Home महत्वाची बातमी डॉक्टर पत्नीसह संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या;

डॉक्टर पत्नीसह संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या;

772

 

नागपुरातील घटनेने खळबळ

उच्चशिक्षित कुटुंब ,

सविता कुलकर्णी ,

प्राध्यापक पती, मुलगा व मुलीसह डॉक्टर पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुरात ही घटना घडली आहे. कोराडी येथील ओमनगर येथे जगनाडे ले-आऊट येथे मंगळवारी दुपारी घटना उघडकीस आली. एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूने उपराजधानीत खळबळ उडाली आहे.

धीरज डिंगाबर राणे (४२), पत्नी डॉ. सुषमा धीरज राणे (३९), मुलगा ध्रुव धीरज राणे (११), मुलगी लावण्या उर्फ वण्या धीरज राणे (वय ५) अशी मृतकांची नावे आहेत. धीरज राणे हे वानाडोंगरीतील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक विभागाचे विभाग प्रमुख तर डॉ. सुषमा या धंतोलीतील अवंती हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या.
राणे दाम्पत्याकडे धीरज यांच्या आत्या प्रमिला (वय ६५) या राहतात. दुपार झाल्यानंतरही चौघे खोलीतून बाहेर न आल्याने प्रमिला यांनी धीरज यांना आवाज दिला. प्रतिसाद मिळाला नाही म्हणून प्रमिला यांनी आरडाओरड केली. यावेळी एका शेजाऱ्याने सुषमा यांचे भाऊ रितेश सिंग यांना माहिती दिली. माहिती मिळताच ते ओमनगर येथे आले. दरम्यान एका नागरिकाने पोलीस नियंत्रण कक्षाला कळवले.
माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निलोत्पल, कोराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वजीर शेख यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. यावेळी धीरज, ध्रुव व लावण्या या तिघांचे मृतदेह पलंगावर पडलेले आढळले. तर बाजूलाच पंख्याला डॉ. सुषमा यांनी गळफास लावून घेतला असल्याचं पोलिसांना दिसलं.
पोलिसांनी पंचनामा करून चौघांचे मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केले. तूर्त कोराडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. राणे कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याचे कळताच नातेवाईकांनी ओमनगरमध्ये धाव घेतली. सुखी कुटुंबातील चौघांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.