Home विदर्भ अनं स्मशान भूमिही गहिवरली…..

अनं स्मशान भूमिही गहिवरली…..

566
0

१५ दिवसात १८जनांचा मृत्यू .
एकाच दिवशी पेटले चार सरण..
पुञ वियोगाने आई घायाळ…

देवानंद जाधव

यवतमाळ (मंगरूळ) –  मृत्यू हे जिवनाचं अंतीम सत्य आहे. आईच्या पोटातुन जन्माला येताच, मृत्यूचं प्रमाणपञ प्रत्येकाच्या कपाळावर गोंदलेलं असतं. किंबहुना माणसाचं जीवन हे समुद्रातील वाळूच्या किल्ल्यासारखं देखील असतं. जे समुद्राला आलेल्या भरतीनं क्षणार्धात होत्याचं नव्हतं होत असतं. मृत्यू कधी कुणावर झडप घेईल हे अगदी पारंगत पंडीतालाही कळत नसतं.शेवटी ” आदमी मुशाफीर है आता है..जाता है…हेच खरं असतं…..याचाच वेदनादायी प्रत्यय यवतमाळ च्या आर्णी तालुक्यातील जवळा या गोजिरवान्या गावात आला. गावामध्ये गत पंधरा दिवसापासुन जणु मृत्यचा फेरा सुरू आहे. पंधरा दिवसात तब्बल अठरा जन परलोक प्रवासाला निघुन गेले आहेत. एकाचा कोव्हीडने, तर अन्य सतरा जन नैसर्गिक आणि अनैसर्गीक पणे गतप्राण झाले आहेत.
सध्या अवघे जग कोव्हीड 19 ने भितीच्या सावटाखाली जीवन जगत आहेत. ऊजाडणार्या पहाटे मृत्यू कुणाच्या घरात चोर पावलांनी पाऊल टाकेल?
या प्रश्नाने संपुर्ण गाव निरुत्तर झाले आहे. मृत्यू कुणालाच नकोसा असतो. माञ काळ आणि वेळेसमोर कुणाचेही काही चालत नसते. गेल्या पंधरवाड्यात अर्ध्यावरती डाव मोडुन,मानवी देहाचा त्याग करण्याचा प्रारंभ साहेबराव पिसे यांचे पासुन झाला. अगदी दुसर्या तिसर्या दिवशी नामदेव सलाम ,आणि आत्माराम यलप्पा पवार यांनी मृत्यूला कवेत घेतले. अन् जणु मृत्यची श्रृंखला सुरु झाली. किराणा व्यापारी प्रकाश जैन, ज्ञानेश्वर लक्ष्मण कोरटकार, हे ही त्यांच्या मागे मागे गेले. शिवाय काळजाच्या कोपर्यात ओथंबलेल्या भाव भावनांचा कोंडमारा झाल्याने, सळसळत्या रक्ताच्या तरणाबांड दत्तात्रय चोपडे यांनी गळफास घेत स्मशानभूमी जवळ केली. मृत्यू नंतरचे सोपस्कार पार पाडत असतांनाच विलास गेडे यांचाही श्र्वास थांबल्याची खबर गावभर वार्याच्या वेगाने पसरली. ईकडे धावाधाव सुरु असतानाच तिकडे पंचफुलाबाई ढगे विजेचा जोरदार धक्का बसल्याने मृत्यू मुखी पडल्या. याच दरम्यान शेषेराव पिंजरकर हे सुध्दा जग सोडून गेले.
आपल्या सर्वांच्या मनात ज्याची कमालीची भिती आहे. अगदी त्याच कोरोणा विषाणुने बाधीत होऊन शरद पुसदकर यांचाही यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. अन् मागे मागे माणिक वाघमारे, रेखा बनसोड, यमुना नाना चव्हाण, यांनीही जीव सोडला.
जवळा वासीयांनी गत पाच पन्नास वर्षात कधीही बघीतलेच नसेल,असे काळीज चिरत नेणारे दृश्य नुकतेच आप आपल्या डोळ्यात पेरून घेतले.
शंकर तळेकर ,भास्कर पिसे ,भाऊराव कराळे, आणि आत्माराम ईरतकर यांचा एकाच दिवशी मृत्यू झाला. गावच्या स्मशानभूमीत एकाच वेळी या चार जनांचे सरण आभाळाच्या छताखाली धगधगत होते..
पिढ्यानुपिढ्या गावातील मृतकांना आपल्या पदरात घेणारी स्मशानभूमीही आज गहिवरली…….अन् आभाळानेही आपल्या अश्रूंना वाट मोकळी देत जणु मृतकांना साश्रु नयनांनी आदरांजली वाहीली…
अन्…..लगेच स्मशानभूमीत कुणाचा तरी मोबाईल खणखणला….चंदु वैद्य या दुधाचे ओठ देखील न सुकलेल्या चिमुरड्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा सांगावा आला..
तेव्हा ऊपस्थीत तमाम शेकडो लोकांचे चेहरे पुरते काळवंडून गेले. पुञ वियोगाच्या अपार दुःखाने चंदुच्या आईने यावेळी फोडलेला हंबरडा आगदी आभाळ चिरत गेला.
या सगळ्यांच्या जाण्याने…
आप आपल्या परीवाराची मोठी हानी झाली आहे. ती कधीही न भरुन निघणारी आहे. तरी देखील अश्रुंना न कवटाळता धैर्यानं संकटाचा सामना करण्याचं बळ त्यांच्या परिवाराला मिळो हिच विधात्या चरणी प्रार्थना…
ओम..शांती….
ओम…शांती….
ओम….शांती….