Home मराठवाडा गाईच्या दुधाला सरसकट लीटरला १० रुपये आणि दुध पावडरला प्रती किलो ५०रूपये...

गाईच्या दुधाला सरसकट लीटरला १० रुपये आणि दुध पावडरला प्रती किलो ५०रूपये अनुदान देण्याची मागणी

117

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे

जालना – महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संकटामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. विविध बॅंकांकडून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा नाकारल्या जात आहे. नकली सोयाबीन बियाणांचा भडिमार तसेच साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्याकडून युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण करून लुबाडणूक सुरू आहे. कमीअधिक पावसामुळे शेती मालाचे नुकसान होत आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना कसलाही दिलासा मिळत नाही. या आस्मानी आणि सुलतानी संकटामध्ये शेतकरी भरडला जात आहे. नुकसानीच्या मालिकेत दुधाचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. राज्यात १कोटी ४०लाख लिटर उत्पादीत होते. त्यापैकी ३५ लाख लिटर दूध सहकारी संस्थांकडून खरेदी केल्या जाते. ९० लाख लिटर दूध खाजगी संस्था आणि डेअरीच्या माध्यमातून विकत घेतल्या जाते. १५ लाख लिटर दूध शेतकरी स्वतः हॉटेल्स आणि ग्राहक यांना पुरवितो. शासकीय योजनेद्वारे फक्त १लाख लिटर दूध खरेदी केल्या जाते. कोरोना लाॅकडाउनच्या काळात दुधाच्या विक्रीमध्ये ३० टक्केपर्यंत घट झाली आहे. हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या बंद बंद असल्याने दुधाची मागणी घटली आहे. आज घडीला खाजगी संस्था आणि सहकारी दूध संघाकडून १५ ते १६ रूपये दराने दूध खरेदी केल्या जाते. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. शासनाने १० लाख लिटर दूध २५ रुपये लीटर प्रमाणे खरेदी करण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात मात्र ७ लाख लिटर दूध खरेदी केल्या जाते. मंत्र्यांचे लागेबांधे असलेल्या दूध संघाकडून शासन दूध विकत घेत आहे. इतर दुध उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे. गाईच्या दुधाला सरसकट लीटरला १० रुपये अनुदान आणि दुध भुकटीकरीता प्रती किलो ५० रुपये अनुदान तसेच शासनाकडून प्रती लिटर ३० रुपये प्रमाणे खरेदी करण्यात यावी… या न्याय्य मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविले आले.या मागण्या ३१ जुलै पर्यंत मान्य न झाल्यास भारतीय जनता पक्ष, रयतक्रांती संघटना, शिवसंग्राम, रासप, रिपाइं आ.महायुती १ आॅगष्ट रोजी राज्य व्यापी दुध एल्गार आंदोलन करणार आहे. निवेदनासोबत शेतकऱ्यांनी गाईच्या दुधाचे पॅकेज पाठविले असून या पवित्र दुधाशी इमान राहावे, असे भावनिक आवाहन केले आहे. निवेदनावर भाजपा घनसावंगी तालुका अध्यक्ष शिवाजी बोबडे, देवनाथ जाधव, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय तौर, यूवामोर्चा तालुका अध्यक्ष योगेश देशमुख, अशोकराजे जाधव, शिवाजी पवार, संभाजी घोगरे, भरत उगले, प्रताप कंटूले, सुभाष घोगरे,भाजपा तालुका विस्तारक विष्णू जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.