पोलीसवाला ऑनलाइन मिडिया
पालघर / मुंबई , दि. ०९ :- ( विशेष प्रतिनिधी ) – आमची सगळ्यात मोठी कमाई म्हणजे जनतेचा आमच्यावर असणारा विश्वास असे मत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जिंकलेल्या जागा वाढल्यानंतर पक्षाचे सेंट्रल कमिटी सदस्य डॉ. अशोक ढवळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केले आहे
यावेळी ढवळे म्हणाले की, पालघर जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडल्या आणि 8 जानेवारीला त्यांचे निकाल जाहीर झाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने 2020 मध्ये जिल्हा परिषदेच्या 6 जागा आणि पंचायत समित्यांच्या 12 जागा, अशा एकूण 18 जागा जिंकल्या आहेत. 2015 सालच्या निवडणुकीत पक्षाने जिल्हा परिषदेच्या 5 जागा आणि पंचायत समित्यांच्या 10 जागा, म्हणजे एकूण 15 जागा जिंकल्या होत्या. म्हणजे या खेपेस त्यात 3 जागांची भर पडली आहे. या खेपेस लोकसभा आणि विधानसभेच्या वेळची आघाडी टिकवण्याचा प्रयत्न केला, पण तो बहुतेक ठिकाणी यशस्वी झाला नाही. तरीही पक्षाने जिंकलेल्या जागा वाढल्या हे विशेष. तलासरी तालुक्यात जिल्हा परिषदच्या 5 पैकी 4, आणि पंचायत समितीच्या 10 पैकी 8 जागा जिंकून आमच्या सर्व कॉम्रेडसनी उत्तम कार्य केले आणि पंचायत समितीवर लाल बावटा पुन्हा एकदा फडकवला. 1962 पासून गेली 58 वर्षे तलासरी पंचायत समितीवर लाल बावटा अखंड फडकत आहे. असे दुसरे उदाहरण महाराष्ट्रात इतर कोणत्याही पक्षाचे बहुधा नसावे. डहाणू तालुक्यात जिल्हा परिषदची 1 आणि पंचायत समितीच्या 2, जव्हार तालुक्यात जिल्हा परिषदची 1 आणि पंचायत समितीची 1 आणि विक्रमगड तालुक्यात पंचायत समितीची 1 अशा जागा माकपने जिंकल्या आहेत. वाडा आणि पालघर तालुक्यातही पक्षाने काही जागा लढवल्या. आपल्या काही जागा खूप कमी मतांनी पडल्या आहेत. ऑक्टोबरच्या विधानसभा निवडणुकीनंतर लगेच ही अतिमहत्वाची निवडणूक असताना देखील, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या मुंबईतील राष्ट्रीय अधिवेशनासाठीचा 7 लाख रुपयांचा फंड कोटा ठाणे – पालघर जिल्ह्याने ओलांडला, 27 डिसेंबरच्या मुंबईतील राज्यव्यापी महिला रॅलीत 2,000 हून अधिक महिला उतरवल्या आणि 25,000 चा जमसंचा सभासदकोटाही पूर्ण करत आणला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आपल्या सर्व विजयी उमेदवारांचे, विजयी होऊ न शकलेल्या उमेदवारांचे आणि मुख्य म्हणजे या निवडणुकीत केवळ उमेदवार नव्हे, तर लाल बावटा विजयी करण्यासाठी अहोरात्र काम केलेल्या पक्ष व जनसंघटनांच्या हजारों कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन तुमच्या माध्यमातून करत आहोत, तसेच विजयी उमेदवारांना निवडून देणाऱ्या जनतेचे मनःपूर्वक आभार मानत आहे.
डहाणूतील पक्षाच्या नवनिर्वाचित आमदाराप्रमाणेच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये निवडून गेलेले पक्षाचे प्रतिनिधी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या पक्षाच्या जिल्हा, तालुका व विभाग कमिट्या सर्वसामान्य जनतेची इमानेइतबारे आणि स्वच्छ चारित्र्याने सेवा करतील, त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील आणि मुख्य म्हणजे जनतेच्या लढयांचे नेतृत्व जास्त प्रभावीपणे करून पक्ष व जनसंघटना जास्त बळकट, रेखीव आणि व्यापक करण्याचा जिवापाड प्रयत्न करतील, असे भारताचा कम्युनिस्ट पक्ष ( मार्क्सवादी ) सेंट्रल कमिटी सदस्य डॉ. अशोक ढवळे यांनी सांगितले आहे. माकप मध्ये संघटना बांधणी, दररोजचा कार्यकर्त्यांशी संपर्क असतो चंद्रकांत घोरखाना यांनी सांगितले. आहे.
जनतेने लाल बावट्या वर विश्वास ठेवला आहे तो विश्वास सार्थ केल्याशिवाय मी शांत बसणार नाही असे मत डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आमदार कॉम्रेड. विनोद निकोल यांनी व्यक्त केला आहे.