Home जळगाव भुसावळ शहरात सीएए-एनआरसी विरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे विराट मोर्चा

भुसावळ शहरात सीएए-एनआरसी विरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे विराट मोर्चा

152

शरीफ शेख

रावेर , दि. ११ :- एनआरसी,सीएए कायदा रद्द करा,संविधान बचाव, देश केंद्र सरकार मुर्दाबाद यासह इतर जोरदार घोषणा देत भुसावळ येथे बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीेने दि.८ जानेवारी रोजी शहरात मुस्लिम बांधवांसह इतर धर्मियांनी विराट मोर्चा काढला होता. सुधारित नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिका या कायद्याच्या विरोधात रजा टॉवर पासुन मोर्चास प्रारंभ झाला.

मोर्चात सरकारच्या धोरणांच्या विरोधात घोषणा देण्यात येत होत्या. तर युवकांनी हातात तिरंगी झेंडे हातात घेतलेले होते तर काहीनी निषेधाचे फलक तर काही युवकांनी हाताला काळया फिती बांधल्या होत्या. मोर्चात प्रचंड संख्येने नागरिक सामील झाल्यामुळे शहरातील वाहतुक तब्बल एक ते दिडतास विस्कळीत झाली होती.
शहरातील रजा टॉवर येथून मोर्चास सुरुवात होऊन जुन्या नगरपालिकेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर मोर्चा पुढे मार्गस्थ झाला.यावेळी मोर्चेक-यांनी जोरदार घोषणाबाजी दिल्याने संपूर्ण शहर दणाणून निघाले. बाजारपेठ पोलिस ठाणे,लोखंडी पुल, हंबर्डीकर चौक,वसंत टॉकिज, महात्मा गांधी पुतळा मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर मोर्चाचा समारोप होऊन सभा घेण्यात आली. मोर्चादरम्यान कायद्याला विरोध दर्शवत मोर्चेक-यांनी घोषणाबाजी केली. अतिशय शिस्तबद्ध निघालेल्या या मोर्चात हजारो विविध धर्मिय बांधव सहभागी झाले होते. डी.एस.ग्राऊंड (डॉ.बाबासाहेब आंबेडकर पटांगण) मोर्चा पोहोचल्यानंतर विविध मान्यवरांनी कायद्याला विरोध दर्शवत केंद्र सरकारवर सडकून टिका केली.देशात नागरिकता संशोधन कायदा लागू करण्यात आला आहे. यामुळे देशाची एकता व अखंडता धोक्यात आली आहे. तसेच ईव्हीएम मशीन बंद करुन मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यात यावे आदी मागण्यांसाठी बहुजन क्रांती मोर्चातर्फे मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर मोर्चाची सांगता करुन सभेत रूपांतर झाले.
याप्रसंगी मंचावर पीआरपी जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रीय मजदूर सेनेचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे, बहुजन क्रांती मोर्चाचे प्रदेश संयोजक प्रा.विलास खरात, शकील फिरोज,प्रतिभा उबाळे, मो.सैय्यद नूर आलम,मो.नूर मोहम्मद, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष फिरोज शेख,हाजी आशिक खान,माजी नगरसेवक शेख पापा शेख कालू,शेख साबीर, गणेश(भुरा)सपकाळे, कुंदन तायडे, हाफीज अनस,एजाज खान,अशरफ हसन खान आदी उपस्थित होते. यावेळी हाफीज फिरोज,मौलाना सैय्‍यद नुरआलम,हमीद शेख,मौलाना नुर मोहम्‍मद,प्रा.प्रतिभा उबाळे आदी प्रमुख वक्त्यांनी सभेला संबोधित केले. यात देशात भाजप सरकारतर्फे नागरिकता संशोधन कायदा लागू केला जाणार आहे. यामुळे अल्पसंख्याक समाजात अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. मोदी सरकार षड्यंत्र रचून नागरिकांच्या अधिकारांचे हनन करीत असल्याचा आरोप वक्त्यांनी केला. व सरकारच्या धोरणांविरोधात वक्तांनी सडकुन टिका केली.