Home विदर्भ घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेत अपहार प्रकरणी जिल्हा...

घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेत अपहार प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल

128

यवतमाळ ,  (जिल्हा प्रतिनिधी) : घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील माजी सरपंच व भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष विलास राजन्ना बडगुलवार व सचिव सुप्रिया संजय सवनकर विरुद्ध पारवा पोलीस स्टेशन तर्फे शासनाने सीआरपीसी ३७८ अन्वये यवतमाळ जिल्हा व सत्र न्यायालयात अपील क्रं. २१/२०२० अन्वये दाखल केले आहे. विशेष म्हणजे पारवा पोलीसांनी आरोपी विलास बडगुलवार, सुप्रिया सवनकर यांना न्यायालयाची नोटीस बजावली आहे. दोन्ही आरोपींची मुख्य न्यायदंडाधिकारी मुळे यांच्या न्यायालयातुन १५ जुलै २० रोजी निर्दोष मुक्तता झाली होती.

👉🏿 भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेचे काम घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथे सन २००८ साली सुरु होते. या कामासाठी शासनाकडुन कुर्ली ग्रामपंचायतीला ९ लाख ९४ हजार ४११ रुपयाचा निधी प्राप्त झाला होता. मात्र ८ लाख ३८ हजार ५०१ रुपयाचे प्रत्यक्ष काम करण्यात आले. या कामात भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष व सचिव यांनी शासनाच्या रकमेचा अपहार करुन फसवणूक झाल्याची तक्रार करण्यात आली. या कामाची प्रत्यक्ष चौकशी पांढरकवडा येथील पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय उपअभियंता संजय येवले व इतरांनी केली होती. सदरच्या चौकशीत १ लाख ५५ हजार ९१८ रुपयाचा शासनाची फसवणुक करुन अपहार झाल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले. सदरचा अहवाल जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे कडे पाठविण्यात आला. त्यानंतर माजी सरपंच विलास बडगुलवार व सचिव सुप्रिया सवनकर यांचे कडुन अपहाराची रक्कम १,५५,९१८ वसुल करुन त्यांचे विरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गट विकास अधिकारी घाटंजी यांना दिले. गट विकास अधिकारी रामदास गेडाम यांच्या रिपोर्ट वरुन पारवा पोलीसांनी अध्यक्ष विलास बडगुलवार, सचिव सुप्रिया सवनकर यांचे विरुद्ध भादंवि कलम ४०६, ४२०, ४७७ (अ) नुसार गुन्हा नोंद करुन तपासात घेतला. या प्रकरणात ठाणेदार पंजाब वंजारी यांनी पुर्वी घाटंजी न्यायालयात व नंतर मुख्य न्यायदंडाधिकारी यवतमाळ यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. यात कागदपत्रासह पांच साक्षीदार तपासण्यात आले. परंतु; मुख्य न्यायदंडाधिकारी मुळे यांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. या प्रकरणात भक्कम पुरावे असल्याने पारवा पोलीस स्टेशन तर्फे शासनाने यवतमाळच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल केले. सदर प्रकरणाची पुढील सुनावणी १८ जानेवारी २०२१ रोजी असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.