Home महाराष्ट्र अभिमानाची लेणी…!

अभिमानाची लेणी…!

198

अभिमानाची लेणी” ही सर्व वाचकांसाठी एक सुवर्णमय संधी आहे. या पुस्तकात लेखक देवेंद्र भुजबळ यांनी अनेक थोर व्यक्तिमत्वांची जीवन कहाणी अगदी प्रामाणिकपणे मांडली आहे, जेणे करून त्यांची कार्यपद्धती सर्वांसाठी प्रेरक ठरावी. त्यांचे अनुभव, त्यांच्या विचारांची ज्योत मनामनात रुजावी व उज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल व्हावी, हीच ह्या थोर व्यक्तिमत्वांसाठी खरी श्रद्धांजली असेल.
लेखकाने महात्मा ज्योतिबा फुले यांची त्यावेळेस असलेली आधुनिक विचारसरणी,स्त्री पुरुष समानता, शिक्षणाचे महत्त्व,विधवा पुनर्विवाह व विधवा केशवपन ह्या जुन्या रूढी व परंपरांना आळा घालून इतिहास घडवला याची सुंदर मांडणी केली आहे व तो स्त्रीचा खऱ्या अर्थाने सन्मान आहे. राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांची जीवनशैली , त्यांचे अभंग,ओव्या व भजने कशा प्रकारे मंत्रमुग्ध करतात, हे ही सांगितले . त्याच बरोबर समाज कल्याण,परिवार नियोजन, नशा बंदी संबंधी त्यांचे मोलाचे योगदान याची सुंदर मांडणी लेखकाने केली आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व,जसे की त्यांची शैक्षणिक चळवळ,कामगार नेते म्हणून केलेले योगदान,कायदे व कामगारांविषयी असलेली तळमळ, आत्मीयता मनाला भावून जाणारी आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरक पत्रकारिता, कामगार कल्यानातील योगदान, ज्ञानपुंज असे ३ स्वतंत्र लेख बाबासाहेबांवर या पुस्तकात आहेत. राष्ट्रगीत साकारणारे थोर व्यक्तिमत्व गुरुदेव रवीद्रनाथ टागोर यांनी चार भिंतींतील शिक्षण पद्धतीऐवजी खुल्या शिक्षणाचा कसा पाया रुजवला, त्यांचे संगीत,साहित्य व देशभक्तीचे दर्शन घडवले आहे. गौतम बुद्धाचे जीवन , त्याग, समर्पणाची कहाणी , दुःख मुक्तीसाठी दिलेले धडे व दुःखापासून मुक्त होण्याची कला कशी शिकवली हे लेखकाने उत्तम पद्धतीने सांगितले आहे. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी लहान वयात प्राप्त केलेले ज्ञान ,अनेक भाषांवर असलेले त्यांचे प्रभुत्व , निर्भीडपणे व्यक्त होणारे व्यक्तिमत्व व देशभक्ती याची सखोल माहिती लेखकाने दिली आहे. स्वातंत्रवीर सावरकर यांची केलेली पत्रकारिता कैद्यांमध्ये रुजवलेली साक्षरता, खडतर परिस्थितीवर केलेली मात, त्यांच्यातील निर्भीडता,सत्यता अनेक चळवळीत घेतलेला भाग व विज्ञान हे वरदान कसे ठरू शकते याची जाणीव लेखकाने स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता, सामाजिक समतेत योगदान या २ लेखांतुन उत्तम रित्या घडवून आणली आहे . लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील प्रवास , त्यांचे प्रेरक विचार, त्यांची शाहिरी व लेखणीची प्रतिभा देवेंद्रजींनी सांगितली आहे. अजरामर पुस्तक श्यामची आई लिहिणारे साने गुरुजी यांची प्रभावी शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या भविष्याची वाटणारी तळमळ अशी अनेक उदाहरणें लेखकाने अशा अश्या मांडले आहेत की आपले डोळे सहज पाणावतात .शिष्य व गुरु या अनोख्या नात्याचे वर्णन त्यांनी सुरेख केले आहे. सर्व धर्म समभाव समजणारे आचार्य विनोबा भावे यांची मातृभक्ती, राष्ट्रभक्ती, त्यांच्या जीवनशैलीची अनेक उदाहरणें या पुस्तकात आहेत. दुष्काळीं परिस्थितीवर मात करण्यासाठी आखण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेचे शिल्पकार कै. वि .स.पागे, त्यांचे अनेक क्षेत्रातील योगदान, अडचणींवर केलेली मात , ते अतिशय हुशार वकील कसे होते या विषयीचे चित्रण लेखकाने केले आहे.
कर्तव्यदक्ष कर्मयोगी रामभाऊ मंडलिक यांची जीवन कहाणी,त्यांचा देशसेवेचा वसा, स्वतः वृत्तपत्र सुरू करून त्याद्वारे केलेली जनजागृती, त्यांची दूरदृष्टी निर्भीडपणा, त्यांचे कार्य सर्वांसाठी लाख मोलाचे आहे.
असे अनेक अष्टपैलू देशभक्त , त्यांचे प्रभावशाली नेतृत्व, निर्भीडपणा , खडतर परिस्थितीवर त्यांनी केलेली मात,अनेक चळवळी, देशाच्या प्रगतीसाठी केलेले मोलाचे योगदान, त्यांचा इतिहास याविषयी लेखकाने अगदी बारकाईने अभ्यास केल्याचे दर्शन हे पुस्तक घडवते. अनेकांसाठी सकारात्मक ऊर्जा प्रदान करून उज्वल भविष्यासाठी हे पुस्तक नक्कीच लाख मोलाचे आहे.सर्व देशाला ह्या थोर व्यक्तींचा अभिमान आहे .त्यामुळे अतिशय योग्य असे “अभिमानाची लेणी” हे शीर्षक यथार्थ आहे.ते सर्व वाचकांसाठी ज्ञानामृत आहे, यात दुमत नसावे.विषेश म्हणजे हे ई पुस्तक वाचकांना मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल लेखक देवेंद्र भुजबळ व ई साहित्य प्रतिष्ठानचे प्रकाशक सुनील सावंत अभिनंदनास पात्र आहेत. हे पुस्तक आपण

http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/abhimanachi_leni_devendra_bhujbal.pdf

लिंकवर सहज वाचू शकता.
अशा ह्या परिपूर्ण पुस्तकातील थोर थोर व्यक्तींना त्रिवार वंदन. – परीक्षण: रश्मी हेडे.