Home मराठवाडा धक्कादायक : हिंगोलीच्या माजी जि.प. अध्यक्षांसह कुटुंबावर गुन्हा दाखल…काय आहे कारण

धक्कादायक : हिंगोलीच्या माजी जि.प. अध्यक्षांसह कुटुंबावर गुन्हा दाखल…काय आहे कारण

127

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

हिंगोली , दि.२५ :- सेनगाव येथे कोरोना बाधित व्यक्तीचा संपर्कात असल्यामुळे आरोग्य तपासणी करून विलगिकरण कक्षात जाण्यासाठी सूचना करूनही घरीच बसून राहिल्याबद्दल, हिंगोलीच्या माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षासह कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा सेनगाव पोलिसांनी दाखल केला आहे.

याबाबत सेनगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शैलेंद्र फडसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात असल्यामुळे तालुका कॉन्टॅक्ट ट्रेसिंग टीमने हिंगोलीच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सरोजनी खाडे, त्यांचे पती कुंडलिक नथुजी खाडे, मुलगा सतीश आणि सून मिरा खाडे यांना आरोग्य तपासणी करून विलगिकरण कक्षात जाण्यासाठी सूचना केल्या होत्या.

माजी जि. प. अध्यक्षा सरोजनी खाडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य

परंतु शासकीय आदेश न पाळता हे सर्व आरोपी ता. १७ जुलै ते ता. २२ जुलै दुपारी १२ वाजेपर्यंत आपल्या घरीच राहिले. तसेच त्यांनी क्वारंटाईन होण्यास नकार दिला. त्यामुळे माजी जि. प. अध्यक्षा सरोजनी खाडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील वरील आरोपींवर भादंवी कलम १८८, २७०, ३४ आणि साथरोग प्रतिबंधक कायदा कलम ४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे सेनगाव शहरात खळबळ उडाली आहे.

मास्क शिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल

दरम्यान,अनेक जण आपले राजकीय वजन वापरून किंवा आपल्या खोट्या प्रतिष्ठेचा आव आणून शासकीय आदेशाचा भंग करीत आहेत. हि मनोवृत्ती समाजासाठी घातक असल्याने इतरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा लोकांवर या प्रकारची कठोर कारवाई होणे अपेक्षित असल्याची चर्चा होत आहे.
सेनगाव शहरात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथे उपाय योजनेची कडक अंमलबजावणी नगरपंचायत प्रशासनाने हाती घेतली आहे. शहरात मास्क शिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत. येथील कोरोना केअर सेंटर येथे पाच रूग्ण उपचारासाठी दाखल आहेत.
यात एक बसस्थानक भागातील, तीन बालाजी नगर एक समतानगर येथील आहे. दोन दिवसापूर्वी एका कोरोना रुग्णाचा शहरात म्रुत्यु झाला आहे. यामुळे शहरात कडक अंमलबजावणी केली जात आहे.