Home विदर्भ आज वर्धा प्रशासनाकडून कोरोना लसीकरणाचा सराव

आज वर्धा प्रशासनाकडून कोरोना लसीकरणाचा सराव

60
0

ईकबाल शेख 

  वर्धा – कोविड विषाणूवरील बहुप्रतिक्षित लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या  आणि  राज्यशासनाच्या निर्देशानुसार कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी उद्या 8 जानेवारीला जिल्ह्यात चार ठिकाणी लसीकरणाचा सराव प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

उद्या सकाळी 9 वाजता चारही लसीकरण केंद्रवर सदर प्रात्यक्षिक होणार असून आरोग्य विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्याकडून तयारी पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांनी दिली.

या चार केंद्रावर होणार सराव

           जिल्ह्यात लसीकरणाच्या सरावासाठी चार केंद्र निवडण्यात आले आहेत. यात जिल्हा सामान्य रुग्णालय, सेलू येथील ग्रामीण रुग्णालय, ग्रामीण भागात खरांगणा- मोरांगणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, आणि सावंगी मेघे येथील आयुर्विज्ञान संस्था यांचा समावेश आहे. एका केंद्रावर 25 व्यक्तींवर लसीकरणाचे प्रात्यक्षिक करण्यात येईल.            

          पहिल्या टप्यात देण्यात येणाऱ्या 17 हजार आरोग्य कर्मचा-यांपैकी सरावासाठी निवडण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यावेळी कोविन ॲपमध्ये नोंदणी करण्यात येईल. त्यांना लसीकरणासाठी कुठे उपस्थित राहायचे याबाबत संदेश पाठविण्यात येईल. त्यानंतर उपस्थित झालेल्या लाभार्थ्यांना लसीकरण करुन एका खोलीत विश्रांती घ्यायला सांगण्यात येईल. त्या ठिकाणी त्यांच्यावर काही रिॲक्शन होते का याबाबतही तपासणी करण्यात येईल अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली. 

 जिल्हाधिकारी विवेक भीमनवार हे या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेऊन असतील. तसेच स्वतः भेट देऊन लसीकरण सराव प्रक्रियेची  पाहणी करतील. शासनाच्या दिशानिर्देशानुसार लसीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या सराव प्रक्रियेत  येणाऱ्या अडचणींच्या नोंदी घेऊन त्याबाबत ते शासनाला कळवतील.