्था एकावेळी होऊ शकते. शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या जेवणाची येथे सुंदर व्यवस्था आहे. पर्यटकांना सोयीचे होतील असे विविध पॅकेजेस येथे ठेवण्यात आली आहेत.
पर्यटकांसाठी येथे जलतरण तलाव आहे. मुलांसाठी सुद्धा स्वतंत्र तलाव आहे. रेन डान्स, कॅरम, बुद्धिबळ असे विविध खेळ येथे आहेत
सफाळ्याच्या आसपास करवाळे धरण, केळवा बीच, वसई किल्ला, तांदुळवाडी किल्ला, सातवली येथील गरम पाण्याचे कुंड पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. पावसाळ्यात येथील धबधबे पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून येतात
अतिशय निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या रिसॉर्ट मध्ये नुकतेच एका हिंदी गाण्याचे चित्रीकरण झाले.
सफाळे येथे डहाणू लोकलने जाता येते. तेथुन रिक्षाने या रिसॉर्टला पोहचता येते. रस्ता मार्गे वेस्टर्न हायवेने सफाळे- वरई फाट्या वरुन येथे पोहोचता येते. या रिसॉर्टच्या बुकिंग साठी *जस्ट डायल* वर सुविधा उपलब्ध आहे. गुगल आणि फेसबुक वर सुद्धा या रिसॉर्टची माहिती उपलब्ध आहे.
सामंत यांच्या या उपक्रमात, त्यांची पत्नी सौ. स्नेहा, मुलगा निनाद, दुबईचे माहेर असलेली सून सौ. डिंपल यांचे पूर्ण प्रोत्साहन व सहकार्य आहे. या रिसॉर्टला भेट देण्यासाठी मी गेलो असता त्या वेळी शिवसेनेच्या विधान परिषदतील पहिल्या महिला आमदार व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. नीलाताई देसाई आणि त्यांचे कुटुंबीय आले होते.रिसॉर्ट पाहून त्यांनीही सामंत यांचे भरभरून कौतुक केले.
खरोखरच निवृत्ती नंतर स्वस्थ न बसता , आला दिवस कसातरी ढकलत न राहता एक नविन उपक्रम सुरू करण्यासाठी जे धाडस व धडाडी विनय सामंत यांनी दाखवली आहे या बद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. आणि त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
— देवेंद्र भुजबळ
9869484800

Unlimited Reseller Hosting