Home विदर्भ काया मातीत पिकते मोती हो …भाऊ माह्या वराडामंधी …..

काया मातीत पिकते मोती हो …भाऊ माह्या वराडामंधी …..

226
0

देवानंद जाधव – मंगरूळ 

यवतमाळ :- ” ऊडीद गेले.. मुग गेले, आस आता कायची? लेकीच्या दिवाळी साठी, बकरी विकली घरची “अशी विदारक अवस्था गतवर्षी शेतकर्यांची झाली. आभाळाच्या विस्तीर्ण छताखाली घरादारातील अवघी “इस्टेट ” मातीमध्ये गाडुन, नशीबाचे प्रमाणपञ सही साठी पावसासमोर ठेवणार्या, शेतकर्यांचा अनेकदा भ्रमनिरास आणि घात झाला. काचेच्या घरात राहणार्यांची आब झाकण्यासाठी, ऊघड्या अंगाने कापूस पैदा करणारा शेतकरी माञ सातत्याने दिवसेंदिवस ऊघडा पडत चालला आहे. उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळण्याची आशा करणे म्हणजे, आंधळ्याच्या शहरात आरसे विकन्या सारखे झाले आहे.
यावर्षी मृग नक्षञा नंतर पावसाने डोळे वटारले. केलेली पेरणी पावसा अभावी ” फेल “गेली. दुबार पेरणीची वेळ भुमिपुञांवर आली. जिल्ह्यात अनेकांची दुबार पेरणीही ऊलटली.त्यातल्या त्यात अंधारात उंदीर पकडणार्या मांजराच्या औलादीकडुन बोगस बि बियाणे, तिबार पेरणीसाठी शेतकर्यांच्या मस्तकी मारले गेले, पंचक्रोशीतील तमाम भूमिपुत्रांची अवस्था अर्धवट ठेचलेल्या सापासारखी झाली. तरीही अंगात ऊसणा आव आणला पण कणा मोडु दिला नाही. पेरणी मागुन पेरणी करत जीव नाकीनऊ आला, जुनच्या दुसर्या सप्ताहात आणि जुलै महिन्यात पावसाने जरा लाज राखली, मनसोक्त पावसाच्या स्पर्शा साठी आसुसलेली धरणी माय तृप्त झाली. अवघे शिवार जणु मखमली शालु परिधान करुन ,शेतकर्यांच्या स्वप्नांना आकार देऊन ती साकार करण्यासाठी डौलाने डोलत असतांनाच, ऑगस्ट महीन्यात पावसाने कमी जास्त प्रमाणात “झेंडा “फडकवत ठेवला.
परिणामी शेतकर्यांच्या शेतातील ऊडीद मुगासह अन्य डाळ वर्गीय पिके सडुन गेली. आताची पावसाचा उताविळपणा सुरू आहे. वयात आलेल्या सोयाबीन आणि कापुस पिकावर त्याची आडवी नजर दिसत आहे. हे दोन्ही पिक सध्या जोमात आहे.
कपासीचे झाड असंख्य बोंडाने लदबदले आहे. पोटच्या पोरागत जपलेलं सोन्या सारख्या पिकावर आता वन्यजीव आणि वन्यप्राण्यांची दृष्ट नजर पडली आहे. यवतमाळ तालुक्यासह जिल्हाभरातील पिक राञभरांतुन उध्वस्त केले जात आहे. दुबार, तिबार पेरणी,खोडकिडी , चक्रभुंगा, ऊंटअळी, मररोग, अशा मणभर रोगाच्या तावडीतून वाचलेले पिक,वन्यप्राणी आपल्या बापाची खाजगी मालमत्ता समजुन पिक फस्त करत आहेत. ईकडे आड,तिकडे विहीर, दोन्ही कडे मरण अशा हताश मानसिकतेत गावा गावातील भूमिपुञ जगत आहे. पिक रक्षणासाठी शेतात जागल करणार्या अनेक शेतकर्यांच्या नरडीचा घोट वन्यप्राण्यांनी घेतला आहे. वारा, वादळ, विंचुकाटा ऊषाला घेऊन झोपणारा शेतकरी दरवर्षी प्रमाणे यंदाही आस्मानी आणि सुलतानी संकटाच्या चक्रव्युहात अडकला आहे. बायकापोरांची वर्षभरांची भाकरीची सोय लावण्यासाठी अशाही निराशेच्या अवस्थेमध्ये, शेतकरी धडपड करत आहे. माञ त्यांच्या नशिबाचीच पडझड झाली आहे. वन विभागाने विभागाने विनाकारण कायद्याचा किस न पाडता ,वन्यप्राण्यांनी केलेल्या पिकांच्या नुकसानीचे योग्य मुल्यांकन करुन तातडीने अर्थसहाय्य करावे अशी माफक अपेक्षा तमाम मायबाप शेतकर्या ची आहे. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करणे हे वनविभागाला या जन्मात तर शक्यच नाही, हे शेतकर्यांनाही माहीत आहे. माञ जगा आणि जगू द्या. हे धोरण ठेवल्यास शेतकरी चार दिवस जास्त जगेल ईतकेच.तुमच्या आमच्या पोटाच्या भुकेची आग शमविण्यासाठी काबाडकष्ट करुन, जिल्ह्यातील शेतकर्यांनी ज्वारीची पेरणी केली आहे. आज घडीला हे पिक आभाळाचे मुके घेत आहे. शेतकर्यांनीही सूगीचे स्वप्न आप आपल्या डोळ्यात पेरून घेतली आहेत .त्यांची ही स्वप्ने दिवास्वप्न ठरु नये अशी आशा आहे.एकंदरीत
” काया मातीत पिकते मोती हो भाऊ……..
माह्या वराडामंधी “
हे सुर्य प्रकाशाईतके सत्य आहे.