Home विदर्भ सार्वजनिक शौचालय बंद असल्याने स्वाभिमान संघटनेनी दिली मुख्याधिकाऱ्यांना संडासची शीट भेट..

सार्वजनिक शौचालय बंद असल्याने स्वाभिमान संघटनेनी दिली मुख्याधिकाऱ्यांना संडासची शीट भेट..

392
0

 स्वाभिमानच्या अनोख्या आंदोलनाने प्रशासनाची उडाली भांबेरी

यवतमाळ :-   शहरातील दारव्हा रोड वरील नेताजी नगर भागातील सार्वजनिक शौचालय गेल्या अनेक महिन्यापासून बंद असल्याने आज स्वाभिमान कामगार संघटनेचे अध्यक्ष निरज वाघमारे यांनी नगरपरिषद मुख्याधिकार्‍यांना संडासच्या शिटवर निवेदन लिहून नगरपालिकेच्या अकार्यक्षम व हलगर्जीपणाचा निषेध करत या प्रश्नाकडे कडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
नेताजी नगर हा भाग अत्यंत मागास असून येथे राहणारे सर्व रहिवाशी हे आर्थिक दुर्बल असून अतिक्रमणधारक असल्याने यांच्याकडे जागे अभावी शौचालय बांधण्यास अडसर आहे. यामुळे येथील सर्व रहिवाशी महिला – पुरुष बहुदा नगरपरिषदेच्या सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात, त्याकरिता नगरपालिकेने शासकीय गोदामाच्या बाजूच्या जागेत शौचालयाच्या मोठं मोठ्या वास्तूही बांधल्या मात्र सद्यस्थितीत ह्या वास्तू अनेक समस्यांचे माहेरघर बनल्याने निरुपयोगी ठरत आहे. येथील शौचालयात गेल्या कित्येक महिन्यापासून स्वच्छतेची व्यवस्था, पाण्याचा पुरवठा, विजेची व्यवस्था, शौचालयास दारे व खिडक्या नसल्याने ही शौचालये पूर्णपणे दुरुपयोगी ठरत असल्याने बंद अवस्थेत आहे. यामुळे येथील महिलांना व रहिवाश्यांना शौचाकरीता उघड्यावर जावं लागतं आहे.
या समस्येला घेऊन येथील नागरिकांनी अनेक वेळा नगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधीना लेखी व तोंडी तक्रारी सुद्धा केल्या मात्र त्यावर कुठलीही कारवाई न झाल्याने अखेर आज स्वाभिमान कामगार संघटनेचे अध्यक्ष निरज वाघमारे यांच्या सह सहकाऱ्यांनी यवतमाळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुनिल बल्लाळ यांना संडासच्या शिटवर निवेदन देऊन हे शौचालय तात्काळ पूर्ववत करून येथील संरक्षण भिंत उंची वाढवावी अशी मागणी या निवेदनातून केली.
नगरपालिकेचा हलगर्जीपणा व अकार्यक्षमतेचा निषेध करत स्वाभिमान संघटनेने केलेल्या या अभिनव आंदोलनाने नगरपालिका प्रशासनाची भांबेरी उडाली.
या अभिनव आंदोलनाची मुख्याधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत, संबंधितांना सूचना देत लवकरात लवकर ही शौचालय सर्वंसोयी सुविधा युक्त करून चालू करून देण्याचे आदेश दिले.
यावेळी स्वाभिमान कामगार संघटनेचे वसीम पठाण, रोशन मस्के, सूरज मेश्राम, नितेश बहाळे, ऋषिकेश सवळे,शुभम गणवीर, वैभव धामनवार,प्रणव राठोड, कमलेश सवळे, अमोल मसराम, तौफिक पठाण, अरमान खान, साहिल खान, गोलू शेख, यश किर्तक, राहुल प्रधान,रोहन ढाकरगे, क्षितिज रुपवणे, साहिल खान, राजू कांबळे, महादेव संत आदी कार्यकर्ते उपस्थित होते..

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतर ही मूलभूत गरजांसाठी अश्याप्रकारे आंदोलन करावी लागत असून ही फार मोठी शोकांतिका आहे. आज नेताजी नगरातील सार्वजनिक शौचालयचा प्रश्न गहन बनला असून यामुळे आमच्या माता – भगिनींना संडाससाठी उघड्यावर जावं लागतं आहे. यामुळे हे सार्वजनिक शौचालय लवकरात लवकर चालू व्हावे यासाठी आज मुख्याधिकाऱ्यांना शिटवर निवेदन देऊन आंदोलन केले आहे आमची ही मागणी लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास यापुढे हा लढा तीव्र करून आम्ही शौचालय करिता मुख्याधिकाऱ्यांच्या निवास्थानी जाऊ..