Home विदर्भ बापाची “तिरडी”अंगनात, “लेक”गेली परिक्षा केंद्रात

बापाची “तिरडी”अंगनात, “लेक”गेली परिक्षा केंद्रात

53
0

९७.६० गुण घेऊन अव्वल

देवानंद जाधव (मंगरूळ)

यवतमाळ – मृत्यू हे जिवनाचं अंतीम सत्य आहे. शिवाय माणसाचं जीवन हे जादुच्या विहिरीतील पाण्याचा बुडबुडा आहे. ते कधी ऊपकेल याचा भरवसा नाही. किंबहूना माणसाचं जीवन हे समुद्रातील वाळूच्या किल्ल्यासारखं असतं, समुद्राला आलेल्या भरतीनं त्याचं क्षणार्धात होत्याचं नव्हतं होत असतं. काळाच्या पोटात काय दडलयं, हे अगदी पारंगत पंडीतालाही कळत नसतं. शेवटी “आदमी मुशाफीर है, आता है, जाता है! हेच खरं असतं, यवतमाळ तालुक्यातील हिवरी येथील पवार परिवारावर अशाच एका बेसावध क्षणी काळाने घात केला. सततची नापिकी आणि कर्जाच्या ओझ्याखाली येऊन, विचारांच्या विस्तीर्ण अशा वादळात गटांगळ्या खाऊन खाऊन पुरता दमलेल्या सुधाकर पवार ने विहीरीत ऊडी घेत स्वतःची जीवन रेखा पुसुन टाकली. दि.६ मार्च रोजी घडलेल्या या घटनेने अवघ्या परिवाराच्या काळजावर आभाळभर दुःखाचं गाठोडं येऊन पडलं. सुधाकरच्या परलोक प्रवासाची खबर पंचक्रोशीत वार्याच्या वेगाने पसरताच, गणागोतांचा गोतावळा, मित्र, हितचिंतक, यांची पावलं आपसुकच सुधाकर च्या घराकडे वळलीत त्यांच्या अंतीम दर्शनासाठी. गणागोतांची अंत्यसंस्कारा साठी लागणार्या साहीत्याची जुळवाजुळव करण्यासाठी लगबग सुरु झाली, नेमका याच वेळी लाडाची लेक सानिकाने आभाळ चिरत जाईल असा हंबरडा फोडला. अन् क्षणार्धात सन्नाटा पसरला. बोट धरुन चालायला शिकविणारा, आपल्या अंगा खांद्यावर खेळवणारा, सतत मायेची ममता, प्रेम आणि प्रेरणा, देऊन गालगुच्चे घेणाऱ्या आपल्या बापासाठी अंगणात तिरडी बांधत असल्याचे बघुन सानिका चे डोळे डबडबुन आले. वळणावरच्या वयातील, किंबहुना भविष्याचा अचुक वेध घेणारी दहावीची परीक्षा चालु होती. निपचित झोपलेले आपल्या “बा” चे प्रेत घरात पडुन असतांना ,नेमका त्याच दिवशी सानिकाचा संस्कृत विषयाचा पेपर होता. ईकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली. सुर्य जसजसा पुढे सरकू लागला, तसतसी तिची तगमग वाढली. काळजाच्या कोपर्यात ओथंबलेल्या भाव भावनांचा कोंडमारा दुर सारत, सानिकाने डबडबलेल्या डोळ्यातील अश्रू माय च्या साडीच्या पदराने पुसत स्वतःला सावरले, अन् तडक परिक्षा केंद्राच्या दिशेने यवतमाळ कडे निघाली. मग तिने चार दोन तास मागे वळुन बघीतलेच नाही. डेक्स वर आलेल्या संस्कृत विषयाच्या पेपरमध्ये डोळे आणि डोकं खुपसून झपाटल्यागत पेपर सोडवु लागली. अन् तिचा बुद्ध्यांक नुकत्याच जाहीर झालेल्या निकालातील गुणपत्रीकेत दिसुन आला. अहो आश्चर्यम सानिकाला संस्कृत विषयात तब्बल १००पैकी १०० गुण मिळाले. इग्रंजी ९१,मराठी ९६,गणित ९६,विज्ञान ९८,समाजशास्त्र ९८असे पाचशे पैकी ४८८गुण मिळवत सानिकाने!९७•६०टक्के म्हणजेच ९८टक्के मिळवुन पंचक्रोशीत वाहवा मिळवली आहे. हिवरी गावाच्या शिरावर मानाचा तुरा खोवला आहे. ति जायंटस् इंग्लीश मिडीयम स्कुल यवतमाळ ची विद्यार्थीनी नव्हे “वाघीण “आहे. तिने आभाळा सोबत स्पर्धा करणारे यश अगदी प्रतिकुल परिस्थितीत मिळवले खरे ,पण पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी बाप नाही याचे शल्य तिला सारखे बोचते आहे. त्यामुळे सानिकाच्या एका डोळ्यात आसु, तर दुसर्या डोळ्यात हसु आहे. तिला भारतीय प्रशासकीय सेवेत जाऊन खर्या अर्थाने शेतकर्याची सेवा करायची आहे असे ती सांगते. मुख्याध्यापक संजुला केसरवाणी, वर्गशिक्षिका गायञी मॅडम आणि खास करुन पोटाला पालव बांधुन शिकवणारी आई, आणि आत्या, मामा यांचे मोलाची सर्वतोपरी मदत होती असी ती मनमोकळेपणाने सांगते. “बापाची “तिरडी “अंगनात, अन् “लेक “गेली परिक्षा केंद्रात!हा या हिरकणी चा संदेश पंचक्रोशीत पेरला गेला आहे. या निमित्ताने सानिकाची काही इंद्रधनुष्यी स्वप्ने आहेत, त्या स्वप्नांना आकार येऊन ती साकार होवो ,हिच विधात्या चरणी प्रार्थना आहे.