Home महत्वाची बातमी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही – मुख्यमंत्री ठाकरे यांची ग्वाही

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही – मुख्यमंत्री ठाकरे यांची ग्वाही

189

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

मुंबई , दि.२२ – मराठा समाजाच्या आरक्षणामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का बसणार नाही. याबाबत ओबीसी समाजाच्या शंका, कुशंका आणि भीती दूर करण्यासाठी अ‍ॅडव्होकेट जनरल (महाधिवक्ता) यांच्यासमवेत तुमची भेट घडवून आणू, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

ओबीसी व भटके विमुक्तांच्या न्याय मागण्यांसंदर्भात ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. यात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ओबीसी-व्हीजेएनटी संघर्ष समितीचे प्रकाश शेंडगे, हरिभाऊ राठोड यांच्यासह ओबीसी चळवळीतले अनेक नेते सहभागी झाले होते. ठाकरे म्हणाले, ओबीसींच्या प्रश्नांची दखल मी यापूर्वीही घेतली आहे.

अर्थसंकल्पातून चांगली स्वप्ने राज्यासाठी घेऊन आलो असतांना कोरोनाचे संकट आले आहे. पण असे असले तरी ओबीसी समाजाचा एकही प्रश्न किंवा मुद्दा सोडून देणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.