Home मुंबई 50 कोटीचा घोटाळा दडविण्यासाठी आरेत पत्रकारांची केली जातेय खोटी बदनामी!

50 कोटीचा घोटाळा दडविण्यासाठी आरेत पत्रकारांची केली जातेय खोटी बदनामी!

270

खाजगी संभाषणात काटछाट करून संभाषण व्हायरल करून भीती निर्माण करण्यासाठी व पैसे उकळण्याच्या उद्देशाने खोटी बदनामी केली जात असल्याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांना पत्रकारानी लिहिले पत्र…!

मुंबई – आरे दुग्ध वसाहतीत राहणारे जनआधार टाइम्सचे पत्रकार निलेश ह.धुरी व आपला समाज साप्ताहिकाचे पत्रकार उदय सांगळे यांनी आरे दुग्ध वसाहतीतील मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड व चार गंभीर स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे नोंद असलेला नोंदणीकृत गुन्हेगार मयूर गोसावी यांनी शासनाचे अंदाजे 50 कोटी रुपयाचे नुकसान केल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यापासून दोन कोटी रुपयांचा शासकीय महसूल बुडविणारा मयूर गोसावी खोट्या तक्रारी करून त्या सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करून यांचा आवाज दाबण्याचे काम करत आहे.

नीलेश धुरी व उदय सांगळे हे त्यांच्या मोबाईल वरून खाजगीत बोलत असलेले संभाषण चोरी करून त्यात काटछाट करून ते सोशल मीडियावर टाकून गोसावी त्याच्या विरुद्ध बातम्या प्रसिद्ध केल्याचा राग मनात ठेवून तो सोशल मीडियावर पत्रकारांची खोटी बदनामी करत असल्याचे समोर आले आहे.संपादक उदय सांगळे यांनी सांगितले की,”काही दिवसापासून मला,तुझ्या मोबाईल मधील 18 क्लिप आमच्याकडे असून आमच्या विरुद्ध करत असलेला पत्रव्यवहार व बातम्या न थांबविल्यास आम्ही त्या व्हायरल करू अशी धमकी गंभीर स्वरूपाचे चार दखलपात्र गुन्हे नोंद असणाऱ्या “मयूर गोसावी” यांच्याकडून त्यांना देण्यात येत होत्या.

मुळात खाजगीतील संभाषण व्हायरल करण्यामागे यांचा उद्देश काय ? भीती निर्माण करून यांनी केलेल्या घोटाळ्याच्या बातम्या प्रसिद्ध न करण्यासाठी तसेच पैसे उकळण्यासाठी हा प्रकार केला जात आहे का ? याची शहानिशा होणे गरजेचे आहे.यांच्यामुळे आमचे मानसिक खच्चीकरण झाले असून संबंधित व्यक्तीमुळे भविष्यात आमच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची योग्य चौकशी करून कारवाई करण्याची विनंती या पत्रकारांनी लेखी पत्राद्वारे सायबर क्राईम विभाग, मुंबई पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षक आरे पोलीस स्टेशन नूतन पवार यांना केली.

या तक्रारीनंतर कार्यतत्पर नूतन पवार यांनी मयूर गोसावी याच्या सांगण्यावरून संबंधित क्लिप व्हायरल करणाऱ्या अख्तर अन्सारी याला बोलावून समज दिली तसेच तुम्ही सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार आरेत चांगले काम करत असून आपसात भांडण-तंटा न करता मिळून मिसळून एकत्र काम करा,तुमच्यावर कोणतेही गुन्हे नोंद नसून अशाप्रकारे तक्रारी होत राहिल्यास पोलिसांना ऍक्शन घ्यावी लागेल त्यामुळे पुढील आयुष्यात तुम्हाला त्रास होऊ शकतो असे समजावून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर अन्सारी याने देखील पुढे अशाप्रकारे माझ्याकडून चूक होणार नाही असे सांगून हे प्रकरण मिटवले.

यावेळी पत्रकार धुरी व सांगळे यांच्यासोबत स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी दाऊद शेख तसेच ज्येष्ठ पत्रकार नागेश कळसकोंडे हे देखील उपस्थित होते.या संपूर्ण प्रकरणाला जबाबदार असणाऱ्या मयूर गोसावी याच्या विरोधात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नूतन पवार यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तपास करून तो दोषी आढळल्यास FIR नोंद करू असे आश्वासन दिल्याची माहिती निलेश धुरी यांनी दिली.