Home मराठवाडा महाबीजसह सोयाबीन कंपन्यावर ४६ फौजदारी गुन्हे दाखल – कृषी विभागाची न्यायालयात माहिती

महाबीजसह सोयाबीन कंपन्यावर ४६ फौजदारी गुन्हे दाखल – कृषी विभागाची न्यायालयात माहिती

110

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

औरंगाबात – सोयाबीनच्या बोगस बियाण्यामुळे पिकाची उगवण न झाल्याप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल फौजदारी सुमोटो जनहित याचिकेवर न्यायमूर्ती न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती श्रीकांत डी. कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. दरम्यान खंडपीठ कार्यक्षेत्रात महाबीजसह (दोन गुन्हे) सोयाबीन कंपन्यावर 46 फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आल्याचे म्हणणे कृषी विभागातर्फे सरकारी वकील ॲड. डी. आर. काळे यांनी खंडपीठासमोर सादर केले. याचिकेची पुढील सुनावणी 24 जूलै रोजी होणार आहे.

मागील सुनावणीदरम्यान खंडपीठाने कृषी विभागाचे कान उपटत बियाणे उत्पादक कंपन्या आणि विक्रेते यांना वाचवून शेतकऱ्यांना दोषी ठरविण्यात आल्याचे स्पष्ट करत औरंगाबाद विभागाचे कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. जाधव यांनी 13 जुलैला सकाळी साडेदहा वाजता खंडपीठात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार डॉ. जाधव सकाळी खंडपीठात हजर झाले. सोमवारी सुनावणीदरम्यान कृषी विभागातर्फे सादर करण्यात आले की, 53 कंपन्यांना कृषी विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. खंडपीठ कार्यक्षेत्रात सोयाबीन न उगवल्याप्रकरणातील तक्रार निवारण समितीकडे 40 हजार 337 तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी 36 हजार 692 तक्रारदारांचे पंचनामे करण्यात आल्याचेही खंडपीठात सादर करण्यात आले असता, खंडपीठ नियुक्त अमायकस क्यूरी (न्यायालयाचे मित्र) ॲड. पी. पी. मोरे यांनी वरील सर्व तक्रारीनुसार केवळ 292 तक्रारदार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच ॲड. मोरे यांनी याचिकेत केंद्र सरकारच्या सहायक आयुक्त, गुणनियंत्रण विभाग यांना प्रतिवादी करण्याची विनंती केली असता, खंडपीठाने प्रतिवादी करण्यास परवानगी दिली. सुनावणीदरम्यान राज्याचे कृषी संचालक (गुणनियंत्रण) विजयकुमार घावटे हेही व्यक्तीशः उपस्थित होते.

दरम्यान, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हे बोगस सोयाबीनचे बियाणे विकून हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याची बातमी एबीपी माझाने प्रसारित केली होती. या वृत्ताची दखल औरंगाबाद खंडपीठाने घेतली असून खंडपीठाने यावर सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. मराठवाड्यातील परभणी, नांदेड, लातूर , हिंगोली आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये बनावट सोयाबीन बियाणे विक्री झाली. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सोयाबीनची अनेक ठिकाणी उगवणच झाली नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. बोगस बियाणे उत्पादित करणाऱ्या कंपन्या तसेच ते विक्री करणारे यांच्या विरोधात बियाणे निरीक्षकांकडे तक्रार देऊनही आवश्यक कारवाई न झाल्यास पोलिसांकडे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आणि त्या अनुषंगाने पोलिसांना कारवाईचे अंतरिम निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश टी. व्ही. नलावडे आणि न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांनी दिले होते.