Home महाराष्ट्र गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध – सरपंच रेशीम

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध – सरपंच रेशीम

17
0

१४ व्या वित्त आयोगाच्या विविध योजनांच्या लाभाने ग्रामस्थ समाधानी

महाड – रघुनाथ भागवत

रायगड , दि. १२ :- लोकसहभागातून ग्रामपंचायत विकास आराखडा नुसार आमचा गाव आमचा विकास हा महत्वकांक्षी उपक्रम राज्य शासनाने चौदावा वित्त आयोग लोकसहभागी उपक्रम हाती घेतला असून या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन ग्रुप ग्रामपंचायत सव चे विद्यमान सरपंच अनंत रेशीम यांनी व्यक्त केले.
14 वा वित्त मधून कौशल्य विकास प्रशिक्षण आणि आरोग्य शिबिर तसेच महिला बचत गटांना अर्थसहाय्य या विशेष घेतलेल्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपसरपंच शिवदास बटावले, सदस्य किरण शिगवण, अनिता बटावले, अक्षता शिनगारे, रेश्मा शिंदे, रमेश शिंदे, मयूर पारदुले, शर्मिला इंदुलकर, सुजित राऊत तसेच माजी सरपंच, उपसरपंच ज्येष्ठ ग्रामस्थ, महिला व ग्रामसेविका राखी बुटाला आदी मान्यवर उपस्थित होते.
रेशीम पुढे म्हणाले, महाराष्ट्राने पंचायत राज्य संस्थेची मुहूर्तमेढ रोवल्याने राज्याला गौरवशाली परंपरा आहे. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेचे देशातील एक उत्तम उदाहरण म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. चौदाव्या वित्त आयोग याद्वारे ग्रामपंचायतीस लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या आधारावर मोठा निधी प्राप्त होत आहे. आमचा गाव आमचा विकास हा महत्वकांक्षी उपक्रम असल्याने लघुसिंचन, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, सामाजिक वनीकरण, लघु व कुटीर उद्योग, पिकाचे पाणी, प्राथमिक शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, इमारती व दळणवळण, माहिती तंत्रज्ञान आणि अपारंपरिक ऊर्जा या 14 विषयासंबंधीच्या मूलभूत सेवा देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे सोपविण्यात आलेली आहे. या सर्व सेवा देण्यासाठी 14 वा वित्त आयोगाच्या माध्यमातून आम्ही कटिबद्ध असून गावातील लाभार्थी समाधानी होऊन गावाचे रूप पालटण्यासाठी मोलाची मदत होईल असेही ते म्हणाले.

यावेळी घेण्यात आलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण आणि आरोग्य शिबीराचा ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. येथील सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला महिला ग्रामस्थांची उपस्थिती लक्षणीय होती, त्याचबरोबर महिला बचत गटांना अर्थसहाय्य देखील यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. लोकसहभागीय या उपक्रमातून राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या 14 वित्त आयोगाच्या या महत्वकांक्षी योजनांचा लाभ ग्रामस्थ घेत असल्याने उपस्थित आजी-माजी सरपंचांनी व सदस्यांनी समाधान व्यक्त केले, तर लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतीच्या कार्याची वाहवा देखील मनोगतात व्यक्त करून समाधान व्यक्त केले. उपस्थित लाभार्थी ग्रामस्थ व दिलासा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचे, मान्यवरांचे ग्रामपंचायतीने आभार व्यक्त केले.