Home मराठवाडा मराठा तरूणांनो,तलवार नको,तराजू व तंत्रज्ञान घ्या – सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर...

मराठा तरूणांनो,तलवार नको,तराजू व तंत्रज्ञान घ्या – सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर लोया यांचे प्रतिपादन

405

घनसावंगी– लक्ष्मण बिलोरे

देश स्वतंत्र झाल्यापासून मराठी माणसाने तलवारीची भाषा केली, व्यापार व तंत्रज्ञानाकडे कधीही लक्ष दिले नाही. फक्त पोटाची खळगी भरण्यासाठी कारकूनकी, शिक्षक व शिपायाच्या नोकऱ्या केल्या. याउलट बाकीच्यांनी व्यापार व तंत्रज्ञानाचा वापर करून संपत्ती निर्माण केली,असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, समाजसेवक रामेश्वर लोया यांनी केले.ते पुढे म्हणाले, व्यापार व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उद्योग पतींनी महाराष्ट्रात जमिनी जागा विकत घेतल्या. आज मुंबईत फक्त २% प्रॉपर्टी कार्डवर मराठी माणसाचे नाव आहे, ९८% जमिनी बिल्डरांना विकल्या गेल्या आहेत. गेली ६० वर्षे तलवारीची भाषा व महाराजांची घोषणा करून आपण काय मिळवले? हा विचार करा; कारण छत्रपतींच धोरण आम्हाला कधी समजलंच नाही. किंबहुना,महाराज आम्हाला कधी कळलेच नाहीत. आम्ही तसा प्रयत्न देखील केला नाही. पोरांना नोकऱ्या नाहीत… दुष्काळ पडला, पैसा नाही… शेतकरी आत्महत्या करतोय… व्यापार तर दूरची गोष्ट… मराठा उच्चभ्रू समाज राखीव जागा मागतोय… म्हणजे गेल्या ६० वर्षात आमची इतकी अधोगती झाली आहे की, स्वत:ला उच्चभ्रू समजणाऱ्या मराठा समाजाला राखीव जागा मागण्याची वेळ आली आहे. मित्रहो, कुठेतरी खूप मोठी चूक होत आहे.
काळ बदलला आहे. तलवार, हिंसाचार व स्थानिक मसल पॉवरने राज्य, सत्ता, संपत्ती मिळवण्याचे व राखण्याचे दिवस केव्हाच निघून गेले. तलवारीची भाषा करणारे आता रिक्षा व टॅक्सी चालवतात आणि व्यापार करणारे बिल्डर्स, उद्योजक झाले. तलवारीची भाषा करणारे मुंबई बाहेर फेकले जात आहेत, मुंबईत त्यांची संख्या कमी होत आहे. तलवार पेलण्यासाठी पहिले पोट भरलेले असावे लागते हे आपण विसरलो. त्यामुळे आज पोट भरण्यासाठी मुंबई सोडून विरार, कल्याण, अंबरनाथला राहून मुंबईला लोकलचे धक्के खावून टुकार नोकऱ्या करण्याची वेळ आली आहे.
ज्यांनी तराजू हातात घेतला, छोटे मोठे व्यवसाय सुरू केले मग तो रद्दीचा व्यवसाय असो, किराणा दुकान असो, पाणीपुरी असो… तेच लोक पुणे, मुंबईतील जागा व संपत्तीचे मालक झाले. त्यातलेच काही लोक मोठे उद्योजक, व्यापारी, बिल्डर्स झाले. मुख्य मुंबईतील म्हणजे नरीमन पॉईंट, अंधेरी, बांद्रा इत्यादी ठिकाणी ९९% हून अधिक संपत्ती व सत्ता तराजूवाल्यांची आहे.
ज्यांनी तंत्रज्ञानाची कास धरली, त्यांनी जबरदस्त उडी घेतली व जगावर अधिराज्य गाजावायला सुरुवात केली. इथून पुढील दिवस त्यांचेच असतील. उदा. फेसबुक, गुगल, व्हॉटसअप, फ्लिपकार्ट इत्यादीची संपत्ती आज अरबोंच्या घरात गेली. नरेंद्र मोदीसुध्दा त्यांच्या कार्यालयास भेट देण्यास अमेरिकेला गेले, कारण तंत्रज्ञानातून प्रभावी माध्यम निर्माण करून आपल्या नाड्या त्यांनी त्यांच्या हातात घेतल्या. आज आपले माहिती स्वतंत्र त्यांच्या हातात आहे.
मराठा तरूणांनो, आज जर तुम्हाला तुमचे अस्तित्व टिकवायचे असेल तर तलवारीची भाषा सोडा,तराजू हातात घ्या. व्यापार व व्यवसायाची कास धरा, पैसा कमवल्याशिवाय गत्यंतर नाही. आज पैसा नाही म्हणून मुंबईच्या बाहेर फेकला गेला आहात, उदया नष्ट व्हाल. तंत्रज्ञान शिका,इंटरनेट व ई-कॉमर्सच्या माध्यमातून आपला माल जगभर विका व पैसे मिळवा.