Home मराठवाडा जन्मदात्या आईस जीवंत जाळून मारून टाकण्याचा प्रयत्न  ,

जन्मदात्या आईस जीवंत जाळून मारून टाकण्याचा प्रयत्न  ,

219
0

 

अमीन शाह

 

मुलांनीच पैशासाठी आईला जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कानडीमाळी येथे घडला आहे. पैशांसाठी जन्मदात्या आईला जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालं आहे.सरपंचांच्या तत्परतेमुळं दुर्दैवी मातेचा जीव वाचला. या प्रकरणी नराधम दोन्ही मुलांना पोलिसांनी अटक केली आहे. केज पोलीस ठाणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
50 वर्षीय इंदूबाई लालासाहेब कुचेकर असं या आईचं नाव आहे. इंदूबाई यांना संतोष, नितीन आणि धीरज अशी 3 मुलं आहेत. संतोष आणि नितीन हे दोघं बीडला राहतात. तर इंदूबाई या धीरजसोबत गावी राहतात. इंदूबाई यांचे पती लालासाहेब हरिभाऊ कुचेकर बीड पोलीस दलात कार्यरत होते. परळी शहर ठाण्यात कार्यरत असताना अचानक बेपत्ता झाले. आतापर्यंत सापडलेच नाहीत. त्यांना 2013 साली मयत म्हणून घोषित करण्यात आलं.

…म्हणून मुलांनीचा केला आईला जाळण्याचा प्रयत्न

इंदूबाई यांना पतीच्या पीएफच्या रकमेतून 13 लाख रुपये मिळाले. दोन्ही मुलांना त्यांनी 9 लाख 84 हजार रुपये देऊनही उर्वरीत पैशांसाठी मुलांनी आईच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना काल रात्री घडली. गावच्या सरपंचांनी मदतीसाठी धाव घेऊन मुलाच्या हातातील पेटती काडी विझवली. त्यामुळं पुढील अनर्थ टळला.
या प्रकरणी दोन्ही मुलांविरोधात केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. काल दुपारी 1 वाजताच्या सुमारास संतोष आणि नितीन हे दोघे कानडीमाळी येथे आले. आम्हाला पैसे देण्याचा बंदोबस्त कर नाहीतर तुझा खून करीन अशी धमकी नितीननं इंदूबाई यांना दिली. त्यापूर्वी त्यांनी केलेल्या मारहाणीमुळं इंदूबाई यांनी घाबरून गावातील लोक गोळा करून तुम्हाला पैसे देऊन टाकते असं सांगितल्यावर ते दोघं निघून गेले.  त्यानंतर रात्री 7 वाजताच्या सुमारास पुन्हा ते घरी आले आणि पैशांची मागणी करू लागले. इंदूबाई यांना आता माझ्याकडे पैसे नाहीत असं उत्तर दिलं.
आई पैसे देण्यास नकार देत आहे हे पाहून नितीन संतापला. हातातल्या बाटलीतलं पेट्रोल हिच्यावर टाक आजच हिला जीवे मारू असं त्यानं संतोषला सांगितलं. हे ऐकताच इंदूबाई यांनी भावजईच्या घराकडे पळ काढला. मात्र त्या दोघांनी त्यांचा पाठलाग केला आणि गावातील दुकानासमोर त्यांना गाठलं. संतोषनं त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकलं. तर दुसरा मुलगा नितीननं जाळण्याच्या उद्देशानं काडीपेटीतील काडी पेटवली. पेटलेली काडी त्यांच्या अंगावर फेकणार तोच गावातील सरपंच अमर राऊत यांनी त्याच्या हातावर मारलं आणि काडी विझवली. त्यामुळं हा अनर्थ टळला.
यानंतर इंदूबाई यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार केली. त्यांच्या तक्रारीनंतर संतोष कुचेकर आणि नितीन कुचेकर या दोन्ही मुलांच्या विरोधात केज पोलिसात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनि दोघांना अटक केली