Home नांदेड सिंदखेड पोलिसांनी पाच लाख दहा हजाराचा प्रतिबंधित गुटखा केला जप्त.

सिंदखेड पोलिसांनी पाच लाख दहा हजाराचा प्रतिबंधित गुटखा केला जप्त.

105

मजहर शेख, नांदेड

नांदेड / माहूर , दि. २५ – सिंदखेड पोलीस ठाणे हद्दीतील वसराम नाईक तांडा (सिंदखेड तांडा) येथे मागील अनेक दिवसापासून प्रतिबंधित गुटख्याची साठवणूक करून लगतच्या खेडेगावात विक्री करण्याचा गोरखधंदा राजरोसपणे सुरु होता.(ता.२२) रोजी मिळालेल्या गोपीनीय माहिती वरून सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी धाड टाकली असता तब्बल पाच लाख दहा हजार रुपये किमतीचा वेगवेगळ्या कंपनी चा प्रतिबंधित गुटखा जप्त करून (ता.२३) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहूर तालुक्यातील वाई बाजार व किनवट तालुक्यातील सारखणी ही व्यापारी केंद्र प्रामुख्याने गुटखा व्यवसायासाठी प्रसिद्धीझोतात आहे.तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागात सारखणी येथून गुटख्याचा गड राखला जातो हे सर्वश्रुत आहे.सारखणी येथील काही प्रतिष्ठित मंडळींनी गुटखा व्यवसायात पाळे मुळे मजबूत केल्याने या बेकायदेशीर व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत.

सिंदखेड पोलीस ठाणे हद्दीतील वसराम नाईक तांडा येथे (ता.२२) रोजी रात्री आकरा वाजता पोलीस पथकाने धाड टाकली असता टीन पत्राच्या गोडाउन मध्ये शासनाने प्रतिबंधित केलेले व शरीरास अपायकारक असलेले गुटखा व पानमसाला साठवणूक केलेला मिळून आला.त्यात चार लाख पन्नास हजार किमतीचे आठरा नायलॉनचे मोठे पोते ज्यामध्ये प्रिमियर नजर कंपनीचा प्रतिबंधित गुटखा प्रत्येक पोत्याची अंदाजे किंमत पंचवीस हजार, साठ हजार किमतीचे नायलॉन पोत्यांमध्ये एन-५९ तंबाखू पाऊच असलेल्या प्रत्येक पोत्याची किंमत अंदाजे पंधरा हजार असे एकूण पाच लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.गोदाम व गुटख्याचे मालक सिंदखेड तांडा येथील व्यापारी इद्रिस छाटीया याच्याविरुद्ध (ता.२३) रोजी पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत मडावी यांच्या फिर्यादी वरून
गु.र.न.१५५/२०२०
कलम३२८,२७२,२७३,१८८,१२०(ब),भा द वि.व अन्नसुरक्षा मानके कायदा २००६ नियम व नियमन २०११ चे कलम २६(२)(६),२७, कलम २३ सहवाचन कलम ३० अ,५९(६) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विलास जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जयसिंग राठोड करीत आहे.सिंदखेड पोलिसाच्या या कारवाईमुळे प्रतिबंधित गुटखा व्यवसायिका मध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. माहूर,किनवट तालुक्याच्या केंद्रस्थानी सारखणी येथील गुटखा माफियांच्या सराईत टोळी मधील केवळ एक बडा मासा हाताला लागला आहे.या कारवाईचे महत्त्व लक्षात घेता पोलीस अधीक्षक नांदेड यांनी व्यापक तपास घडून आणल्यास माहूर, किनवट तालुक्यातील गुटखा व्यावसायिकांचे समूळ उच्चाटन झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र खरे.