Home मराठवाडा केंद्र शासनाच्या धोरणांविरुद्ध पुकारलेल्या ‘भारत बंद’ ला किनवटमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद

केंद्र शासनाच्या धोरणांविरुद्ध पुकारलेल्या ‘भारत बंद’ ला किनवटमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद

41
0

मजहर शेख

नांदेड / किनवट , दि. ०८ :- मोदी सरकारच्या कामगार विरोधी धोरणांविरुध्द पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला आज बुधवारी (ता.8) किनवट शहर व परिसरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
बंद निमित्ताने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य समिती सदस्य अर्जुन आडे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रमुख मार्गावरून फेरी काढण्यात आली. फेरीचा समारोप जिजामाता चौकात करण्यात आला.

यावेळी माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व्यंकटराव नेम्मानीवार, माजी नगराध्यक्ष इसाखान, भाकपचे नेते गंगारेड्डी बैनमवार, विद्यार्थी नेते स्टॅलिन आडे, अर्जुन आडे यांच्यासह अनेकांची भाषणे झाली. यावेळी वकील संघाच्या वतीने अ‍ॅड.सुभाष ताजने, अ‍ॅड.टी.एच.कुरेशी, अ‍ॅड.यशवंत गजभारे, अ‍ॅड.जी.एस.रायबोळे यांनी उपस्थित राहून बंदला पाठिंबा व्यक्त केला.
फेरीत विद्यार्थी, शेतकरी व विविध पक्षांच्या राजकीय कार्यकर्त्यांचा, विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता. मोदी सरकारच्या कामगारविरोधी आणि लोकांच्या इच्छेविरुद्धच्या धोरणांच्या निषेधार्थ विविध कामगार संघटनांनी बुधवारी(ता.8) ‘भारत बंद’ची हाक दिली होती. या देशव्यापी बंदमध्ये प्रमुख कामगार संघटना आणि बँक कर्मचारी संघटनांही सहभागी झाल्या आहेत. देशभरातील विविध 60 विद्यार्थी संघटना आणि 175 शेतकरी संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला आहे.
या भारत बंदमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचारी, सहकारी, ग्रामीण बँकांचे कर्मचारी आणि एलआयसीचेही कर्मचारी सहभागी झाले आहेत. देशातील 12 विमानतळांचे खासगीकरण करण्यात आले आहे. बीपीसीएल, एअर इंडियासारख्या कंपन्यांही विकण्याची तयारी मोदी सरकारने चालवली आहे. बीएसएनएल, एमटीएनएलचे विलिनीकरण करण्याची घोषणा करून या कंपन्यांमधील 93 हजार कर्मचार्‍यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडून बेरोजगार करण्यात आले आहे. रेल्वे, युद्ध सामग्री बनवणार्‍या कंपन्यांबरोबरच बँकांच्याही विलिनीकरणाचा घाट घातला जात आहे.

या सर्व गोष्टींना बंद पुकारणार्‍या कामगार संघटनांचा विरोध आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदवही आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी या वादग्रस्त कायद्यांनाही आंदोलक कामगार संघटनांचा विरोध आहे. किनवट येथे बंदच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. मारोती थोरात यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Unlimited Reseller Hosting