Home विदर्भ महात्मा गांधींची ग्रामोद्योगाची संकल्पना प्रत्यक्षात आणू  – दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील...

महात्मा गांधींची ग्रामोद्योगाची संकल्पना प्रत्यक्षात आणू  – दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार

166

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

महात्मा गांधीची दीडशेवी जयंती साजरी करण्यासंदर्भात घेतली बैठक

वर्धा, दि. २५ :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आणि त्यांच्या विचारावर आधारित ग्रामोद्योग उभे करण्यासाठी त्यांच्या जयंती निमित्त एम गिरी ने विकसित केलेले तंत्रज्ञान आय टी आय आणि तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी एक दिवसाची कार्यशाळा आयोजित करावी. या विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानासोबत ग्रामोद्योग कसे उभारता येतील याची प्रेरणा देण्याचे प्रयत्न करून महात्मा गांधींची ग्रामोद्योगाची संकल्पना प्रत्यक्षात आणू असे प्रतिपादन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज महात्मा गांधी यांची दिडशेवी जयंती साजरी करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी विविध सूचना दिल्यात. या बैठकीला आमदार रणजित कांबळे, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, Iसेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी एन प्रभू, डॉक्टर गर्ग, बजाज संस्थेचे प्रतिनिधी, उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्र्यांनी विविध संस्थांकडून जयंती दिनानिमित्त आयोजित करावयाच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांची माहिती जाणून घेतली. ग्रामोपयोगी विज्ञान केंद्र आणि सर्व सेवा संघाच्या वतीने दीडशे गावांमध्ये दीडशे युवकांसाठी दीडशे उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले. हे उद्योग स्वदेशीला प्रेरणा देण्यासाठी आणि स्वदेशी मालाचा जास्तीत जास्त वापर होण्यासाठी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाशी समन्वय साधून युवकांना त्या पद्धतीचे प्रशिक्षण देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात यावे असे पालकमंत्री यांनी सांगितले.
याशिवाय महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, महिलांसोबत काम करणाऱ्या सामाजिक संस्था यांचे मगन संग्रहालया सोबत समन्वय करून एक दिवसाचे वर्कशॉप आयोजित करण्यात यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाकडून असणाऱ्या अपेक्षा सांगताना पालकमंत्र्यांनी महात्मा गांधी यांच्या विचारावर आंतरराष्ट्रीय क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवर व्यक्तींचे संमेलन आयोजित करण्यासंदर्भात सांगितले. तसेच महात्मा गांधी यांच्या विचारावर वर्धेत काम करणाऱ्या सर्व संस्थांनी दीडशेव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महात्मा गांधींचे विचार आणि त्यांचे ग्रामोद्योगाची संकल्पना सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या संकल्पना चांगल्या पद्धतीने राबविण्यासाठी सर्व मिळून काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी सर्व संस्थानी शासन, प्रशासनाला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची हमी दिली.

यावेळी मुकुंद मस्के, सर्व सेवा संघाचे प्रशांत गुजर जमनालाल बजाज फाउंडेशन चे जीवन कुलबांते, एम गिरीचे डॉक्टर व्यंकट राव, नई तालीमचे शिव चरण सिंग ठाकूर, ग्रामोपयोगी विज्ञान केंद्राचे सोहम पंड्या ,बजाज वाडीचे संजय कुमार, कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे बी एस गर्ग, राष्ट्रभाषा प्रचार समितीचे डॉक्टर हेमचंद्र वैद्य, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे डॉक्टर कादर नवाज खान, प्रोफेसर मनोज कुमार इत्यादी उपस्थित होते.