Home विदर्भ वावरात आले “” वानु “” मग घरात पिक कसे आणु?

वावरात आले “” वानु “” मग घरात पिक कसे आणु?

53
0

देवानंद जाधव – मंगरूळ

यवतमाळ – जगाच्या नकाशात आत्महत्या करणार्या शेतकर्यांचा जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याने आपले तोंड काळे करुन घेतले आहे. “जानकुड, ईळत, शिवळा, बेड्डी, खिळी, दावन, कासरा, जु, अशा खंडीभर शेतीपयोगी साहीत्याचे नाव ज्ञात नसलेले “” कृषी तज्ञ “” आकाशवाणी आणि दुरदर्शन वर कागद वाचुन, शेती कशी करायची याचे शेतकर्यांना धडे देत आहे. आमचे बहुतांश मायबाप सही पुरते साक्षर असतांना देखील, मेंदुचं भरीत होईल असे ईंग्रजीतील औषधींची नावे सांगत सुटले आहेत.

हे पहीलीच्या पोराजवळ पाचवीचे पुस्तक दिल्या सारखे आहे. औषधी आणि रासायनिक खतांची नावे महाराष्ट्रापुरती तरी मराठी भाषेत सुटसुटीत असावीत, हि शेतकर्यांची अपेक्षा आहे. या साठी कोण आणि कोणता पक्ष आंदोलन करेन हे काळाच्या पोटात दडले आहे. पण तुर्तास जिल्ह्यातील तमाम शेतकर्यांचा मुलुख काळजावर धोंडा घेऊन पडला आहे. आमच्या शेतकर्यांना मृग नक्षत्राचे डोहाळे लागताच काळी आई गर्भार होण्याचे स्वप्न दिसतात. मग ते स्वप्न साकार करण्यासाठी, बायकोच्या गळ्यातील फुटक्या मण्याचं मंगळसूत्र गहान ठेऊन आणि घरातील कोंबड्या, बकर्या कसायाच्या दावणीला बांधुन, पेरणी करण्यासाठी खटपट करतो. त्यातही अंधारात उंदीर पकडणार्या मांजराच्या औलादीकडुन बोगस बि,बियाणे देऊन फसगत केली जाते, परिणामी दुबार पेरणीची वेळ भुमिपुञावर येते. नव्हे ती आणली जाते. दुबार, तिबार पेरणी करुन देखील, काळ्या आईच्या कुशीत बिज फळत नाही, अंकुरत नाही, तेव्हा शेतकर्याच्या डोळ्यातुन पश्चात्तापाचे अश्रूरत्न बाळ॓त झाल्या शिवाय राहत नाही. आपलाच शेतकरी संकटात असताना, आणि शेतकर्यांच्या जीवांवर साडी, गाडी, माडी, कमावणारे, बगळे मुग गीळुन बसावेत हे अत्यंत संतापजनक आहे. पहीली पेरणी व्यर्थ गेली, अनेकांची दुबार, तिबार पेरणीची माती झाली. तरी आमच्या मायबाप भूमिपुत्रांनी बायको आणि लेकरांबाळांच्या डोळ्यामागे आपल्या डोळ्यातील अश्रू फाटक्या अन् मळकटलेल्या शेल्याने पुसुन, पुन्हा पुन्हा पेरणी केली, ईतक्यात पाऊसपाण्याने छान पैकी साथ दिली, सोयाबीन आणि अन्य पिकांनी धरणी माय वर तोंड वर काढताच, विविध रोगांनी त्या पिकांच्या नरडीचा घोट घेतला. अवघे पिक काविळ झाल्यासारखे पिवळे पडले. पानांच्या नसांही कुपोषित झाल्या, अन त्यात भर म्हणून खोडकिडीनेही संपुर्ण पिक पोकरले, आता यवतमाळ जिल्ह्याच्या विविध भागात शेतकर्यांसोबतच नानाविध पिकांचे रक्त पिणार्या ” वाणु “”नामक कृमी किटकांनी मोठा कहर केला आहे. संपुर्ण शेतातील पिक कुरतुडुन खाऊन फस्त करत आहेत. आरणी तालुक्यातील लोणबेहळ शिवारातील या वाणुचा कळप जिल्ह्याच्या कृषी तज्ञांच्या दर्शनासाठी मी खास करून पाठवतो आहे. किटक शास्ञज्ञांनी किंबहुना कृषीतज्ञांनी, आतातरी वातानुकुलीत आणि अलीशान वाहनातून बाहेर पडुन, तुमच्या आमच्या अन्नदात्यांना जमीनीवर येउन मार्गदर्शन करावे. अशी माफक अपेक्षा तमाम मायबाप शेतकर्यांची आहे.
ईतकेच…….
ऊद्धवा अजब तुझे सरकार
असे म्हणायची पाळी शेतकर्यांवरआणु नका. हिच काळजाच्या तिजोरीतील प्रितीचा सारा जिव्हाळा ओतून शेतकर्यांची प्रार्थना आहे.

Unlimited Reseller Hosting