Home नांदेड नांदेड जिल्हा परिषद आरोग्य विभागात विमा पॉलिसीचा महाघोटाळा

नांदेड जिल्हा परिषद आरोग्य विभागात विमा पॉलिसीचा महाघोटाळा

139

नांदेड, दि,२५ ( राजेश एन भांगे ) – नांदेड जिल्हा परिषद आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातून नियमितपणे कपात होणारे मासिक हप्ते हे त्यांच्या विमा पॉलिसीच्या खात्यात जमा होत नसल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या पाच वर्षापासून सुरू असून याबाबत वेळोवेळी कास्ट्राईब संघटनेने चौकशीची मागणी केलेली असताना आरोग्य प्रशासन यावर पांघरूण घालत असल्याचे दिसून येते. नांदेड जिल्ह्यातील विविध विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे विमा पॉलिसीचे मासिक हप्ते हे नेहमी त्यांच्या मासिक वेतनातून नियमितपणे कपात होऊन विमा पॉलिसीच्या खात्यावर जमा होत असतात ,परंतु जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कार्यरत विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातून कपात झालेले मासिक हप्ते त्यांच्या विमा पॉलिसी खात्यावर पोहोचलेच नाहीत ,ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे .

वास्तविकपणे कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातून कपात झालेली विमा पॉलिसीची मासिक हप्त्याची रक्कम आहरण व संवितरण अधिकारी(डीडीओ) यांच्या खात्यावर जमा होऊन भारतीय जीवन विमा निगम च्या कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या यादीसह धनादेशाद्वारे जमा केली जाते ,मात्र मागील पाच वर्षापासून अनेक कर्मचाऱ्यांच्या विमा पॉलिसीच्या नियमित मासिक हप्त्यामध्ये खंड (गॅप) दिसून येत असून ,कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात झालेली रक्कम गेली कुठे हा प्रश्न अनुत्तरीत आहे . दरम्यानच्या कालावधीत अनेक आहरण व संवितरण अधिकारी हे सेवानिवृत्त सुद्धा झालेले आहेत व बदली होऊन गेलेले आहेत त्यामुळे त्यांनी सेवानिवृत्ती पूर्वी अथवा बदली झाल्यानंतर सदरील विमा पॉलिसीच्या खंडित (गॅप)रकमा उचलून खर्च केल्याची शक्यता नाकारता येत नाही .

कास्ट्राईब संघटनेची पुनश्च: चौकशीची मागणी

याबाबत म.रा‌.कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे, जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने नुकतेच एक निवेदन देऊन कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात झालेले व खंडित असलेले विमा पॉलिसीचे मासिक हप्ते तात्काळ कर्मचाऱ्यांचा पॉलिसी मध्ये भरण्याबाबत व या विमा घोटाळ्याची चौकशी करण्याबाबत आरोग्य प्रशासनाला विनंती केली आहे.