Home विदर्भ ” सितादही ” पुर्वीच पांढर्या सोन्याला काळा डाग , “आभाळ फाटले”

” सितादही ” पुर्वीच पांढर्या सोन्याला काळा डाग , “आभाळ फाटले”

310

आयुष्याचा ७\१२कोरा…!

कर्जाची चिंता….!

भूमिपुत्र हतबल…!

मदतीची गरज…!

देवानंद जाधव

यवतमाळ – सध्या आभाळाच्या सारीपाटावर पावसाचा डाव रंगला आहे. नगदी पिक हातातुन जात आहे. सालाबाद प्रमाणे या ही वर्षी, अतिरेकी पावसाने शेतकर्यांची हजामत केली आहे. कधी पाण्याने, तर कधी बिना पाण्याने!
घराघरात आली रिया, पण वेळेवर भेटला नाही युरीया.हे वास्तव आहे. अवघ्या मुलुखामध्ये कापूसाचे झाड हिरव्याकंच बोंडांनी लदबदले आहे. माञ त्यावर पावसाची दृष्ट नजर पडली आहे. सितादेवी पुर्वीच पांढर्या सोन्याला काळा डाग लागला आहे.
सितादेवी, शितदही, सितादही, म्हणजे..भाताचे शित, आणि दही याचे मिश्रण शेतीच्या चारही बांधावर, किंबहुना शेतामध्ये कृमी किटकांना खाण्यासाठी नैवेद्य म्हणून टाकले जाते. शेतातील कापसाच्या पहील्या बोंडाचे पुजन करुन, त्याचे कृमी किटकांपासुन रक्षण करण्यासाठी शेतकरी त्यांची सहचारीणी,हात जोडून प्रार्थना करत असते. यालाच आमच्या शेतकर्याच्या घरी ” सितादेवी ” म्हणतात. शंभर पानाचे बुक भरेल ईतक्या अमर्याद संकटाचा सामना करुन, तमाम शेतकर्यांनी शेतातील पिक पोटच्या पोरागत जपले. पण….
पाखरांना फसविण्यासाठी रचलेल्या फाशात स्वतः पारधीच फसावा, अशी गत शेतकर्यांची झाली आहे. आंबा पाडावर आला अन् कावळ्याला मुखरोग झाला. अशी अवस्था शेतकर्यांची झाली आहे. घरात खायला अन्न नसतांना देखील पाहुण्यांना पंचपक्वानाचा घास भरविण्याची शेतकर्यांच्या घरात आजही परंपरा आहे. जगाच्या पोटाची भुकेची आग आग शमविणारा शेतकरी देशोधडीला लागला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नामदार पुढारी यांचे नाव जरी घेतले, तरी शेतकर्यांना दिवसभर करपट ढेकर येते. जेथे चोरांची भिती तेथेच अंधार पडला आहे.
येथे कागदावर केवळ रेषा ओढणार्याला अलीशान अन्न वस्ञ निवारा मिळतो आहे, आणि स्वतःच्या रक्ताने फाळाने जमिन नांगरणार्या धरतीच्या धन्याला, आजही नागवले जात आहे.सुईला धागा सुटत नाही, अन् सासु सुनेचं पटत नाही. अशा मानसिकतेत शेतकरी शेती करतो आहे. काचाच्या घरात राहणारे स्वयंघोषीत शेतकरी नेते, शेतकर्यांच्या जीवावर साडी, गाडी, माडी, कमाऊन बसले आहेत. शेती प्रधान देशात…यवतमाळ जिल्ह्याने शेतकरी आत्महत्या संदर्भात जगाच्या नकाशात आपले तोंड काळे करुन घेतले आहे. याला कोणीही गांभीर्याने घेत नाही. शेतकर्यांच्या जीवावर पद, पदवी,.पैसा, पुरस्कार मिळविणारे बगळे शेतकरी मायबाप संकटात असताना मुग गीळुन बसावेत हे अत्यंत संतापजनक आहे. शेतकर्याच्या शांत स्वभावाचा अंत पाहु नका, कारण बंद घड्याळ देखील दिवसातुन दोन वेळा अचुक वेळ दाखवत असते, हे लक्षात ठेवा..
तुर्तास..ऊडीद मुग सोयाबीन हे नगदी पिक हातातुन जात आहे, किंबहुना गेले आहेत. पण…
सितादही पुर्वीच पांढर्या सोन्याला काळा डाग लागला आहे, हे यवतमाळ जिल्ह्यातील वास्तव आहे. तेव्हा पुढार्यांनो….
ऊघडा डोळे बघा निट…!