Home जळगाव “राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या दुसर्‍या टप्प्यात मेहरूण अंडरपास तयार करण्यात येईल.”

“राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या दुसर्‍या टप्प्यात मेहरूण अंडरपास तयार करण्यात येईल.”

303

मेहरूण परिसराच्या अनेक पक्षीय शिष्ठमंडळाला जळगाव जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत यांचे आश्वासन.

 

रावेर (शरीफ शेख)

जळगाव राष्ट्रीय महामार्ग NH53 जळगाव शहराच्या मध्यभागातून जातो. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना दाट लोकसंख्येमुळे नेहमी महामार्गावर अपघात होत असतात. मेहरून परिसरात या महामार्गाच्या दोन्ही बाजूला अनेक मुस्लिम वस्त्या आहेत. महामार्गाच्या दोन्ही बाजूला शाळा, महाविद्यालये, मशिदी इत्यादींमुळे लोकांना दिवसातून अनेक वेळा महामार्ग ओलांडून जावे लागते. वाहनांची मोठी वर्दळ असल्या मुळे आतापर्यंत झालेल्या अपघातात अनेक लोकांना प्राण गमावावे लागले आहेत. अनेक विद्यार्थ्यांचाही मृत्यू झालेला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या वस्तींसाठी हा महामार्ग अतिशय धोकादायक बनला आहे.
नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) गेल्या एक वर्षापासून जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम करत आहे. त्या दरम्यान लॉकडाऊन मुळे हे काम अनेक महिन्यांपासून रखडले होते. लॉकडाऊन होण्यापूर्वी परिसरातील नेत्यांनी *फेब्रुवारी २०२०* मध्ये NHAI चे प्रकल्प संचालक *श्री चंद्रकांत सिन्हा* यांना या महामार्गावरील मेहरूण परिसरासमोर “अंडरपास” बांधण्यासाठी सविस्तर निवेदन देवून विनंती केली होती कि या राष्ट्रीय महामार्गावर लवकरात लवकर अंडरपास तयार करण्यात यावे.
लॉक डॉऊन पूर्वी *15 मार्च 2020* रोजी जळगावच
खासदार उन्मेष पाटील, आमदार राजू मामा भोळे, महानगरपालिका नगराध्यक्षा भारती सोनवणे, महानगरपालिका स्थायी समिती सभापती अ‍ॅडव्होकेट सुचिता हाडा, प्रख्यात आर्किटेक्ट शिरीष बर्वे, जळगाव शहरातील काही प्रख्यात अभियंते, परिसरातील नगरसेवक रियाज़ बागवान, राजकीय नेते आणि मेहरूण भागातील प्रमुख व्यक्तींनी NHAI चे चंद्रकांत सिन्हा व त्यांच्या स्टॉफसह महामार्गाला भेट दिली आणि त्यांच्या कार्यालयात अंडरपासच्या विषयावर सविस्तर चर्चा केली. महामार्गावरील इतर दोन ठिकाणी अंडरपास तयार केल्याप्रमाणेच NHAI ने मेहरूण साठी लवकरच अंडरपास तयार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर या संदर्भात नियमित पाठपुरावा करण्यात आला.
याच परिसरातील एमआयएमचे नगरसेवक रियाज़ बागवान, अमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सय्यद शाहिद, काँग्रेसचे सचिव जमील शेख, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक रिझवान खटीक, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष जिया बागवान, रिझवान जगीरदार आणि इतर अनेक लोकांनी पाठपुरावा केला.
परंतु वस्तुस्थिती अशी आहे की NHAI च्या अधिकारीं कडून मेहरून अंडरपास तयार करण्याच्या बाबतीत कोणतीही कारवाई होतांना दिसत नाही. मेहरूणच्या लोकांच्या मनात खंत आहे कि शहराच्या इतर दोन क्षेत्रात अंडरपासचे काम सुरू झाले आहे, पण मेहरूण अंडरपास बाबत कोणतीच हलचल होतांना दिसत नाही.
महेरुण अंडरपास बाबत ही दिरंगाई लक्षात घेता विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी आणि स्थानिक समाजसेवकांनी आज (10 डिसेंबर) रोजी जळगावचे जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत यांची भेट घेऊन मेहरूण अंडरपास बाबत विलंब होत असल्या बद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रतिनिधीमंडळात परिसरातील एमआयएमचे नगरसेवक रियाज़ बागवान, वरिष्ठ पत्रकार सय्यद अली अंजुम रझवी, काँग्रेसचे सचिव जमील शेख, अमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सय्यद शाहिद, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक रिजवान खाटिक, रिझवान जागिरदार, नगरसेवक प्रतिनिधी अकरम देशमुख, सईद शेख यांचा समावेश होता.
या वेळी मा. जिल्हाधिकारींना या संदर्भात झालेल्या सर्व पाठपुराव्यांची माहिती देण्यात आली. तसेच लोकांसाठी प्राणघातक ठरलेल्या या महामार्गावर मेहरूण अंडरपास तयार करून लोकांचे जीव वाचवण्याची विनंती करण्यात आली. यावर मा. जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, लॉक डॉऊन नंतर महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. त्यांनी आश्वासन दिले कि लवकरच दुसऱ्या टप्प्यात मेहरूण अंडरपासचे काम निश्चितच सामिल करण्यात येईल.