विदर्भ

व्यवस्थेवर आरोप करणा-या रुग्णानेच व्यक्त केली डॉक्टरांप्रती कृतज्ञता….!

Advertisements
Advertisements

जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग अहोरात्र झटत असल्याचे मांडले मत…!

यवतमाळ , दि. 8 : – कोरोना पॉझेटिव्ह रुग्ण असलेल्या व येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी भरती झालेल्या रुग्णाने सुरवातीला येथील प्रशासनाविरुध्द ताशेरे ओढले. मात्र नंतर त्याला त्याची चूक उमगली. येथील डॉक्टरांच्या अहोरात्र मेहनतीमुळेच आपण पूर्णपणे बरे होऊन घरी जात आहोत. पॉझेटिव्ह असलेला हा व्यक्ती निगेटिव्ह होऊन घरी जात असतांना त्याने वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व डॉक्टर्स व स्टाफबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे आभार मानले. एवढेच नाही तर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग नागरिकांसाठी अहोरात्र झटत असल्याचे त्याने सांगितले. बरे झालेल्या या रुग्णाचे नाव आहे अमोल व्हडगिरे , पुसद येथील देशमुख नगरात राहणारा अमोल व्हडगिरेला खोकला आणि श्वसनाचा त्रास जाणवत असल्यामुळे 23 जुलै 2020 रोजी तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती झाला. त्यावेळेस त्याची प्रकृती खालावली होती. त्याच्यावर उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर्स, नर्स आणि संपूर्ण स्टॉफ सुरवातीपासूनच मेहनत घेत होते. गत सहा महिन्यांपासून संपूर्ण आरोग्य यंत्रणा नागरिकांना बरे करण्यासाठी अहोरात्र झटत आहे. वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होणारा प्रत्येक कोरोनाबाधित व्यक्ती कोरोनामुक्त झाला पाहिजे, असा ध्यास संपूर्ण यंत्रणेने घेतला आहे.
मात्र व्यवस्थेमध्ये किंवा सुविधा पुरविण्यात कधीकधी कमतरता राहू शकते, हे सर्वांनी समजून घ्यायला हवे. आहे त्या संसाधनांचा व उपलब्ध मनुष्यबळाचा पुरेपूर उपयोग करून सर्व रुग्णांना योग्य उपचारासोबतच मानसिक समाधान देणे, यालाच येथील प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. मात्र असे असतांनाही अमोल व्हडगिरे याने जिल्हा प्रशासनासह वैद्यकीय महाविद्यालयाची संपूर्ण व्यवस्थाच आपल्या जीवावर उठली आहे, असा समज करून घेतला व या गैरसमजूतीतून सोशल मिडीयावर व्यवस्थेविषयी रोष व्यक्त केला.
याची तात्काळ दखल जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतली. याप्रकरणी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांना पालकमंत्र्यांनी तातडीने दखल घेण्याच्या सुचना केल्या. त्यानुसार जिल्हाधिका-यांनी चौकशी करण्यासाठी व रुग्णाने केलेल्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीचे गठन केले. एकीकडे या सर्व बाबी होत असतांनाच अमोलवर योग्य उपचार सुरू होते. डॉक्टरांवर त्याने आरोप केले तरी याबाबत मनात कोणीही कटूता न ठेवता डॉक्टरांनी त्याच्यावर अतिशय काळजीपूर्वक उपचार केले. प्रशासनाचीसुध्दा त्याला सोबत मिळाली. या सर्वांची फलश्रृती म्हणून आज अमोल ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ होऊन घरी परतला. मात्र रुग्णालयातून निरोप घेतांना त्याने जिल्हा प्रशासन व वैद्यकीय महाविद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी तो म्हणाला, पूर्ण बरा होउन घरी जात असल्याचा आनंद आहे. येथील जेवणात सकसता वाढली आहे तसेच भरती असलेल्या रुग्णांना जेवणाची चव लागावी म्हणून शेंगदाण्याची चटणीसुध्दा देण्यात येते. बाथरुमध्ये स्वच्छता चांगली असते. सांडपाण्याची येथे योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे, सर्व डॉक्टर्स, नर्स, सफाई कर्मचारी तसेच संपूर्ण स्टाफ रुग्णांवर अतिशय मेहनत घेत आहे. पीपीई कीट घालून पॉझेटिव्ह रुग्णांची अतिशय आस्थेवाईपने विचारपूस करतात. या किटमध्ये त्यांना श्वास घेण्याचा त्रास होत असतांना तसेच पाझेटिव्ह रुग्णांच्या जवळ गेल्याने लागण होण्याची शक्यता असतांनाही डॉक्टर्स स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुग्णांवर उपचार करीत आहे, असेही अमोल म्हणाला. यावेळी त्याने रुग्णालयाचा अभिप्राय अर्जसुध्दा भरून दिला. सर्व डॉक्टर्स स्टाफने त्याला घरी जातांना निरोप दिला.

प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार देण्याला प्राधान्य – जिल्हाधिकारी सिंह

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेला प्रत्येकच रुग्ण अतिशय महत्वाचा आहे. कोरोनाबाधित असलेल्या रुग्णांना कोरोनामुक्त करणे, यालाच प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. रुग्णांबाबत कोणताही भेदभाव केला जात नाही. प्रत्येकाला योग्य उपचाराअंती घरी सुखरूप घरी सोडणे, यासारखा दुसरा आनंद नाही. गंभीरावस्थेत असलेल्या अमोल व्हडगिरेला बरे करण्यात वैद्यकीय महाविद्यालयाने चांगली मेहनत घेतली त्यामुळे संपूर्ण डॉक्टर्स, नर्स व इतर स्टाफचे अभिनंदन. 15 दिवसानंतर अमोल बरा होऊन घरी जात असल्याची खुशी आहे, असे मत जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी व्यक्त केले.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

विदर्भ

भांब (राजा) चा टोल नाका वाहन धारकांचे खिसे हलके करण्यासाठी सज्ज…!

देवानंद जाधव  यवतमाळ , (मंगरूळ) – नागपूर तुळजापुर या 361क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर यवतमाळ पासुन बावीस ...