Home मुंबई मुलांच्या शिक्षणासाठी मौलानाची धडपड, गल्लोगल्ली जाऊन करताहेत जनजागृती

मुलांच्या शिक्षणासाठी मौलानाची धडपड, गल्लोगल्ली जाऊन करताहेत जनजागृती

180

करोना वायरस, स्वच्छता आणि शिक्षणाची देतात माहिती

मौलवींचा ‘मेरा मोहल्ला, मेरी जबाबदारी’ जनजागृती अभियान…!

मुंबई / संभाजीनगर. (शाहरुख मुलाणी) – कोरोनाच्या काळात तीन-चार महिन्यापासून मुले घरीच आहेत. बरीच मुले अभ्यास विसरली आहेत. त्यामुळे समाजातील मुलांनी शिकावे, त्यांच्या पालकांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावे, बाल मजुरी वाढू नये, गुन्हेगारी वाढू नये या उद्देशातून शहरातील एक उच्चशिक्षित माैलाना गल्लोगल्ली जाऊन शिक्षणाविषयी लोकांमध्ये जनजागृती पसरवण्याचे काम करत आहेत. यासोबतच ते कोरोना आणि पावसाळ्यात स्वच्छता कशी राखायची याविषयीदेखील माहिती देत आहेत.

मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी असे त्यांचे नाव असून त्यांनी ‘रीड अँड लीड फाउंडेशन’ अंतर्गत ‘मेरा मोहल्ला, मेरी जबाबदारी’ ही मोहीम सुरू केली आहे. ते स्वत: बयाजीपुऱ्यात राहतात. तेथुनच त्यांनी या कामाला सुरुवात केली. बायजीपुऱ्यामध्ये ३२ गल्ल्या आहेत. ते रोज तीन-चार गल्ल्यामध्ये जाऊन जनजागृती करतात. यासाठी त्यांनी साडे सहा हजाराचे लाऊडस्पीकर विकत घेतले आहे. संध्याकाळी ५ ते ८ दरम्यान ते गल्लोगल्ली जातात आणि लाऊडस्पीकरवर लोकांना माहिती देतात. सायंकाळी मुले आणि माता घरी असतात. त्यामुळे ही योग्य वेळ असल्याचे ते म्हणतात. या कामात त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते उस्मान शाहदेखील त्यांची मदत करत आहेत.

कोरेनामुळे तीन-चार महिन्यापासून मुले घरी आहेत. बरीच मुले अभ्यास विसरली आहेत. शिवाय आता शाळा कधी उघडणार, याची कल्पना कुणालाही नाही. त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला हवे, जे पालक शिकलेले आहेत, त्यांनी मुलांना शिकवायला हवे. पालकांनी मुलांच्या शाळेतील शिक्षकांच्या संपर्कात राहायला हवे, शाळा कधी उघडणार ? मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा ? कोणती पुस्तक घ्यायची ? हे सर्व पालकांनी विचारायला हवे. सध्या अनेक पालकांकडे माेबाइल नाहीत, त्यामुळे ऑनलाइन शिक्षण कसे घेणार ? असे अनेक प्रश्न शिक्षकांना विचारा. मुलांना शिकवा, आपले मुले भरकटतील, त्यामुळे बाल मजुरी वाढेल, गुन्हेगारी वाढेल, आपले मोहल्ले बदनाम होतील, असे करू नका, वेळीच काळजी घ्या, असे नदवी लोकांना सांगतात. तसेच स्वच्छतेचा संदेश आपल्या मोहम्मद पैगंबर यांनीच दिला आहे. बाहेरुन आल्यावर हातपाय धुवा – कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या. बाहेरुन आल्यावर हातपाय धुवुनच घरात जा. गरम पाणी प्या. सॅनिटायझर वापरा. फळे, भाज्या धुवुन घ्या, असे ते सांगतात. घरातच नमाज अदा करा. – मी माझ्या मुस्लिम भावांना सांगू इच्छित आहे की, त्यांनी घरातच नमाज अदा करावी. अल्लाकडे सर्वांच्या आरोग्यासाठी दुवा करा. कोरोना पळून जावो. शहर आणि देशात सुखसमृद्धी नांदो, अशी प्रार्थना करा. स्वच्छता बाळगा. – सध्या पावसाळा सुरु झाला आहे. या दिवसात मलेिरया, हैजा, सर्दी, खोकला पसरत असतो. त्यामुळे स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. कोणताही आजार असो लपवू नका. आपले मोहल्ले स्वच्छ ठेवा. बऱ्याच गल्ल्यात सफाई हाेत नाही. पाणी भरल्यानंतर नळ बंद करा, अशा अनेक गोष्टी ते लोकांना समजून सांगत असतात.

प्रत्येकाने आपल्या वस्तीत ही मोहीम राबवावी.
सरकार आपले काम चांगल्या प्रकारे करत आहे. नागरिकांनीदेखील आपल्या स्तरावर काळजी घ्यायला हवी. मुलांना शिकवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. मी माझ्या मोहल्ल्यात ही मोहीम सुरू केली आहे. त्याच प्रकारे शहरातील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षित लोकांनी पुढे येऊन आपापल्या मोहल्ल्यात ही मोहिम सुरू करावी. ही विनंती. – मिर्झा अब्दुल कय्यू नदवी, इस्लामिक स्कॉलर व विचारवंत