August 5, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

यवतमाळ तालुक्यात सोयाबीनच्या जीवांवर , “खोडकिडी” उदार…!

शेतकरी हतबल
मदतीची गरज

देवानंद जाधव

यवतमाळ – तालुक्यातील असंख्य शेतकर्यांना प्रथम, दुबार, तिबार पेरणीचा, कंबरडे मोडणारा मार सहन करावा लागला. त्यातल्या त्यात बोगस बियाणे विकणार्या दुकानदारांनी, शेकडो नव्हे हजारो शेतकर्यांच्या घरच्या संदुकातील अवघा पैसा लुटला.

तरीही अंगात ऊसणा आव आणुन दुबार, तिबार पेरणी करण्यासाठी बि बियाण्यांची सोय लावली. सोयाबीनच्या बियाण्यांनी धरणी मायच्या वर तोंड काढताच, त्या अंकुरलेल्या गोजिरवान्या पिकाला कुणाची नजर लागली कोण जाणे?परिसरातील हिवरी, नाकापार्डी, वाटखेड, माळमसोला, मनपुर, भांब राजा, बेचखेडा, बोरी गोसावी, रामनगर, साकुर मांगुळ, बेलोरा, वाई, रुई यासह शेकडो गावातील शेतकर्यांच्या शेतातील सोयाबीन पिकाला विविध, रोगांनी कवेत घेतले. येथेच तमाम भूमिपुत्रांचे अवसान गळाले. जेथे चोरांची भिती तेथेच अंधार पडला. वावर शेतातील पोटच्या पोरागत जपलेलं सोन्यासारखं सोयाबीनचे प्रत्येक झाड आणि झाड, योग्य पोषकतत्वा अभावी कुपोषित झाले आहे. झाडांचे प्रत्येक पान आणि पान कावीळ झाल्यागत पिवळे पडले आहेत. पानांच्या नसा हिरव्या पडल्या आहेत. या शिवाय काळजावर घाव घालणारी बाब म्हणजे, झाडाला मुळालाच खोडकिडी लागली आहे. त्यामुळे शेतकर्यांची तगमग वाढली आहे. जीव कासावीस होतो आहे. शेतातील पिकांच्या भरवस्यावर लेकरां बाळांची वर्षभरांची भाकरीची सोय लावायची कशी?या विचारातच शेतकर्यांच्या अंगावरील मास मुठ मुठ कमी होत आहे. त्या मुळे पंचक्रोशीतील तमाम शेतकर्यांची अवस्था यंदा अर्धवट ठेचलेल्या सापासारखी झाली आहे. जगातील सार्या वेदना सटवीने आमच्याच कपाळी कोरल्या की काय?अशी भावविभोर भावना शेतकरी मायबापांची झाली आहे. आपण ईतके कष्ट ऊपसले, शेतामध्ये पिढ्यानुपिढ्या घाम गाळुन रक्त आटवले, पण मुलाबाळांच्या भविष्यातील अंधार पुसुन टाकता आला नाही, याचे शल्य शेतकर्यांच्या मेंदूला डागण्या देत आहे. एरवी वार,वादळ, विंचुकाटा ऊषाला घेऊन झोपणारा शेतकरी दरवर्षी प्रमाणे यंदाही आस्मानी आणि सुलतानी संकटाच्या चक्रव्युहात अडकला आहे. त्यांना कागदीघोडे न नाचवता, मानसिक आणि आर्थिक मदत तातडीने देणे गरजेचे आहे. वातानुकूलित वाहनातून आपल्या चेल्याचपाट्यासह शेतकर्यांच्या बांधावर येऊन फोटो काढुन माध्यमाकडे प्रसिद्धीसाठी, पाढवणार्यांनी,जमीनीवर येऊन खर्या अर्थाने, शेतकर्यांच्या पाठीवर मदतीचा हात ठेवने गरजेचे आहे. आणि यंदा कसं होईल त होवो बाप्पा या हताश मानसिकतेतुन शेतकर्यांना बाहेर काढने याक्षणी महत्वाचे आहे. यवतमाळ तालुक्यात सोयाबीन पिकांवर, खोडकिडी ऊदार….असल्याने शेतकर्यांचा अवघा मुलुख हतबल, हताश झाला आहे. हे या परिसरातील वास्तव आहे. याकडे शासन आणि प्रशासनाने गंभीरपणे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. तेव्हा ऊघडा डोळे वाचा नीट!हेच सांगायचे आहे.

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!